नाशिक : मासिक पाळी आली असल्याच्या कारणातून वृक्षारोपण करण्यास नकार दिल्याप्रकरणी नाशिक प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी वर्षा मिणा यांनी शाळेस भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. गुरुवारी (ता. २८) या प्रकरणाचा अहवाल त्यांच्याकडून वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाऊ शकतो; परंतु या प्रकरणी संबंधित शिक्षकावर कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान, वृक्षारोपणावेळी संबंधित विद्यार्थिनी शाळेतच गैरहजर असल्याची चर्चा प्रकल्प कार्यालयात दबक्या आवाजात सुरू होती.
देवगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी हीस शाळेतील शिक्षकांनी वृक्षारोपण करण्यापासून अडविण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने श्रमजीवी संघटनेसह येऊन अपर आयुक्त कार्यालयात रीतसर तक्रार दाखल करत शिक्षकास निलंबित करण्याची मागणी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आदिवासी आयुक्तांनी अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालयास चौकशी करण्याचे निर्देश दिले. राज्य महिला आयोगाने दखल घेत अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीदेखील या प्रकरणाची चौकशी करत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
तक्रारीच्या अनुषंगाने प्रकल्प अधिकारी वर्षा मिणा यांनी बुधवारी (ता. २७) देवगाव येथील शाळेवर जाऊन सविस्तर माहिती घेतली. शिक्षक, मुख्याध्यापक आणि संबंधित विद्यार्थिनी आणि इतर विद्यार्थिनींसोबतदेखील चर्चा केली. गुरुवारी (ता. २८) ते अपर आयुक्त कार्यालयास अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकावर कारवाईची मात्र टांगती तलवार आहे.
‘दबक्या’ आवाजात चर्चा
मासिक पाळी आली असल्याच्या कारणातून वृक्षारोपण करण्यास मज्जाव केल्याची घटनेची दखल सर्वत्र घेण्यात आली आहे. याचा निषेधदेखील नोंदविला जात आहे. मात्र या प्रकरणात आता विभागात दबक्या आवाजात वेगळीच चर्चा होऊ लागली आहे. शाळेकडून वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबविला असता संबंधित विद्यार्थिनी शाळेत गैरहजर होती. तसेच मागील काही दिवसांपासून ती शाळेत गैरहजर असल्याने विद्यार्थिनीस पालकांनी शाळेत आणण्यासंदर्भात सांगण्यात आले होते.
महिला शिक्षिकांच्या वाहनाला अपघात
शासकीय आश्रमशाळा या निवासी स्वरूपाच्या असतात. त्यामुळे शाळेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षकांना आपल्या मुख्यालयी थांबणे बंधनकारक असते. देवगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराची माहिती ही संपूर्ण राज्याला झाली होती. त्याअनुषंगाने प्रकल्प अधिकारी शाळेला भेट देणार होत्या. त्यामुळे शाळेवर नियुक्त असलेल्या महिला शिक्षिकांनी नियमानुसार शाळेत (मुख्यालयी) थांबणे गरजेचे होते. प्रकल्प अधिकारी वर्षा मिणा भल्या सकाळीच शाळेवर चौकशीसाठी आल्या होत्या. याची माहिती तिघा महिला शिक्षिकांना (दोन नियमित, एक रोजंदारी) मिळताच त्या तत्काळ शाळेकडे चारचाकी वाहनाने रवाना झाल्या. या वेळी शाळेपासून काही अंतरावरच एका वळणावर चारचाकीस अपघात झाला. यात तिघी जखमी झाल्या. शहरानजीक असलेल्या आश्रमशाळेवर नियुक्त शिक्षक, शिक्षिका मुख्यालयी थांबत नसल्याच्या गोष्टीला दुजोरा मिळला आहे.
‘अंनिस’कडून विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपण
मासिक पाळीच्या कारणामुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपण करण्यापासून मज्जाव केल्याच्या प्रकारानंतर बुधवारी (ता. २७) महाराष्ट्र ‘अंनिस’च्या पदाधिकाऱ्यांनी देवगाव येथील शासकीय कन्या आश्रमशाळेवर जात मासिक पाळी आली म्हणून ज्या विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास प्रतिबंध केला होता, त्याच विद्यार्थिनीच्या हस्ते मुख्याध्यापक, शिक्षक, शासकीय अधिकारी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले. त्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या मनातील अंधश्रद्धा जाणून घेतल्या. चमत्कारांचे, प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून घेतले. विद्यार्थिनींच्या मनातील मासिक पाळी संदर्भातील समज व गैरसमज, अंधश्रद्धा, भीती दूर करण्याच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात आले. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, संजय हरळे, दिलीप काळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.