Marathi Language esakal
नाशिक

भाषासंवाद : मायमराठीला जगन्मान्य अभिजात मराठी दर्जा!

Latest Marathi Article : अभिजात भाषा दर्जा हा केवळ एक सन्मान नसून, मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठीची जबाबदारी आणि संधी आहे.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : तृप्ती चावरे- तिजारे

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. मराठीतील प्राचीन साहित्याचे जतन, अनुवाद आणि संशोधन वाढेल. याशिवाय, मराठी भाषा शिक्षण आणि साहित्याला अधिक महत्त्व प्राप्त होईल. मराठीच्या संवर्धनासाठी अभ्यासक्रमातही काही बदल अपेक्षित आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठीचे महत्त्व अधिक वाढविता येईल. अभिजात भाषा दर्जा हा केवळ एक सन्मान नसून, मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठीची जबाबदारी आणि संधी आहे. (saptarang latest article on marathi language)

केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ दर्जा बहाल केला आणि प्रत्येक मराठमोळ्या मनाला आनंदाचे उधाण आले. मराठी भाषेच्या समृद्ध पिढ्यांचा आणि परंपरेचा सन्मान करीत, केंद्र सरकारने केलेली ही ऐतिहासिक घोषणा म्हणजे मराठी भाषेच्या गौरवशाली परंपरेला दिलेला सर्वोच्च सन्मान आहे. वर्षभरापासून मी ‘भाषा संवाद’ हे मराठी भाषाविषयक सदर ‘सकाळ’मध्ये लिहिते आहे, त्यामुळे असे क्रांतिकारी पाऊल केंद्र आणि राज्य सरकारने उचलले, याचा मराठी भाषाप्रेमी म्हणून मला विशेष आनंद झाला आहे.

‘अभिजात भाषा’ हा दर्जा म्हणजे मराठी भाषेच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला मिळालेला वैश्विक आदर. ज्या भाषेने शतकानुशतके आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा जगावर उमटवला आहे; साहित्य, संस्कृती, विचार आणि कला यांत जी भाषा समृद्ध आहे; त्याच भाषेला ‘अभिजात भाषा’ म्हणून गौरविले जाते. हा वैशिष्ट्यपूर्ण दर्जा मराठी भाषेला मिळाल्याने मराठीच्या संवर्धन आणि‌ विकासासाठी राजकीय पाठबळ व अधिक निधी उपलब्ध होईल, ज्यातून जागतिक भाषा संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे. या दर्जामुळे मराठी भाषेला जगभरात सन्मान मिळेल आणि तिच्या समृद्ध, तत्त्वज्ञानी आणि साहित्यिक परंपरेला नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मार्ग सुकर होईल.

तमीळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम यांसारख्या भारतीय भाषांमध्ये ‘मराठी’ही आता एक विशेष स्थानावर विराजमान झाली. अभिजात भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक भारतीय भाषांच्या यादीत आता मराठीचा समावेश होणे म्हणजेच जगभरातील साहित्य विश्वात मराठी भाषासंस्कृतीची पताका दिमाखात फडकणार, याची नांदी आहे. मराठी भाषेला आता अधिक आदर, महत्त्व आणि विशेष प्रोत्साहन मिळेल. ज्यामुळे मराठीच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर नवे पाऊल उचलता येईल.

महाराष्ट्राचे नवे सांस्कृतिक धोरण : एक महत्त्वाची पायरी :

महाराष्ट्र शासनाने नुकतेच सादर केलेले ‘मराठी भाषा संवर्धन आणि वाचन संस्कृती’ या विषयाला महत्त्व देणारे नवे सांस्कृतिक धोरण मराठी भाषेच्या पुनरुत्थानाची नवीन दिशा दाखविणारे ठरले आहे. या धोरणातून मराठी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने अनेक निर्णायक पावले टाकली गेली.

जणू याच नव्या धोरणाचे स्वागत करीत केंद्र सरकारने मराठीला अभिजात दर्जा दिल्याने मराठी भाषेच्या उन्नतीचा जागतिक मार्ग मोकळा झाला आहे. खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी या नव्या धोरणाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा उचलला आहे. केंद्राची राजमान्यता आणि राज्याचे मुत्सद्दी धोरण हा अभूतपूर्व संगम विनयजींनी घडवून आणल्याने मराठी भाषेला ही प्रतिष्ठा लाभली.

मराठी भाषेत साहित्य, संगीत, चित्रपट, नाटक आणि लोककला यांचे जागतिक प्रसारण वाढविण्याची मोठी क्षमता आहे. मात्र, यासाठी मराठी भाषेतील अद्वितीय, पिढीजात, घरंदाज व संतकुलीन साहित्याचा आणि तत्त्वज्ञानाचा विविध भाषांमध्ये अनुवाद करणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषा व तिच्या संस्कृतीचे महत्त्व पटवून देणे तितकेच आवश्यक आहे.

मराठी भाषेची उपयुक्तता, संवर्धन आणि विनिमय हे केवळ भाषा साहित्यापुरतेच मर्यादित न राहता, ते व्यवसाय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही वापरले जावेत, यासाठी एक मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. आज जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस पोहोचला आहे, त्यामुळे त्याने ठरविले तर या अभिजात मराठी दर्जाचे सोने होऊ शकते.

जगात मराठी भाषिकांनी निर्माण केलेल्या विविध व्यावसायिक बाजारपेठांमध्ये मराठी भाषेचा प्रभावी वापर केल्यास मराठी भाषेबरोबरच त्याच्या व्यवसायवृद्धीलाही चालना मिळू शकते. तंत्रज्ञान क्षेत्रात मराठी भाषेसाठी असलेला वाव, गुंतवणूक, एआय (Artificial Intelligence) आणि भाषांतर सेवांमध्ये मराठीचा वापर यामुळे मराठी भाषा व्यवसाय वृद्धीसाठी एक महत्त्वाचा भाग होऊ शकते.

इतर जागतिक भाषांप्रमाणे मराठी शिकण्याचे महत्त्व पटवून देणे हा आता एक महत्त्वाचा आणि आव्हानात्मक विषय बनला आहे. यासाठी मराठी भाषेच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरेने मराठीला जागतिक स्तरावर पुढे नेण्याची गरज आहे. (latest marathi news)

यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये मराठी अभ्यासक्रम सुरू करता येतील. ऑनलाइन भाषाशिक्षणाचे कोर्सेस विकसित करता येतील, आणि असे बरेच काही करता येईल. इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन अशा भाषांच्या सोबत आता मराठीही एक जागतिक भाषा म्हणून शिकली जावी, ही अपेक्षा योग्य आहे.

मात्र, त्यासाठी मराठी भाषेच्या शिकवणीत आधुनिक शिक्षण पद्धतींचा वापर करून ऑनलाइन कोर्सेस, व्याख्यानमाला, मराठी पॉडकास्ट आणि इतर शिक्षण साधने कशी उपलब्ध करून देता येतील, या विचाराला जाणकारांनी दिशा दिली पाहिजे. मराठी भाषेतील शाश्वत मूल्ये आणि तिचे वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्य लोकांसमोर आणण्यासाठी आता सर्वच घटकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे.

आजच्या आधुनिक काळात, जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे अनेक स्थानिक भाषा संकटात सापडल्या आहेत. मराठीही याला अपवाद नाही. महाराष्ट्रातही तरुण पिढीच्या रोजच्या जीवनात इंग्रजीचे वर्चस्व वाढत आहे, ज्यामुळे मराठी भाषेच्या वापरात घट होत आहे.

शहरी भागात विशेषतः मराठीची सर्रास उपेक्षा होत असल्याचे दिसून येते. मराठी माध्यमातील शाळांची घटती संख्या, मराठी पुस्तकांचे वाचन कमी होत जाणे, आणि नव्या माध्यमांमध्ये मराठी भाषेचे अस्तित्व कमी होणे, हे चिंतेचे विषय आहेत. असे असले तरीही, मराठी भाषेचा इतिहास आणि संस्कृतीच्या मुळाशी असलेली समृद्धता पाहता, तिचे भविष्य उज्ज्वल राहू शकते.

अभिजात दर्जा मिळाल्याने या भाषेचे पुनरुत्थान करण्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि सामाजिक स्तरावर नवे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. मराठी माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने जोडता येते, कारण मातृभाषेतून संवाद साधणे नेहमीच अधिक प्रभावी ठरते, हे व्यवसायसूत्र ज्याला समजेल तो मराठी उद्योजक अधिक यशस्वी ठरेल.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. अभिजात भाषा दर्जा हा केवळ एक सन्मान नसून, मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठीची जबाबदारी आणि संधी आहे. सर्वांनी संघटितपणे या संधीचे सोने केले पाहिजे. या वाटचालीत मराठी भाषेला नवा जागतिक आयाम मिळवून देण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषाप्रेमीने उचलली पाहिजे, आणि त्यासाठीचा मूलमंत्र म्हणजे “आमच्या बाजारपेठेत या आणि आमची भाषा शिका.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT