Nashik News : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत तब्बल २६ तास मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी बाजी मारली. विजयी होण्यासाठी आवश्यक ३१ हजार ५७६ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी १९ व्या फेरीपर्यंत मतमोजणी झाली. (Shiv Sena candidate Kishore Darade won in election of Nashik division teachers constituencies)
विशेष म्हणजे सोमवारी (ता. १) सकाळी आठला सुरू झालेली मतमोजणी सलग २६ तासांनी मंगळवारी (ता. २) सकाळी १० दहाला पूर्ण झाली. विधान परिषदेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवत किशोर दराडे यांनी शिक्षक मतदारसंघात सलग दोन वेळा विजयी होण्याचा इतिहास या निवडणुकीत रचला आहे. नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ असलेल्या शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी नाशिकमध्ये पार पडली.
विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह पाच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी याठिकाणी उपस्थित होते. सकाळी आठपासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. मतपेटीत बंदिस्त ६४ हजार ८४६ मतांची ५० च्या गठ्ठ्यांमध्ये विभागणी केल्यानंतर प्रत्येक टेबलवर एक हजार मतपत्रिका देण्यात आल्या. त्यातील एक हजार ७०२ मते अवैध ठरल्यामुळे एकूण ६३ हजार १५१ वैध मतांच्या आधारे कोटा निश्चित करण्यात आला.
उमेदवाराला विजयी होण्यासाठी ३१ हजार ५७६ इतका मतांचा कोटा निश्चित करून देण्यात आला. पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी आघाडी घेतली. पहिल्या ३० हजार मतांमध्ये त्यांना एक हजार ७७५ मतांची आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत हा आकडा तब्बल नऊ हजारांवर जावून पोचला. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार विवेक कोल्हे व दराडे यांच्यातील अंतर नऊ हजारांवर राहिले आणि दराडे हे विजयाच्या कोट्यापासून अवघे पाच हजार मतांनी दूर राहिले. (latest marathi news)
पहिल्या पसंतीची सर्व मते मोजल्यानंतर रात्री सुमारे एकपासून दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यास सुरवात झाली. सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारापासून ही मतमोजणी सुरू झाली. क्रमाक्रमाने एक-एक उमेदवार बाद करून त्यांना मिळालेल्या मतांमध्ये दुसऱ्या पसंतीची मते किशोर दराडे व विवेक कोल्हे यांना देण्यात आली.
तब्बल १९ व्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना बाद ठरवून त्यांना मिळालेल्या मतांची मोजणी करण्यात आली. अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारांमध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ मतांचा कोटा १९ व्या फेरीत किशोर दराडे यांनी पूर्ण केला. त्यांना पाच हजार ६० मते मिळाली आणि विजयाचा गुलाल त्यांनी उधळला. पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मिळून दराडेंना एकूण ३२ हजार ३०९ मते मिळाली.
विवेक कोल्हे यांना पहिल्या पसंतीची १७ हजार ३९३ मते मिळाली, तर दुसऱ्या पसंती क्रमाची सहा हजार ७२ मते मिळाल्याने त्यांना एकूण २४ हजार २८६ मते मिळाली. या संपूर्ण प्रक्रियेला तब्बल २६ तासांचा अवधी लागला. सोमवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी मंगळवारी सकाळी दहाला पूर्ण झाली. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी महायुतीचे विजयी उमेदवार किशोर दराडे यांना प्रमाणपत्र दिले.
या वेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार, जिल्हाधिकारी जलज शर्मा (नाशिक), जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ (अहमदनगर), जिल्हाधिकारी अभिनव गोयल (धुळे), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (जळगाव), जिल्हाधिकारी मनीषा खत्री (नंदुरबार), सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.
मध्यरात्री फटाके, सकाळी गुलाल
महायुतीचे उमेदवार किशोर दराडे हे सलग दुसऱ्यांदा विजयी मार्गावर असल्याचे समजताच येवल्यात दराडे समर्थकांनी मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. तसेच सकाळी नऊला मतमोजणीच्या ठिकाणी विजयी उमेदवार दराडे व शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांना समर्थकांनी खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. गुलालाची उधळण करत ‘किशोर भाऊ तुम आगे बढोऽऽऽ’ अशा घोषणा देत विजयोत्सव साजरा करण्यात आला.
"महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी सहा वर्षांत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या कामाची ही पावती आहे. शिक्षक हे विकासाचे व्हिजन ठेवून मतदान करतात. भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना विकासाचे कार्य कोण करू शकते, याचा विश्वास असल्याने आज आमचे उमेदवार पुन्हा विजयी झाले. निवडणुकीत अनेक वावड्या उठविण्यात आल्या; मात्र सुज्ञ मतदारांनी या बाबींना थारा दिला नाही. पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात शिवसेना व महायुती अभेद्य असल्याचे अधोरेखित झाले." - दादा भुसे, पालकमंत्री
"शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय हा महायुतीवर मतदारांचा असलेला विश्वास आहे. शिक्षक हे सुज्ञ मतदार असतात. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पुन्हा निवडून देत इतिहास घडविला. राज्य सरकारवरील विश्वास वाढत असल्याचे यातून दिसून येते. येत्या काळात याच पद्धतीची कामगिरी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत." - भाऊसाहेब चौधरी, सचिव (शिवसेना)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.