Mother & Son esakal
नाशिक

भाषा-संवाद : संस्कारांचं नातं संवादाशी...

सकाळ वृत्तसेवा

लेखिका : तृप्ती चावरे-तिजारे

संस्कारांचं नातं हे संवादातून रुजतं, संवादात वाढतं आणि संवादातच टिकत असतं. लहान बाळाचं मन मातीच्या गोळ्याप्रमाणे असतं, आपण जसा आकार देऊ तसं ते घडतं.. छोटी छोटी नित्यकर्मे करीत असताना मनाला आकार कसा द्यावा, याची जी शिकवण महाराष्ट्रातील संतमंडळींनी दिलेली आहे, मला वाटतं तिलाच ‘संस्कार’ असं म्हणतात. जे एक आई आपल्या बाळाला सहज देऊ शकते. (saptarang latest article on Relation of Sanskar with Communication)

‘माणूस हा येताना एकटा येतो आणि जातानाही एकटाच जातो’ हे वाक्य आपण अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकत असतो, पण तरीही एकटेपणाच्या परिघातही, या मायाजगतात येण्याआधीच तो विविध नात्यांशी, अनेक प्रकारे कळत-नकळत बांधला जात असतो. या अनेक नातेसंबंधांपैकी एखादंच नातं हिऱ्यासारखं असतं! आपल्यातले खास, स्वयंभू, अनमोल आणि अनोखे पैलू प्रकाशित करणारं नातं, कोणत्याही नात्यापेक्षा सगळ्यात जास्त उत्कटपणे व्यक्त होणारं...

हे नातं म्हणजे आईचं आणि बाळाचं जिव्हाळ्याचं नातं... या नात्याच्या संवादात अगदी गर्भातूनच व्यक्तिमत्त्वाच्या अंतरंगाला पैलू पडत असतात. भावभावना, भाषा आणि संवादाचे पैलू घडविणारं हे मृदू, रेशमी आणि हळवं नातं... संस्कार, संवेदना रुजविणारं नातं आणि अनेक नात्यांमधलं एक खास नातं! जिव्हाळा, प्रेम, सभ्यता, स्वाभिमान, ऋजुता, मर्यादा, संयम आणि संस्कार घडवणारं हे नातं जोडलं जात असतं, ‘भावसंवादाच्या’ नाजूक; पण मजबूत धाग्यानं... हा भावसंवाद म्हणजेच या नात्याची भाषा! गर्भात असल्यापासूनच मनाला, वाचेला आणि बुद्धीला योग्य वळण कसं लावावं, यासाठी दत्त परंपरेतील एका सुंदर पदाचा उल्लेख इथे मला करावासा वाटतो---

कृष्णा तुज घालिते बुडबुड,

बोलणं तुझं बा मोठं गोड,

निजस्वरूपी लावुनी मज वेड,

तू शामसुंदर रूप रोकडं,

भक्ता लाड पुरविसी,

दासा लाड पुरविसी...

बुडबुड म्हणजे स्नान; अर्थात, एक महत्त्वाचं नित्यकर्म... देहावर साचलेला मळ स्वच्छ करणं जितकं महत्त्वाचं, तितकंच मनावर साचलेला मळ स्वच्छ करणंही महत्त्वाचं... यासाठी निजरूपाकडे पाहायला लावणारा हा अभंग. हे निजरूप म्हणजेच आपल्या आतमधला कृष्ण! आपल्या बाळाला स्नान घालताना हे पद म्हणून त्याच्या मनावर हे निजरूप ठसावं, असा यामागचा एका आईचा संवादभाव किती सुरेख आहे.

कमी शब्दात जीवनाचा किती मोठा आशय या पदातून रुजविला जातो! मुलांच्या निरागस मनावर सदाचार बिंबविणे हेच तर खरं भाषेचं काम आहे! पण ती भाषा बाळाची आई कोणत्या दर्जाने वापरते याला फार महत्त्व आहे. वरील पद म्हणजे पारंपरिक भाषासंस्कारातून व्यक्तिमत्त्व विकासाची सुरवात आहे. (latest marathi news)

आदर्श मातृत्वाच्या कक्षेत, ‘संस्कार रुजविणं’ हा एक अखंड आणि अविरत प्रवास असतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे आई हा प्रयत्न करीत, बालमनावर काहीतरी रुजवीत असते. सकाळी बाळाला उठविताना प्रार्थना म्हणणे व म्हणायला शिकवणे हादेखील बालसंगोपनाचा एक साधा आणि सरळ उपचार...

प्रभाते मनी राम चिंतित जावा,

पुढे वैखरी राम आधी वदावा...

सदाचार हा थोर सांडू नये तो,

जनीं तोच तो मानवी धन्य होतो...

सकाळी उठल्या उठल्या म्हणायचा समर्थ रामदासांचा हा सुंदर श्लोकसंवाद आपल्याला काय बरं शिकवतो? प्रभात म्हणजे सकाळचा संधिकाळ... शरीराचा आणि मनाचा संधिकाळ... अशा या प्रभातसमयी सर्वप्रथम आपल्या आतमधला राम जागा करावा. सकाळी शरीर जागं झालं तरी मन आणि चित्त मात्र निद्रावस्थेत असतं. या मनाला जागं करताना जर आपण वैखरीने (म्हणजे

मुखाने) रामाचं नाव घेतलं, तर दिवसभर वाचा तर शुद्ध राहतेच, त्याचबरोबर सदाचारही उत्तम राहतो. लहान मुलं ही घरातील मोठ्यांच्या बोलण्याचं अनुकरण करीत वाढत असतात. त्यामुळे मुलांवर संस्कार करीत असताना आपण स्वतःच्या भाषेची पारख अशा लोकांच्या आधारानं करणं महत्त्वाचं ठरतं.

‘मातृमुखेन भोजनम...’ आई आपल्या बाळाला जेव्हा घास भरवते, तेव्हा त्यातून केवळ अन्नरसच नव्हे, तर संस्कारही पाझरत असतो, म्हणून बाळाला जेऊ घालताना तिने खालील श्लोक आवर्जून म्हटला पाहिजे व मुलालाही शिकवला पाहिजे...

‘‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे

सहज हवन होते नाम घेता पुकाचे

जीवन करी जिवीत्वा अन्न हे पूर्णब्रह्म

उदर-भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’’

आचारमूल्ये रुजवणारं किती सुंदर तत्त्वज्ञान या साध्या सोप्या श्लोकात सांगितले आहे! असे अनेक मराठी श्लोक आहेत. भोजन ही एक साधी कृती आहे. पण आपण करीत असलेल्या प्रत्येक कृतीमागे काहीना काही दर्जात्मक विचार असावा हा ‘संस्कार संवाद’ आई आपल्या बाळामध्ये अशा मराठी श्लोकांमधून रुजवू शकते. (latest marathi news)

Also read:धपाटा

सायंकाळ म्हणजे पुन्हा एकदा शरीराचा आणि मनाचा संधिकाळ... दिवसभर झालेली शरीराची आणि मनाची विसंगती दूर करण्यासाठी मनाला शांत करणारे संस्कार आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकविले. पण आपलं त्याकडे लक्ष जात नाही. ‘शुभंकरोती कल्याणम्’ म्हणून झाल्यावर दिव्याची प्रार्थना करण्याचा एक संस्कार आपल्याकडे आहे.

दिव्या दिव्या दीपत्कार

कानी कुंडल मोतीहार,

दिव्याला पाहून नमस्कार,

दिवा लावला देवापाशी,

उजेड पडला तुळशीपाशी,

नमस्कार माझा, सर्व देवांच्या पायापाशी...

आजकाल आपल्या अवतीभवती रोषणाईचा इतका झगमगाट असतो, की देवासमोर दिवा लावावा हे लक्षातच राहत नाही. देवाजवळ दिवा लावणे ही अंधश्रद्धा नाही, तर तो एक शुभसंस्कार आहे या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या आतमध्ये ज्ञानाचा दिवा लावण्याचा अर्थ या श्लोकाच्या उच्चारणाने उमटतो.

कानाने चांगले ऐकावे, मनाने नम्र व्हावे, हाताने नमस्कार करावा आणि अहंकार सोडण्यासाठी सगळ्यांना नमस्कार करावा हे शिकविणारी ही भाषेची कमाल नीतीला धरून आहे. थोरामोठ्यांनी ही भाषा वापरली, तरच लहान मुलंही ती वापरतील, नाही तर त्यातील शब्द आणि अर्थ त्यांच्या व्यक्तिमत्त्वापासून दूरच राहील.

बाळाला रात्री झोपवताना आईने अंगाई गीत म्हणण्याची प्रथा आता जुनी झाली आहे. ‘नीज माझ्या नंदलाला’ यासारख्या अनेक अंगाई गीतांमधून आईचा आणि बाळाचा भावसंवाद ‘एक’ होत असतो. आईसाठी संस्कार रुजविण्याची ही एक संधी असते.

‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ यातील ‘चंद्र’ हे मनाचं प्रतीक आहे, हा अर्थ समजला तर दिवसभर बाळाच्या मागे धावणारं आईचं मनही शांत होईल, नाही का? अशा अनेक गमतीजमती आहेत. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आईचा आणि बाळाचा चालणारा हा भाषासंवाद म्हणजेच खरा भावसंवाद आणि तो किती उत्कटतेने साधावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न...

लहान बाळाचं मन मातीच्या गोळ्याप्रमाणे असतं, त्याला आपण जसा आकार देऊ तसं ते घडतं... छोटी छोटी नित्यकर्मे करीत असताना मनाला आकार कसा द्यावा, याची जी शिकवण महाराष्ट्रातील संतमंडळींनी दिलेली आहे, मला वाटतं तिलाच संस्कार असं म्हणतात; जे एक आई आपल्या बाळाला सहज देऊ शकते.

संस्कारांना चहूबाजूंनी खतपाणी घालणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘वात्सल्य प्रेम’. आपल्या बाळात ‘प्रेम’ ही भावना तेव्हाच रुजेल, जेव्हा आईचं वर्तन वात्सल्याचं आणि प्रेमपूर्वक असेल. आईच्या आणि घरातील मोठ्यांच्या आचार-विचार आणि उच्चारातून उमटणारे संस्कार जेव्हा आचरणात येतात; त्यातूनच सद्-विचार, सद्-उच्चार आणि सद्आचार जन्माला येत असतात. कारण संस्कारांचं नातं हे संवादातून रुजतं, संवादात वाढतं आणि संवादातच टिकत असतं. 

(क्रमशः)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT