Nashik News : राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरुपी शत्रू नसतो आणि मित्रही नसतो, असे कायमच म्हटले जाते. याची प्रचिती नुकतीच सिन्नरच्या नागरिकांना आली. आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात राजकीय आखाड्यात उतरणारे कट्टर विरोधक म्हणून परिचित असलेले माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि आमदार माणिकराव कोकाटे हे लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आल्याचे दिसून आले. (Nashik Lok Sabha Election)
सिन्नरच्या अलिकडच्या पंधरा वीस वर्षातील राजकारणाची वाटचाल पाहिली तरी ती द्विकेंद्री राहिलेली आहे. आमदार ॲड. माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या दोन कुटुंबातील राजकीय वर्चस्वाचा संघर्ष राहिला आहे. दोन कुटुंबाभोवती फिरणारे हे सिन्नरचे राजकारण लोकसभा निवडणूकीत मात्र नेमके उलटे राहिले.
राजकारणात परस्परांचे विरोधक असूनही लोकसभा निवडणूकीत मात्र आपल्या विरोधकाचे भलेच व्हावे अशीच भूमिका दोन्ही नेत्यांची पाहायला मिळाली. कधी नव्हे; ते दोन्ही नेत्यांचे राजकीय हितसंबध समान पातळीवर आल्याने परस्परांना पूरक ठरेल अशीच वेळ राजकारणाने आणली. विरोधकाला मदत व्हावी अशीच वेळ दोन्ही कुटुंबातील या परस्पर विरोधक नेत्यावर आणली. विशेष म्हणजे अडचण होत असूनही ॲड. कोकाटे यांनी हे संबंध निभावल्याचे बोलले जात आहे.
हितसंबंधाचे वर्तुळ पूर्ण
गेल्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने याची सुरुवात झाली. आमदार ॲड. कोकाटे गेल्या लोकसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूकीत उभे होते. सिन्नर राजकियदृष्ट्या जागरुक असलेल्या तालुक्यातील नेता लोकसभेसाठी उभा म्हटल्यावर सिन्नर तालुका एकसंघपणे अपक्ष असलेल्या कोकाटे यांच्यासोबत उभा राहिला. त्यावेळी राजकीय विरोधक असलेल्या राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरला काम करतांना देखलेपणाने विरोधकाची भूमिका निभावली मात्र त्यात जोर नव्हता. (latest marathi news)
गेल्या वेळच्या प्रचारात कोकाटे यांच्या समर्थकांना फार दुखावणारा प्रचार त्यांनी केलाच नाही. विरोधक असूनही कुठलाही तीव्र किंवा जोरकस प्रचार न करता विरोधकाची तटस्थ भूमिका वठविणाऱ्या वाजे यांनी जी सौम्य व देखलेपणाच्या विरोधाची भूमिका घेतली, त्याची परतफेडीच्या रुपाने परतावा यावेळी त्यांना ॲड कोकाटे समर्थकांकडून मिळाल्याचे उघड बोलले जात आहे.
कोकाटे तटस्थ
राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कोकाटे प्रचारात दिसलेच नाहीत. विरोधकाचे हितसंबध जोपासण्याचे वर्तुळ त्यांनी पुर्ण करतांना सुरुवातीला प्रचारात सहभाग घेतला नाही. शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी गोडसे यांच्यासाठी प्रचार सुरु केल्याचे दाखविले. पण तोपर्यत वाजे यांना बराच अवधी मिळाला.
मुळातच गोडसे यांच्या आधी पंधरा दिवस ते तीन आठवडे उमेदवारी जाहीर झाली होती. त्यात गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आठवडाभर कोकाटे तटस्थच राहिले. या सगळ्यातून सिन्नरच्या मतदारांत जो संदेश जायचा तो बरोबर पोहोचविण्यात या दोन्ही नेत्यांतील मूक संवाद पोहोचून गेला. आघाडीचे उमेदवार म्हणून वाजे विजयी झालेच तर सिन्नरचे मैदान आयतेच मोकळे मिळणार असल्याने ॲड. कोकाटे यांनी करेक्ट संधी साधून मूक सहकार्याची उतराई केली.
एकूणच राजकारणाने विरोधक असूनही दोन्ही आजी- माजी आमदारांना एकत्र आणले. परिणामी, विरोधक असूनही मतभेद विसरून राजाभाऊंना लोकसभेत पाठवायचे, या राजकिय हिशेबाने आमदार माणिकराव कोकाटे सुरुवातीला गोडसे यांच्या प्रचारापासून तटस्थ राहिल्याने मतदारांनी बोध घेतला. त्यामुळेच राजाभाऊ वाजे यांच्या मतांच्या टक्केवारीत वाजे विषयीच्या सहानुभूतीसोबतच कोकाटे यांच्या मूक सहकार्याचा हातभार असणारच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.