Vijayastambh, Chitodgarh & Rajput style painting of Maharana Pratap. esakal
नाशिक

राजवंश भारती : सिसोदिया वंश

Latest Sisodia Vansh News : सन १३२६ पासून चितोडगडावर सिसोदिया वंशाची सत्ता सुरू झाली. भारताच्या इतिहासात आपल्या शौर्यासाठी गाजलेले अनेक ‘राणा’ या वंशातील आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

गुहिल वंशाची दुसरी शाखा सिसोदिया/ शिसोदिया या नावाने ओळखली जाते. गुहिलवंशीय राजा रहापा याने शिसोदा नावाचे गाव वसवून स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला. ते राजपदावरील व्यक्तीला ‘राणा’ किंवा ‘महाराणा’ म्हणत होते. काही काळ ही दोन्ही घराणी समांतर राज्य करीत होती.

पण, सन १३०३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चितोडगड जिंकला आणि रत्नसिंह तर ठार झालाच; पण या लढाईत सिसोदिया शाखेचा राणा लखनसिंह आपल्या सर्व नऊ मुलांसह चितोडच्या मदतीला धावला होता. लढाईत तो व त्याची सात मुले ‘साका’ करून धारातीर्थी पडले.

आणीबाणीच्या लढाईत राजपूत स्त्रिया जशा आत्मसन्मानासाठी जोहार करीत, तसेच पुरुष केशरी कपडे परिधान करून रणात लढताना मृत्यूला कवटाळत. त्याला ‘साका’ किंवा ‘केसरिया’ असे नाव आहे. या साकानंतर संपूर्ण गुहिल वंश नामशेष होतो काय, अशी धास्ती होती.

पण, लखनसिंहाचा नातू हम्मीर तेव्हा विजनवासात होता. त्याने खिलजी परतल्यावर आपली माणसे जमवून ‘राणा’पद स्वीकारले. त्यानंतर चितोडगड परत घेण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. पण, त्याला यश येत नव्हते. असे म्हणतात, की अशा वेळी त्याला एक गूढ स्त्री ‘आई बिरवाडी’ हिने मदत केली. ती हिंगलाज देवीचा अवतार होती.

आणि अखेर सन १३२६ मध्ये सिंगोलीच्या लढाईत त्याने महंमद तुघलकाचा पराभव करून चितोड परत मिळविले. याच लढाईत हम्मीराने स्वत: तुघलकालाही पकडून कैदी बनविले होते, असेही म्हणतात. इथून पुढे म्हणजे सन १३२६ पासून चितोडगडावर सिसोदिया वंशाची सत्ता सुरू झाली. भारताच्या इतिहासात आपल्या शौर्यासाठी गाजलेले अनेक ‘राणा’ या वंशातील आहेत. (saptarang latest article on Sisodia dynasty)

राणा कुंभ

हम्मीरानंतर एका शतकाने सन १४३३ मध्ये त्याचा वंशज, राणा कुंभ गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत मेवाडचे राज्य कीर्तिशिखरावर होते. संपूर्ण उत्तर भारतात मेवाडचा दबदबा होता. कुंभाने आपली कारकीर्द चौफेर गाजवली. तो आपल्या हयातीत सुमारे ५६ लढाया लढला आणि जिंकला.

सर्वप्रथम त्याने आपले वडील राणा मोकलसिंह यांच्या हत्येचा सूड घेतला. नंतर मेवाडच्या जोडीने मारवाडचे राज्यही आपल्या ताब्यात घेतले‌. मेवाडचे संरक्षण करणाऱ्या ८० पेक्षा जास्त गढ्यांपैकी ३२ एकट्या कुंभाने बांधल्या आहेत. अजस्त्र असा कुंभलगड त्याने बांधला. जगात सलग बांधकाम असलेल्या ज्या प्रचंड लांब भिंती आहेत, त्यात कुंभलगडाची ३८ किलोमीटर लांबीची भिंतही येते. त्यात सात मुख्य दरवाजे आणि कित्येक बुरूज आहेत.

ही मेवाड-मारवाडची पर्यायी राजधानीही होती. माळवा आणि गुजरातच्या सुलतानांवर मिळविलेल्या विजयाचे स्मारक म्हणून कुंभाने चितोडगडात इ. स. १४४८ मध्ये ‘विजयस्तंभ’ उभारला. १२० फूट उंचीचा, नऊ मजली असा हा विजयस्तंभ आज पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. असा रणधुरंधर असलेला राणा कुंभ उत्तम वीणावादकही होता! दुर्दैव पाहा- सगळ्या शत्रूंना ज्याने पाणी पाजले, त्याची हत्या त्याचाच मुलगा उदयसिंह-१ याने केली.

राणा संग्रामसिंह

‘राणा संग’ या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला हा राजा सिसोदिया वंशातील सर्वांत लढाऊ वृत्तीचा राजा म्हणावा लागेल. आपल्या हयातीत तो शंभरावर लढाया लढला. या लढायांमध्ये त्याचा एक डोळा फुटला, एक हात तुटला, एक पाय निकामी झाला, त्याच्या अंगावर जवळजवळ ८० जखमा होत्या.

राणा संगाचे इतिहासातील सर्वांत मोठे योगदान म्हणजे मुघल घराण्याचा संस्थापक जहिरुद्दीन बाबर याच्याशी दिलेला लढा. लोधीचा पराभव केल्यावर बाबर हातपाय पसरू लागला. तेव्हा राजपूतांना एकत्र करून त्यांचे सैन्य संगाने उभे केले आणि बयानाच्या लढाईत १५२७ मध्ये आधी बाबराचा पराभवही केला; पण नंतर तोफा व दारूगोळा हे तेव्हा राजपूतांना अपरिचित असलेले तंत्रज्ञान वापरल्याने बाबराचा विजय झाला.

संगाला जखमी अवस्थेत रणांगणावरून विश्वासू सहकाऱ्यांनी उचलून नेले. त्यानंतरही संगाने बाबराचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करून मोहिमेच्या तयारीला सुरुवात केली. पण, त्याच्याच काही फितूर सहकाऱ्यांनी संगाला विषप्रयोगाने मारले! बाबरनाम्यात बाबराने नमूद केले आहे, की हिंदुस्थानात त्याला खरे आव्हान होते ते दोघांचेच. उत्तरेत राणा संग आणि दक्षिणेत विजयनगरचा कृष्णदेवराय !

राणा संग यांचा मोठा मुलगा कुंवर भोजराज हा वडिलांच्या आधीच मरण पावला होता. तो राणा झालाच नव्हता. पण, तो इतिहासात प्रसिद्ध मात्र आहे. कारण त्याची पत्नी- अजरामर कृष्णभक्त मीराबाई. त्यामुळे राणा संगांची आणखी एक ओळख म्हणजे, ते मीरेचे सासरे होते. (latest marathi news)

महाराणा प्रताप

शिवाजी महाराजांच्या जोडीने ‘मुघल-शत्रू’ म्हणून ज्यांचे नाव न चुकता घेतले जाते, ते म्हणजे महाराणा प्रताप! ‘उदयपूर’ वसविणारे राणा उदयसिंह- २ यांचा प्रताप हा मुलगा. सन १५६७ मध्ये मुघल बादशहा अकबराने चितोडगडाला वेढा घातलेला होता. उदयसिंह आपल्या सल्लागारांच्या सूचनेवरून गडातून बाहेर निघून वेढ्यावर उपाय शोधत होते.

गड रायमल राठोडाच्या ताब्यात होता. अशा परिस्थितीत रायमल ठार झाले आणि गड पडला, अकबराच्या ताब्यात गेला. असे असतानाच उदयसिंहाच्या मृत्यूनंतर सन १५७२ मध्ये प्रतापसिंह ‘राणा’ म्हणून निवडले गेले. त्यांचा गोगुंदा या ठिकाणी राज्याभिषेक झाला. अकबराने राजा मानसिंहामार्फत राणा प्रतापांना आपल्या बाजूला आणण्याचे अनेक प्रयत्न केले; पण राणांनी अकबराचा मांडलिक किंवा सहकारी होण्याचे स्पष्ट नाकारले.

आता युद्ध अटळ होते. ता. १८ जून १५७६ ला हळदीघाटी या ठिकाणी राणाजी आणि अकबर यांच्या सैन्याचे घनघोर युद्ध झाले. यात पराक्रमाची शर्थ करूनही प्रतापांना हार पत्करावी लागली. हळदीघाटीच्या युद्धात राणांच्या जोडीने त्यांचा ईमानी घोडा चेतकही अजरामर झाला. या लढाईत मुघलांची सरशी झाली; पण राजा मानसिंहाची खरी इच्छा अपूर्णच राहिली.

जखमी राणा प्रताप अखेरपर्यंत त्याच्या हाती लागलेच नाहीत. ते विजनवासातच राहिले. त्यांनी शपथ घेतली होती, की चितोड पुन्हा ताब्यात घेईपर्यंत ते कोणत्याही राजवैभवाचा उपभोग घेणार नाहीत. ही शपथ त्यांनी आयुष्यभर पाळली. शिकारीच्या दरम्यान झालेल्या जखमांमुळे त्यांचा पुढे १५९७ मध्ये मृत्यू झाला.

पण, मृत्युशय्येवर असतानाही त्यांनी आपला पुत्र अमरसिंह याला शपथ घातली, की ‘कधीही मुघलांपुढे शरणागती पत्करू नकोस आणि चितोड पुन्हा ताब्यात घे.’ विपदांचा डोंगर खांद्यावर घेऊनही अखेरच्या श्वासापर्यंत स्वाभिमानी बाण्याने कसे जगायचे असते, याचा एक आदर्श राणा प्रतापांनी घालून दिला आहे.

प्रतापांनंतर त्यांचा वंशज राणा राजसिंह- १ याने मुघलांशी सतत लढा दिला. औरंगजेबाशी तो प्राणपणाने लढला. तो शिवाजी महाराजांचा समकालीन (आणि समविचारीही) होता. ‘जिझिया’ कराविरुद्ध राजसिंहाने छेडलेला लढा इतका प्रसिद्ध झाला, की स्वत: महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात उपहासाने लिहिले होते, की ‘ताकद असेल तर जरा राणा राजसिंहांकडून जिझिया वसूल करून दाखवा...’ १६८० मध्ये औरंगजेबाने आपल्या हस्तकांकरवी विष देऊन राजसिंहांची हत्या केली.

(हाही योगायोग! महाराजही १६८० मध्येच स्वर्गवासी झाले.) यानंतरही सिसोदिया वंशात बरेच राणा होऊन गेले. पण, त्यांच्याविषयी आवर्जून सांगण्याजोगे फारसे काही नाही‌. राणा भूपालसिंह हे १९४८ मध्ये मेवाड नरेश होते. तेव्हा त्यांनी मेवाड राज्य (उदयपूर संस्थान) विलीनीकरणाच्या करारावर सही केली आणि त्यानंतरचे सर्व राजे हे केवळ नामधारी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT