Gwalior Capital of Tomars- Gwalior Fort & Gupta Iron Pillar brought from Mathura to Delhi by Anangpala. esakal
नाशिक

राजवंश भारती : तोमर वंश

Latest Tomar Dynasty News : ‘तोमर’ हे खरे तर एका प्राचीन शस्त्राचे नाव आहे. ते या वंशाला कसे मिळाले, हे सांगणे कठीण आहे. पण, ‘तोमर’ स्वत:ला परीक्षित राजाचे; पर्यायाने अर्जुनाचे वंशज मानतात. या वंशाने उत्तर भारतात सुमारे ४५० वर्षे राज्य केले.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

राजपूत समाजात ३६ मुख्य कुळे आहेत. त्यांच्यापैकी एक कूळ/वंश म्हणजे ‘तोमर’. तथापि, राजवंशांत तोमर वंशाचे नाव अग्रगण्य नाही. इतिहास कोशांमध्येही; जिथे चाहमान, गहढवाल, चंदेल आदी वंशाची अगदी सविस्तर माहिती असते, तिथे तोमरांचा उल्लेख ओझरताच सापडतो.

‘तोमर’ हे खरे तर एका प्राचीन शस्त्राचे नाव आहे. ते या वंशाला कसे मिळाले, हे सांगणे कठीण आहे. पण, ‘तोमर’ स्वत:ला परीक्षित राजाचे; पर्यायाने अर्जुनाचे वंशज मानतात. या वंशाने उत्तर भारतात सुमारे ४५० वर्षे राज्य केले. (Saptarang latest article on Tomar dynasty)

हरियाणातील ‘पेहोवा’ या ठिकाणी सापडलेल्या प्रतिहार राजा महेंद्रपाल याच्या, इ. स. ९०० च्या आसपासच्या एका अभिलेखात ‘तोमर’ वंशाचा उल्लेख प्रथम आढळतो. त्यावरून असे दिसते की तेव्हा ‘गोग्गा’ नावाचा तोमरवंशीय राजा हा महेंद्रपालाचा सामंत होता. तथापि, प्रचलित कथांवरून कळते, की तोमर वंशाची सुरुवात थेट पांडवांचा वंशज ‘क्षेमक’ या राजापासून होते.

त्याच्यानंतर १७/१८ पिढ्या उलटून गेल्यावर, आठव्या शतकात अनंगपाल- पहिला या राजाचा संदर्भ आहे. त्याने खऱ्या अर्थाने तोमर राजवंशाची स्थापना इ. स. ७३६ मध्ये केली. त्याची राजधानी ‘अनंगपूर’ येथे होती. तोमरांचे राज्य ‘हरियाना’ प्रदेशात होते. इथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे, की आजचे हरियाना राज्य लहानसे आहे. ‘हरियाना’ हा प्रदेश त्याच्या काही पटींनी मोठा होता.

दिल्लीचे तोमर

तोमर वंशात ‘अनंगपाल’ हे नाव तीन राजांचे आहे. त्यातला अनंगपाल- दुसरा हा सगळ्यात प्रसिद्ध आहे. ‘अनंगपाल तोमर’ या नावानेच तो ओळखला जातो. तो आपल्या महाभारतकालीन वंशाचा अभिमानी असावा. कारण, त्याने आपल्या राजवटीत तोमर राज्याची राजधानी अनंगपूरहून हलवून प्राचीन इंद्रप्रस्थ नगरीच्या जागेवर मुद्दाम वसवली.

या नव्या राजधानीला त्याने नाव दिले- ‘ढिल्लिका’ अथवा ‘धिल्लिका’... म्हणजेच आजची भारताची राजधानी- दिल्ली ! तिची स्थापना झाली आहे इ. स. १०५२ मध्ये. दिल्लीच्या संग्रहालयात इ. स. १३२६ (वि. संवत १३८३)चा एक शिलालेख आहे. त्यावर ओळ आहे- ‘ढिल्लिकाख्या पुरी तत्र तोमरैरस्ति निर्मिता’ दिल्ली स्थापनेचा असाच उल्लेख कुतुब संकुलातील प्रसिद्ध लोहस्तंभावर आणि ‘पृथ्वीराज रासो’ या ग्रंथातही आहे.

मथुरेत असलेला गुप्तकालीन लोहस्तंभ अनंगपाल- २ यानेच दिल्लीला आणला आणि स्थापन केला. त्याच्याजवळ कुतुबमिनार नंतर उभारला आहे. मेहरौलीला उभा केलेला हा न गंजणारा लोहस्तंभ, त्या काळी दिल्लीचा मध्यबिंदू समजला जात होता. त्याच्या भोवती अनंगपालाने शहर वसविले. त्या शहराभोवती कोट उभा केला.

त्याला ‘लाल कोट’ म्हणतात. पुढे पृथ्वीराज चौहानाच्या काळात यालाच ‘किला राय पिथोरा’ म्हणत होते. हा दिल्लीचा मूळ ‘लाल किल्ला’! आज जो लाल किल्ला आपण पर्यटक म्हणून पाहतो, तो नंतर मुघल काळात तयार झाला- ‘किला ए मुबारक’ म्हणून. लाल कोटात अनंगपालाने अनेक मंदिरे उभारली होती. ती अर्थातच नंतर दिल्लीच्या सुलतानांनी ‘धर्मकार्य’ म्हणून पाडली.

अनंगपालाने एक अनंगताल बावडी (पायरी विहीर)ही बांधली. ती आजही तिथे आहे. प्राचीन इंद्रप्रस्थ नगरीला पुनर्स्थापित करण्याचे आणि तिला ‘दिल्ली’ हे नाव व रूप देण्याचे सर्व श्रेय अनंगपाल तोमराचे आहे. स्वतंत्र भारताने अनंगपालाचे ऋण मानले पाहिजेत. कारण, आपल्या देशाची आजची राजधानी ही त्याची देणगी आहे. (latest marathi news)

अनंगपाल-२ नंतर एका शतकाने, त्याचा वंशज, अर्कपाल तथा अनंगपाल- तिसरा जेव्हा गादीवरती होता, तेव्हा- इ. स. ११५२ च्या सुमारास, चाहमान वंशाच्या विग्रहराज-४ तथा विशालदेव याने तोमरांचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली. एक कथा अशीही आहे, की अनंगपालाने आपल्या मुलीचा विवाह विग्रहराजाचा पुतण्या पृथ्वीराज चौहान याच्याशी करून दिला आणि सन ११७० मध्ये या जावयाला दिल्लीचा उत्तराधिकारी नेमले.

ही कथा ओढून-ताणून रचलेली वाटते. त्यात काळाचा, तारखांचा फारच विपर्यास होतो. तोमर वंशाची दिल्लीवरची सत्ता ११५२ मध्ये संपली, हा तपशील महत्त्वाचा! पृथ्वीराजाने तोमर वंशाकडून दिल्लीची सत्ता मिळवली खरी; पण मोहम्मद घोरीने इ. स. ११९२ मध्ये तराईच्या लढाईत पृथ्वीराजाला पराभूत करून कैद केले आणि दिल्लीला ‘सुलतानशाही’ सुरू केली.

ग्वाल्हेरचे तोमर

दिल्ली हातची गेल्यावर काही वर्षे तोमर वंश जवळजवळ अज्ञातवासात होता. नंतर दिल्लीवर तुघलक वंशाची राजवट सुरू झाली. त्यावेळी तोमर हे तुघलकांचे केवळ मनसबदार होते. सुलतानाने इ. स. १३९० मध्ये ग्वाल्हेर ताब्यात घेतले, तेव्हा वीरसिंह तोमर याला ‘खिल्लत’ म्हणजे सनद देऊन ग्वाल्हेरला पाठविले.

वर्षभरात वीरसिंहाने सुलतानाविरुद्ध बंड केले. ते सुलतानाने चिरडून टाकले. यापुढचा लाजिरवाणा इतिहास असे सांगतो, की बंडाची शिक्षा म्हणून सुलतानाने वीरसिंहाला दिल्लीच्या राजमहालात ‘पहारेकरी’ म्हणून नेमले. आणि हे काम त्याने पावसापाण्यात निष्ठेने केले म्हणून खूश होऊन सुलतानाने त्याला ग्वाल्हेरचा किल्ला ‘ईनाम’ म्हणून दिला! काही मुसलमान तवारिखकार लिहितात, की वीरसिंहाने ग्वाल्हेरचा किल्ला ‘दगलबाजीने’ मिळविला...

वीरसिंहानंतर उद्धरणदेव, विरामदेव वगैरे राजे होऊन गेले. नंतर सन १४८६ मध्ये ‘मानसिंह’ ग्वाल्हेरच्या गादीवर आला. या वंशातला तो सगळ्यात प्रसिद्ध राजा होय. ग्वाल्हेरचा किल्ला तसा खूप जुना- सहाव्या शतकातला आहे. त्याचे जुने नाव गोपगिरी आहे. पण, आज तो किल्ला आपण ज्या रूपात पाहतो, ते भव्य बांधकाम मानसिंह तोमराने केलेले आहे.

किल्ल्याच्या सौंदर्याबद्दल वादच नाही; पण मानसिंहाने आपल्या हयातीत लोधी सुलतानाशी लढण्यापेक्षा तह करण्यावर आणि खंडणी देण्यावर जास्त भर दिला. ग्वाल्हेर किल्ल्याच्या नैसर्गिक बळकटपणामुळे आणि सुलतानाच्या आजारीपणामुळे तेव्हा तो तोमरांकडे टिकून राहिला, इतकेच. मानसिंहाचा मुलगा विक्रमादित्य हा तर पानिपताच्या पहिल्या लढाईत लोधींच्या बाजूने एक मनसबदार म्हणून बाबराशी लढला होता. त्याचे पुढील वंशजही केवळ नामधारीच होते. ग्वाल्हेरचे तोमर राज्य तसे मानसिंहाच्या मृत्यूसोबत, इ. स. १५१६ मध्येच संपले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT