विकास गिते : सकाळ वृत्तसेवा
Sant Nivruttinath Palkhi : ‘भरीला वैष्णवांचा मेळा... याचि देही- याचि डोळा’ अशा समरस वाक्यांची प्रत्यक्ष अनुभूती वारकऱ्यांनी मंगळवारी (ता. २५) दातली (ता. सिन्नर) येथे तीन एकर परिसरात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचा रिंगण सोहळ्याप्रसंगी घेतली. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यातील दोन अश्वांचा हा रिंगण सोहळा ‘याचि देही- याचि डोळा’ पाहण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ( Sant Nivruttinath Palkhi first arena ceremony in Datli in excitement )
हजारो वारकऱ्यांनी हा रिंगण सोहळा नेत्रांत साठवून घेतला. हातात टाळ-मृदंग, डोक्यावर तुळशी वृंदावन अशा या पेहरावात या रिंगण सोहळ्यात अनेक वारकरी अतिशय आनंदाने धावले. सोहळ्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी मुक्कामी खंबाळेकडे मार्गस्थ झाली. संत निवृत्तिनाथांची पालखी मंगळवारी (ता. २५) दुपारनंतर दातलीत पोहोचली. ध्वजकरी, वीणेकरी, तालवादक आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांचे रिंगण पार पडल्यावर शेवटी माउलींच्या अश्वाचा रिंगण सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
सर्वत्र ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘विठ्ठल विठ्ठल’, ‘ज्ञानदेव तुकाराम’, ‘पंढरीनाथ महाराज की जय’ अशा जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता. सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील मुक्काम आटोपल्यावर पालखीचे प्रस्थान सिन्नरनगरीतून पुढे जात कुंदेवाडी, मुसळगाव आणि नंतर दातली गावी रिंगण स्थळाकडे झाले. सकाळपासूनच मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा ओघ सुरू होता. सकाळी कुंदेवाडी येथे आमरस आणि पुरणपोळीचा पाहुणचार घेतल्यावर पालखी दातलीकडे रवाना झाली होती.
सकाळपासूनच वारकऱ्यांची रेलचेल असल्याने वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत होते. दुपारी तीनच्या सुमारास पालखी सोहळा दातलीत पोहोचला. अश्वांची पूजा झाल्यावर वारकऱ्यांनी दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला प्रदक्षिणा पूर्ण केल्या. स्वारीचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. त्याच्या पाठोपाठ मानाचा अश्वही धावला. या वेळी लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ नामाचा एकच जयघोष केला. (latest marathi news)
संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षा कांचनताई जगताप, माजी अध्यक्ष नीलेश गाढवे, पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ, सचिव अमर ठोंबरे, माजी विश्वस्त पुंडलिकराव थेटे, विश्वस्त श्रीपाद कुलकर्णी, राहुल साळुंखे, नवनाथ गांगुर्डे, जयंत महाराज, माजी सचिव सोमनाथ घोटेकर, राजेंद्र महाराज जुन्नरकर, सुनीताताई निकम, विमलताई डावरे, पोलिस निरीक्षक बाविस्कर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, बाळकृष्ण महाराज डावरे, अनिल महाराज गोसावी, गटविकास अधिकारी अशोक भवारी, दातली येथील सरपंच सीमा चांदोरे, उपसरपंच भीमाबाई भाबड, अनिल कानवडे, प्राध्यापक इ. के. भाबड, पोलिसपाटील सुनील चांदोरे आदी उपस्थित होते.
साडेतीन एकरावर रिंगण सोहळा
मानाचे अश्व दुपारी चारला हजारो वारकऱ्यांसह दातलीनगरीत पोहोचले. या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. बरोबरच नाथांचा रथही पोहोचला. या वेळी हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने विधिवत पूजा करण्यात आली. दातली येथील साडेतीन एकर क्षेत्रावर आखीव-रेखीव गोल रिंगणासाठी मैदान सुशोभीत करण्यात आले होते.
रिंगणाच्या मध्यभागी रांगोळी काढण्यात आली होती. अश्वांच्या रिंगणाच्या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. निवृत्तिनाथांच्या पादुका व मुकुट असलेली पालखी खांद्यावर घेऊन रिंगणात आणण्यात आली. यानंतर देव रिंगण, टाळकरी रिंगण आणि वीणेकरी रिंगण पार पडले. त्यानंतर पालखी पुढे खंबाळे येथे मुक्कामी मार्गस्थ झाली.
फिरत्या दवाखान्याची वारकऱ्यांसाठी सोय
त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी फिरता दवाखान्याचे पथक वारीमध्ये होते. तसेच लोणारवाडी येथे अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले. यावेळी या फिरत्या दवाखान्याच्या पथकात दहा कर्मचारी तसेच डॉक्टर सहभागी असून त्यांच्याकडून २४ तास वारकऱ्यांना औषधोपचार देण्यात आले. या सेवेचे हे दुसरे वर्ष असून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पालखी सोहळ्याच्या सर्व २७ दिवसांच्या प्रवासात ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी ही सेवा गतवर्षापासून सुरू केली असून लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेचे त्यासाठी सहकार्य लाभले आहे. डॉ. आर. डी. नाईकवाडी, डॉ. सारंग जाधव, डॉ. सुनील जाट, डॉ. रामदास लोहरे आदी सेवा देत आहेत. त्र्यंबकेश्वरपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यावेळी लोकनेते वाजे पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालखीसोबत फिरता दवाखाना तैनात करण्यात आला होता. वारकरी रुग्णास तपासून जागेवर उपचार केले जात असल्याने रुग्णांना बरे वाटत होते. तसेच अधिक उपचाराची गरज भासल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात संदर्भित केले जात होते. दिवस- रात्र वैद्यकीय पथक सेवेत राहून लगेचच औषधोपचार करण्यात येतो. विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या वारकऱ्यांची संख्या जास्त होती.(latest marathi news)
वारीत वर्दीतील वारकऱ्यांचाही उत्साह
सिन्नर ः विठु नामाचा गजर करीत पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडीत पोलिसांनी हातात टाळ खांद्यावर वीणा घेत दिंडीची अनुभूती घेतली. संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखी दिंडी मंगळवारी सकाळी सिन्नर शहरात दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांबरोबर सिन्नर शहरातील मुसळगाव व सिन्नर शहर या दोन्हीही पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी हातात टाळ व मृदंग घेत विठू नामाचा गजर केला त्यात महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत हरी नामाचा गजर केला.
दिंडीतील अनेक पोलिसांनी दिंडीत प्रत्यक्ष सहभाग घेतला. पोलिसांनी य डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी गंध टिळा तर गळ्यात टाळ घेतली तर महिला पोलिसांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हरी नामाचा गजर करीत वारकऱ्यांना पालखीत साथ देत आनंद घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.