'Baital Devula' built by Tribhuvan Mahadevi & Parasurameshwar temple built by Shailodbhava kings. esakal
नाशिक

राजवंश भारती : कलिंग राजवंश- 2

Kalinga Dynasty : आपण अभिजात कालखंडातील महत्त्वाच्या कलिंग राजवटी पाहू. मध्ययुगातील राजवटींची माहिती पुढे यथावकाश घेऊ.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

खारवेलानंतर महामेघवाहन वंश अस्तंगत झाला. त्याच वेळी गुप्त साम्राज्य भारतभर पसरत होते. त्यात कलिंग प्रांतही गुप्तांच्या अधिपत्याखाली आला. पण, गुप्तांच्या नंतर, सुमारे पाचव्या शतकात कलिंग पुन्हा स्वायत्त झाला. स्थानिक राजवटींनी थोडा-थोडा काळ कलिंगावर राज्य केले. सध्या आपण अभिजात कालखंडातील महत्त्वाच्या कलिंग राजवटी पाहू. मध्ययुगातील राजवटींची माहिती पुढे यथावकाश घेऊ. (saptarang latest article on Kalinga Dynasty part 2)

नल राजवंश :

गुप्तांनंतर कलिंगातील काही भागावर नल राजवंशाने राज्य केले. हे स्वत:ला पौराणिक निषादराज नलाचे (नल- दमयंती आख्यानातील) वंशज मानत होते. नाणी, ताम्रपट व शिलालेख यांच्या आधारे या वंशातील वराह राज, अर्थपती, भवदत्त व स्कंदवर्मन या राजांची नावे समजतात. नलांची राजधानी ‘पुष्करी’ या ठिकाणी होती (नल राजाला द्युतात हरविणाऱ्या त्याच्या भावाचे नाव ‘पुष्कर’च होते!) हे ठिकाण आजच्या छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात गडधनोरा इथे येते.

नलांच्याच आगेमागे कलिंग प्रांतात मथारा वंश, विग्रह वंश, मुद्‍गल वंश, वसिष्ठ वंश, विष्णुकुंडिन वंश, पितृभक्त वंश असे अनेक वंश काही काळापुरते आणि काही प्रदेशापुरते सत्तेवर आले. यांच्यापैकी बऱ्याच राजांच्या नावात ‘वर्मन’ ही उपाधी होती. या वंशांपैकी पितृभक्त वंश जरा नामवंत होता. वंशाचा संस्थापक उमावर्मन याने मथारा राजाला पदच्युत करून आपली सत्ता स्थापन केली.

मथारांची राजधानी ‘सिंहपूर’ हीच पितृभक्तांची राजधानी होती. उमावर्मनाचा मुलगा नंदप्रभंजनवर्मन याच्या तीन वेगवेगळ्या ताम्रपटांमधे त्याचा उल्लेख ‘सकल कलिंगाधिपती’ असा आहे. त्यावरून तो इतर राजांपेक्षा अधिक शक्तिशाली शासक असावा, असे दिसते. विग्रह वंशातील ‘पृथ्वी विग्रह’ आणि मुद्‍गल वंशातील ‘संभूयास’ हे राजेही इतिहासात आपला ठसा उमटवून गेले आहेत. (latest marathi news)

शैलोद्‍भव राजवंश :

विग्रह आणि मुद्‍गल राजांचे सरदार असलेले एक घराणे कलिंगातील ‘कोंगोडा’ नावाच्या प्रदेशातून राजातर्फे कारभार करीत होते. पुढे गौड शशांकाने कलिंग ताब्यात घेतल्यावर हे घराणे त्याचे सामंत बनले.‌ मात्र, शशांक परागंदा झाल्यावर, लगेच म्हणजे इ. स. ६२० च्या सुमारास त्या वेळचा शासक माधवराज दुसरा याने या राजाचे वर्चस्व झुगारले आणि तो स्वतंत्र झाला- ‘सकल कलिंगाधिपती’ झाला.

त्याच्या राजवटीत शैलोद्‍भव घराणे पुन्हा प्रकाशात आले. शैलोद्‍भव म्हणजे पर्वतापासून उत्पन्न झालेले. याच नावाचा घराण्याचा आद्य पुरुष एका पौराणिक कथेत आहे. मात्र, सहाव्या शतकातील ‘रणभीत’ या शासकापासूनची नीट वंशावळ आढळते. या राजवटीतील एकूण १६ ताम्रपट आढळले आहेत. त्यातून शैलोद्‍भव वंशाची माहिती कळते.

‘बाणापूर’ ही त्यांची राजधानी होती. ओडिशामधील सगळ्यात प्राचीन समजले गेलेले ‘परशुरामेश्वर मंदिर’ शैलोद्‍भव राजवटीत उभारलेले आहे. कलिंग वास्तुकलेचा अजोड नमुना असलेले हे मंदिर भुवनेश्वरजवळ आजही उभे आहे. त्याची नासधूसही तुलनेने बरीच कमी झालेली आहे. संपूर्ण मंदिरात अप्रतिम कोरीव काम जागोजागी केले आहे.

परशुराम जरी श्रीविष्णूंचा अवतार असले, तरी त्यांनी ज्याची आराधना केली, त्या शंकराचे हे मंदिर आहे. हे मंदिर नक्की कोणत्या राजाच्या कारकीर्दीत बांधले, हे सांगता येत नाही. तो बहुधा दुसरा माधवराजच असावा. आठव्या शतकाच्या अखेरीस धर्मराज दुसरा गादीवर असताना ‘भौम-कर’ वंशाच्या नायकांनी शैलोद्‍भव वंशाचा पाडाव करून त्यांची राजवट संपुष्टात आणली. (latest marathi news)

भौम-कर वंश :

भौम-कर हा वंश इ. स. ७३६ ते ९४० अशी जवळजवळ २०० वर्षे सत्तेवर होता. क्षेमंकरदेव या राजापासून ‘कर’ वंशाची राजवट सुरू होते. याही राजवटीतील अनेक ताम्रपट सापडले आहेत. क्षेमंकर, शिवकर, शुभकर, शांतिकर अशी या वंशातील राजांची नावे आहेत. त्यामुळे या वंशाला ‘कर’ वंश म्हणतात. या वंशाचे एक मोठे वैशिष्ट्य असे, की या वंशातील बऱ्याच शासक महिला होत्या.

‘त्रिभुवन महादेवी-१’ , २ आणि ३ अशा एकाच नावाच्या तीन राण्या भौम वंशात सत्तेवर होत्या. यातली पहिली त्रिभुवन महादेवी तर फार कर्तबगार होती. तिची तुलना ‘कात्यायनी’ या देवीरूपाशी केलेली आहे. तिने चामुंडा देवीचे; पण ‘बैताल देऊला’ अथवा ‘वेताळ देऊळ’ या नावाने ओळखले गेलेले मंदिर बांधलेले आहे. ते भुवनेश्वरला आहे.

हे प्राचीन मंदिरही अत्यंत सुरेख कोरीवकामाने सजलेले आहे. भौम कर वंशातील अखेरच्या चार शासकही महिलाच होत्या! गौरी महादेवी, दंडी महादेवी, वकुला महादेवी आणि धर्म महादेवी अशी त्यांची नावे आहेत. गौरी आणि वकुला या दोघी शुभकर-५ च्या पत्नी; दंडी ही गौरीची मुलगी आणि धर्म व वकुला या जावा, अशी त्यांची नाती होती.

शुभकर-५ च्या मृत्यूनंतर जवळजवळ ३० वर्षे या चौघींनी राज्य हिमतीने सांभाळले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. कलिंग प्रदेशात अनेक लहान-मोठ्या राजवटी एकसमयावच्छेद करून होऊन गेल्या. त्यामुळे आपण बऱ्याचदा समांतर कालखंडातून जातो आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT