वावी : मुंबई, नाशिक कडून येणाऱ्या साई भक्तांना शिर्डीचा मार्ग सुकर करण्यासाठी महामार्गाचे चौपदरीकरण झाले. मात्र या महामार्गावर सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे स्थानिकांना, विशेष करून दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
गेल्या पाच महिन्यात मुसळगाव ते पाथरे जिल्हा हद्दीदरम्यान शिर्डी महामार्गावर दहा जणांचा बळी गेला असून जखमी होऊन जायबंदी झालेल्यांची संख्या 20 पेक्षा अधिक आहे. शिर्डी महामार्गावर होणाऱ्या अपघातांकडे न्हाई प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. या संपूर्ण टप्प्यात असणाऱ्या ब्लॅक स्पॉट्सवर तातडीने अपघात प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज आहे. (Nashik Shirdi Highway dozens victims in 5 months)
नाशिक - पुणे महामार्गाला गुरेवाडी फाट्यापासून ते सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहती दरम्यान शिर्डी महामार्गाला बायपासने जोडण्यात आले. तिथून पुढे शिर्डीच्या सावळीविहीर पर्यंत जुन्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत हायब्रीड एनुईटी मॉडेल्स हम तत्त्वावर हा महामार्ग बांधण्यात आला असून मुसळगाव पासून महामार्गाला समांतर पदयात्री मार्ग देखील साकारण्यात आला आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या साई भक्तांच्या प्रवास सुखकर व्हावा यासाठी पुढाकार घेण्यात आला असला तरी सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे स्थानिक जनतेचा व दुचाकी स्वरांचा जीव मात्र धोक्यात आला आहे.
महामार्ग बांधकाम करताना ब्लॅक स्पॉट्स लक्षात घेतले गेले नाही. त्यामुळे असंख्य ठिकाणी रस्ता ओलांडताना जीवावर बेतनाऱ्या घटना घडल्या आहेत. सिन्नरच्या पूर्व भागातून शिर्डी महामार्गावरून दररोज शेकडो कामगार मुसळगाव माळेगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगारासाठी जातात.
इतर नागरिक देखील दैनंदिन कामासाठी दुचाकीने या महामार्गावरून प्रवास करत असतात. महामार्गावरून अनियंत्रित वेगाने वाहने धावत असल्यामुळे अनेकदा दुचाकी स्वरांना अपघात झाले आहेत. पोलीस विभागाकडून प्राप्त माहितीनुसार मुसळगाव ते पाथरेदरम्यान जानेवारीपासून दाखल अपघातांची संख्या वीस च्या वर आहे.
या अपघातांमध्ये सुमारे दहा जणांचा बळी गेला असून 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांवर विकलांग होण्याची वेळ आली आहे. अनेक लहान अपघातांची तर नोंद देखील झालेली नाही. अपघात घडल्यानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळी न थांबता धूम ठोकतात. (latest marathi news)
राष्ट्रीय महामार्ग विभागाने शिर्डी महामार्गावरील ब्लॅक स्पॉट्सचे तातडीने सर्वेक्षण करावे. रस्ते क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी गतिरोधकांची उभारणी करावी, जोड रस्त्यांवर गतिरोधक उभारावेत. महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा नियंत्रित राहील या दृष्टीने नियोजन करण्याची गरज अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झाली आहे.
पाथरे येथे पोहेगाव रस्ता, पाथरे बस स्टँड, मलढोण फाटा, मिरगाव फाटा, वावी येथील पाहुणचार हॉटेल, साई भक्त निवास, फुलेनगर फाट्यावर शर्वरी लॉन्स, देवपूर फाटा, भोकणी फाटा, फरदापुर फाटा, खोपडी येथील महानुभाव दत्त मंदिर, खोपडी गाव, दातली फाटा आदी ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र तयार झाले आहे. सदर ठिकाणी दिशादर्शक फलक पांढरे पट्टे तसेच ब्लिंकर बसवण्यापलीकडे रस्ता ओलांडणाऱ्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही.
गेल्या आठवड्याभरात शिर्डी महामार्गावर वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातांमध्ये तिघा जणांचा बळी गेला असून चार ते पाच जण जखमी झाले आहेत. मिरगाव फाटा येथे सलग दुसऱ्या दिवशी एकाच स्पॉटवर अपघात घडले. त्यात दोघांचा बळी गेला.
भोकणी फाटा येथे झालेल्या अपघातातील वावी येथील तरुण गेल्या आठ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे. औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या या तरुणाची कौटुंबिक परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळे लोकवर्गणी जमा करून त्याच्या उपचारासाठी मदत केली जात आहे.
"महामार्गावरील वाढते अपघात टाळण्यासाठी ब्लॅक स्पॉट्स निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अभियंतांनी समक्ष पाहणी करावी. धोकादायक ठिकाणी महामार्गावर रमलर स्ट्रीप बसवाव्यात. शिर्डी महामार्गावर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत. ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित केलेल्या ठिकाणांवर देखील कॅमेरे प्राधान्याने बसवावेत. रात्री आठ ते सकाळी पाच या वेळेत महामार्ग सुरक्षा पथकाची गस्त वाढवावी, आपत्कालीन संपर्कासाठी महामार्गावर ठिकठिकाणी व्यवस्था करावी, अन्यथा स्थानिक ग्रामस्थ पुढाकार घेऊन महामार्गावर गतिरोधकांची उभारणी करतील."- मच्छिंद्र चिने (माजी सरपंच, पाथरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.