Vehicles parked on the road after school outside Urd National School. esakal
नाशिक

Nashik Traffic Issue : रस्त्यावरच्या कोंडीत; विद्यार्थ्यांचा जीव मुठीत

Traffic Issue : शहरातील बहुतांशी शाळा भरतात अन्‌ सुटतात त्यावेळी, शाळेबाहेरील रहदारीच्या रस्त्यावर गर्दी होत असते.

नरेश हाळणोर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील बहुतांशी शाळा भरतात अन्‌ सुटतात त्यावेळी, शाळेबाहेरील रहदारीच्या रस्त्यावर गर्दी होत असते. या गर्दीतून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावा लागतो तर, विद्यार्थी घरी येईपर्यंत पालकांचाही जीव टांगणीला लागतो. तर दुसरीकडे शाळाबाहेर कोणतीही जीवघेणी दुर्घटना टाळण्यासाठी शिक्षकांकडून सर्वतोपरी काळजी घेते, परंतु ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या पोलिस यंत्रणेची अनास्था मात्र, ठळकपणे अधोरेखित होताना दिसून आली. ‘सकाळ’ ने केलेल्या पाहणीतून समोर आलेले भीषण वास्तव. (Students face traffic issues after school every day in city )

शहरात महापालिकांच्या शाळांसह खासगी शैक्षणिक संस्थांच्या मराठी व इंग्रजी तर, इंग्रजी माध्यमांच्या शाळा बहुसंख्येने आहेत. यातील अनेक शाळा मुख्य रस्त्यांच्या बाजूला आहे. बहुतांशी शाळा या दोन सत्रांमध्ये भरतात. काही शाळा तर शहराच्या मध्यवस्तींमध्ये आहेत. ज्याठिकाणी अवजड वाहनांचा राबता असतो. जवळपास सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी बसेस आहेत. तर काहीप्रमाणात खासगी व्हॅन आहे. उपनगरीय परिसरातील शाळांमध्ये काही शहराप्रमाणेच स्थिती असून काही प्रमाणात पालकच आपल्या मुलांची ने-आण करीत असतात.

स्मार्ट रोडवर विद्यार्थ्यांच्या जीवाला नेहमी धोक्यात

त्र्यंबक नाका ते मेहेर या स्मार्ट रोडवर आदर्श हायस्कूल, बिटको गर्ल्स, बॉईज हायस्कूल आणि शासकीय कन्या विद्यालय या तीन शाळा आहेत. याच रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, जुने मध्यवर्ती बस स्थानक असल्याने शहर व जिल्ह्यातून येणाऱ्या संख्या मोठी आहे. त्यामुळे तर, स्मार्ट रोडवर दिवसभर वाहनांची रहदारी असते. या तीनही शाळांमध्ये सुमारे पाच ते सहा हजार विद्यार्थी आहेत. या शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळाही एक सारख्याच आहेत. परंतु, जेव्हा सुटतात त्यावेळी रस्त्यावर विद्यार्थ्यांचे लोंढेच येतात. अशावेळी रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांचा जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आदर्श हायस्कूल, सीबीएस

विद्यार्थी संख्या : सुमारे अडीच हजार

सीबीएस सिग्नलकडून त्र्यंबकनाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आदर्श हायस्कुल आहे. दोन सत्रात भरणाऱ्या या शाळेची विद्यार्थी संख्या अडीच हजारांपेक्षा अधिक आहे. शाळेची परवानगी असलेल्या विद्यार्थी व्हॅन्सलाच आवारात परवानगी आहे तर अन्य शालेय व्हॅन रस्त्यालगतच थांबलेल्या असतात. शाळा सुटते त्यावेळी विद्यार्थ्यांची बाहेर पडण्याची एकच गर्दी होते. व्हॅन्समध्ये बसण्याची लगबग तर काही विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून आपल्या व्हॅन, रिक्षापर्यत पोहोचायचे असते. अशावेळी शाळेचे शिक्षक या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून येतात. परंतु काही मुले ही धोका पत्करून रस्ता ओलांडत असतात.

बिटको गर्ल्स, बॉईज हायस्कूल, सीबीएस

विद्यार्थी संख्या : सुमारे दीड हजार

जिल्हा सत्र न्यायालयासमोर बिटको गर्ल्स, बॉईज हायस्कूल व माध्यमिक महाविद्यालय आहे. दोन सत्रातील या हायस्कूलमध्ये दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. दुपारी साडेबारा आणि सायंकाळी साडेपाचच्या वेळी शाळा सुटते त्यावेळी रस्त्यावर विद्यार्थ्यांची एकच गर्दी होते. शाळेच्या गेटवर सुरक्षारक्षक आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी असतात. शाळेच्या आसपास विद्यार्थी फार काळ रेंगाळणार नाहीत, याची दक्षता ते घेतात. परंतु रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. शहर बसेस, चारचाकी वाहने धावतात. तर दुचाकी वाहनांचा वेग अधिक असल्याने विद्यार्थ्यांना त्यापासून अपघाताची शक्यताच अधिक असते. (latest marathi news)

सारडा कन्या विद्यालय, नेहरु गार्डन

विद्यार्थी संख्या : सुमारे दीड हजार

परशुराम सायखेडकर नाट्यगृहशेजारी सारडा कन्या विद्यालय आहे. शिवाजी रोडने प.सा. नाट्यगृहाकडे येणारा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी आहे. परंतु, याठिकाणी असे कधीही दिसून येत नाही. शाळेच्या बाहेरील संरक्षण भिंतीलगत विद्यार्थ्यांसाठीच्या रिक्षा, व्हॅन जागा असते. परंतु, शालिमार परिसरातील व्यावसायिकांचीच चारचाकी वाहने पार्क केलेली असतात. त्यामुळे शालेय वाहनांना रस्त्यावर धोकादायकरीत्या थांबावे लागते. याठिकाणी तर चिमुरड्या विद्यार्थ्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊनच चालावे लागते.

नॅशनल उर्दू हायस्कूल, सारडा सर्कल

विद्यार्थी संख्या : सुमारे तीन हजार

सारडा सर्कलकडून मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नॅशनल उर्दू हायस्कूल आहे. ही शाळाही दोन सत्रात भरते. मात्र, दुपारी आणि सायंकाळी ज्यावेळी शाळा सुटते. त्यावेळी सारडा सर्कलचा परिसर वाहतूक कोंडीत सापडतो. बहुतांशी पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेले असतात. पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी, तर दुसरीकडे नाशिककडून द्वारका व द्वारकेकडून नाशिककडे येणारी वाहनांमुळे सारडा सर्कलवर कोंडी होते. विद्यार्थी-पालकांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. तर, बहुतांशी विद्यार्थी हे आसपासच्या परिसरातील असल्याने पायीच जातात. त्यांना मात्र रहदारी व वाहनांच्या कोंडीतून मार्ग काढत आपले घर गाठावे लागते.

मराठा हायस्कूल, गंगापूर रोड

विद्यार्थी संख्या : सुमारे साडेचार हजार

गंगापूर रोडवरील सरकारवाडा पोलिस ठाण्यासमोरच मविप्र संस्थेच्या मराठा हायस्कूल व आदर्श शिशुविहार यासह केटीएचएम महाविद्यालय आहे. दुपारी ११ ते १२ आणि सायंकाळी पाचच्या सुमारास याठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर असतात. परिणामी केटीएचएम महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाजवळ वाहतूक कोंडी होते. मराठा हायस्कूलच्या आवारात विद्यार्थी वाहनांची पार्किंग आहे. त्यामुळे रस्त्यावर विद्यार्थी येणार नाहीत याची काळजी शिक्षकांकडून घेतली जाते. आदर्श शिशुविहारच्या बसेस विद्यार्थी घेऊन बाहेर पडतात, त्यावेळी कोंडी होते. त्यातच केटीएचएमचे विद्यार्थी उड्डाणपुलाखालीच गर्दी करून थांबतात. त्यामुळे कोंडी होते.

फ्रावशी ॲकॅडमी, त्र्यंबकरोड

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीसमोर फ्रावशी ॲकॅडमी ही इंटरनॅशनल स्कूल आहे. या स्कूलच्या बाहेर विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बसेस व व्हॅन रस्त्यावर थांबलेल्या असतात. शाळा सुटते त्यावेळी बाहेर एकच गर्दी होऊन त्याचा परिणाम त्र्यंबक रोडवरील रहदारीवर होतो. विशेषत: शनिवारी याठिकाणी पालकांना बोलाविले जाते. येणारे पालक आपली वाहने रस्त्यालगतच पार्क करावी लागतात. त्याचा परिणाम रहदारीवर होतो.

जनता विद्यालय, पवननगर

विद्यार्थी संख्या : सुमारे ३ हजार

सिडकोतील पवननगर येथे मविप्र संस्थेचे जनता विद्यालय व वावरे महाविद्यालय आहे. याठिकाणी दुपारी साडेअकरा ते बारा आणि सायंकाळी पाच ते साडेपाच यावेळेत रस्त्यावर विद्यार्थी व पालकांची तोबा गर्दी असते. अशातच वाहनांचीही वर्दळ असते. विद्यार्थ्यांना रस्त्यावरून पायी जाताना मात्र आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. याठिकाणी अनेकदा भीषण अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत.

पेठे विद्यालय, त्रिमूर्ती चौक

विद्यार्थी संख्या : सुमारे एक हजार

सिडकोतील त्रिमूर्ती चौकात भाजी मंडईच्या पाठीमागे पेठे विद्यालय आहे. दुपारी बार आणि सायंकाळी पाच या वेळेत चौकामध्ये शाळा सुटताच वाहतूक कोंडी होते. बहुतांशी विद्यार्थ्यांना पालक घ्यायला येतात. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना वाहनांच्या रहदारीतून जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. सायंकाळच्या वेळी ही समस्या अधिक भीषण स्वरूपाची असते. भाजी मंडईत ग्राहकांची गर्दी, रस्त्यावर शहर बसेससह चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, पादचारी आणि त्यात विद्यार्थी-पालकांची गर्दीमुळे संपूर्ण चौक प्रभावित होतो.

उपनगरांमध्ये तीच स्थिती

पंचवटीतील श्रीराम विद्यालय, सातपूरमधील शिवाजी विद्यालय, मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मेरी येथील सीडीओ मेरी हायस्कूल, रविवार कारंजा येथील पेठे विद्यालय, उपनगर-नाशिकरोड परिसरातील सेंट फिलोनिमा, सेंट झेवियर, के.एन. केला हायस्कूल या शाळांच्या बाहेरील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. येथेही शाळा भरताना आणि सुटताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

शाळांकडून घेतली जाते काळजी

बहुतांशी शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. शाळा भरताना आणि सुटताना विद्यार्थी वर्गातून गेटपर्यंत वा भरताना गेटपासून वर्गापर्यंत विद्यार्थी सुरक्षितरित्या यावा वा जावा यासाठी शिक्षकांची नेमणूक केलेली असते. काही शाळांमध्ये तर क्रीडा शिक्षकांकडेच ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर काही शाळांमध्ये शिक्षकांच्या वारनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. (latest marathi news)

पत्राची दखलच नाही

रस्त्यालगत असलेल्या शाळांकडून दरवर्षी शालेय वर्षाला प्रारंभ होत असताना शाळेच्या बाहेर रहदारीच्यावेळी विद्यार्थ्यांना सहज मार्गक्रमण करता यावे. यासाठी शहर पोलिस वाहतूक शाखेला पत्र दिले जाते. या पत्रानुसार, शाळा सुटते वा भरते त्यावेळी किमान एक वाहतूक पोलिस रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी उपलब्ध करावा, अशी मागणी केली जाते. परंतु अद्यापपर्यंत पोलिस यंत्रणेकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचीच बाब जवळपास सर्वच शाळेच्या शिक्षकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

पोलिसांची उदासीनता

शहरातील काही मोजक्या ठिकाणी शाळेच्या बाहेर गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असते. यातून भीषण अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. याठिकाणी स्थानिक पोलिस ठाणे वा वाहतूक पोलिसांनी शाळा सुटणे-भरण्याच्या वेळेत पोलिस अंमलदार नियुक्त केल्यास विद्यार्थ्याच्या जीवावरील धोका टाळता येऊ शकतो. परंतु पोलिस यंत्रणा यासंदर्भात उदासीनता दिसून आली. ‘सकाळ’ केलेल्या या पाहणीत एकाही शाळेबाहेर पोलिस अंमलदारांची नियुक्ती आढळून आलेली आहे.

किती हा विरोधाभास?

सीबीएस सिग्नलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाईसाठी एक नव्हे तर तब्बल चार-चार वाहतूक पोलिस अंमलदार नियुक्त असतात. परंतु, त्याचवेळी हाकेच्या अंतरावरील बिटको हायस्कूल व आदर्श हायस्कूल या दोन शाळांच्या बाहेर विद्यार्थ्यांमुळे वाहतूक कोंडी होते. त्याकडे वाहतूक पोलिस सोईस्कररीत्या दुर्लक्ष करताना दिसून आले. यासंदर्भात काही पालक व शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पोलिस यंत्रणेच्या उदासिनतेवर आगपाखड केली.

''दरवर्षी शालेय सत्राच्या प्रारंभीच पोलिस यंत्रणेला पत्रव्यवहार केला जातो. परंतु आजतागायतचा अनुभव पाहता कधीही पोलिस येत नाहीत. त्यामुळे आम्ही शाळेच्या शिक्षकांनाच नियुक्त केले आहेत. विद्यार्थी रस्त्यावर गोंधळ घालणार नाहीत याची काळजी शिक्षकांकडून घेतली जाते. पोलिस असतील तर वाहनांवर नियंत्रण करणे सोपे होऊन विद्यार्थ्यांनाही रस्ता ओलांडणे सहज सोपे होऊ शकेल.''- जयश्री पेंढारकर, मुख्याध्यापक, बिटको गर्ल्स-बॉईज हायस्कुल, सीबीएस (latest marathi news)

''वर्गापासून विद्यार्थी गेटपर्यंत रांगेत येतो. पालक असे तर त्यांच्या स्वाधीन वा व्हॅन-रिक्षा असेल तर त्यात बसवून दिले जाते. शहर बसने ये-जा करणारे विद्यार्थी रस्ता ओलांडतात. शिक्षक व सुरक्षारक्षक विद्यार्थ्यांना सोडवितात.''- एस.आर. घनकुटे, शिक्षण, बिटको गर्ल्स-बॉईज हायस्कूल, सीबीएस

''स्मार्ट रोड वाहनांच्या रहदारीने सतत वर्दळीचा असतो. सायंकाळी वर्दळ वाढते. त्याचवेळी विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतात. पोलिसांना सांगूनही ते येत नाहीत. हाकेच्या अंतरावरील सीबीएस सिग्नलला किमान सात-आठ वाहतूक पोलिस असतात. यातील एक अंमलदार काही वेळेसाठी शाळेच्या बाहेर थांबलेत तर फरक पडेल.''- अनिल गाडे, आदर्श हायस्कूल, सीबीएस

''मराठा हायस्कूलचा पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांलाच बाहेर सोडले जाते. गंगापूर रोड फार वर्दळीचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली चार ते पाच शिक्षकांची शाळेच्या गेटवर नियुक्ती असते.''- के. आर. बच्छाव, शिक्षिका, मराठा हायस्कूल

''पोलिसांची मदत घेतली जाते. परंतु प्रत्येकवेळी ते असतातच असे नव्हे. त्यामुळे आम्ही शिक्षकच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. विद्यार्थी सुरक्षितरित्या घरी पोहोच झाला पाहिजे याच उद्देशाने प्रयत्न केले जातात.''- संतोष शिंदे, शिक्षक, मराठा हायस्कूल

''खरं तर शाळा सुटतात आणि भरतात, अशावेळी शाळेप्रमाणेच पोलिसांवरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. परंतु, काही दुर्घटना घडल्यानंतर काही दिवस पोलिस येतात. नंतर सोईस्कररीत्या विसरून जातात. यात विद्यार्थी आणि पालक यांची मात्र कसरत होत असते. जनता विद्यालयाच्या बाहेर वाहनांची गर्दीतून पालकाला आपला पाल्य घेऊन जाताना मोठी परीक्षा द्यावी लागते.''- सुभाष गायकवाड, पालक, सिडको

''शाळा आणि पोलिस यंत्रणा यांनी मिळून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत जाताना आणि येताना सुरक्षित वाटले पाहिजे. शाळेतून आपला पाल्य घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागतो.''- एस.डी. थोरात, पालक.

''प्रत्येक शाळेच्या ठिकाणी स्थानिक पोलिस आणि वाहतूक पोलिसांकडून नियमित गस्त असते. जर आवश्यकता असेल अशा ठिकाणी पोलिस त्या-त्यावेळी नियुक्त केलेही जातात. परंतु शाळांकडून ठोस सुरक्षात्मक उपाययोजना असायला हव्यात. सुरक्षारक्षक नेमणे, एकाचवेळी शाळेच्या बाहेर विद्यार्थी जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.''- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT