हर्षल गांगुर्डे, चांदवड (जि. नाशिक)
रस्त्यावर भाजीपाला विकणे, मिळेल ते काम करणे एकवेळ जेवणे, पण वाचनाची भूक पूर्ण करणे, दरम्यानच्या काळात प्रेमविवाह, वयाच्या तिशीत आजोबा होणे अन् पुढे जाऊन एक दोन नव्हे तर शेकडो लेकरांना मायेचा पदर देण्याचं संवेदनशील काम करणारं दांपत्य म्हणजे यशवंत आणि पूनम गोसावी.
‘शिवनिश्चल’ संस्थेच्या माध्यमातून अनाथांसाठी (orphans ) त्यांनी उभारलेले काम तिमिराकडून तेजाकडे प्रवास करणारं आहे. शिवव्याख्याते म्हणून यशवंत राज्यभर लोकप्रिय आहेत. वर्षातील २०० दिवस थोरांच्या विचारांची पेरणी ते लोकमनात करत असतात. यातून येणारे विचारांचे पीक हे हंगामी नसून ते वटवृक्षाप्रमाणे रूप घेणार आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
फिरस्ती करताना अनेक भागांत कधी पैशासाठी तर कधी डोक्यावरचा भार समजून अनेक कोवळ्या कळ्यांच्या भवितव्यांशी खेळणारे आई बाप पाहून त्यांना वेदना होतात. मात्र वेदनेवर फुंकर मारत यशवंत अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी पुढाकार घेतात. या प्रवासात पत्नी पूनम यांची खंबीर साथ मिळाली.
(nashik umed latest article on strength to orphans marathi news)
व्यावसायिक व्याख्याता नव्हे तर ‘बोले तैसा चाले...’ या ओवीना साजेसे त्यांचं काम आहे. अंधश्रद्धेवर टीका करण्याच्या आधी ते स्वतःला कर्मकांडापासून दूर ठेवतात. म्हणूनच सत्यशोधक पद्धतीने विवाह अन् लग्नात त्यांनी लावलेले पुस्तकांचे स्टॉल हा त्याकाळी चर्चेचा विषय ठरला होता.
माळवाडीचे (ता. देवळा) ते भूमिपुत्र आहेत. दिवसभर भाजीपाला विकणे रात्री भाषण लिहून देणे, शब्दफेक शिकवताना प्रसंगी फटके देत एक उत्कृष्ट वकृत्वपटू घडविण्याचे काम भाजीपाला विकणाऱ्या आई कलावती आणि वडील सुरेश गोसावी यांनी केलं हे विशेष! याचा परिणाम म्हणजे शालेय जीवनातील वकृत्व स्पर्धा त्यांनी गाजविल्या.
२०११ पासून आजतागायत रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचे सूत्रसंचालन यशवंत गोसावी करत आहेत. संभाजी महाराज, सयाजी शिंदे, ओमप्रकाश कडू, ज्ञानेश महाराव, हिंदुराव हुजरे, प्रवीण गायकवाड, राहुल पोकळे यासारखी मंडळी यशवंत गोसावींच्या ‘शिवनिश्चल’ संस्थेसाठी तन-मन-धनाने काम करत आहेत.
दरवर्षी किमान १०० अनाथ लेकराचं शैक्षणिक पालकत्व तर ते घेताच पण गरज पडल्यास अनेक अनाथांना ते स्वतःच्या कुटुंबात देखील सामावून घेतात. शिक्षणासाठी दत्तक घेतलेली शीतल यातलीच एक. शिक्षण पूर्ण करून तिचं कन्यादान केलं. पुढे जाऊन शीतल आई झाली अन् यशवंत आणि पूनम तिशीत आजोबा-आजी.
वैचारिक चळवळी बरोबर माणसं जोडण्याची चळवळ देखील यशवंत यांची अखंडपणे सुरू आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ इतिहास विभागाचा सर्वात तरुण सदस्य म्हणून देखील यशवंत गोसावी यांनी काम बघितलं आहे.
अनाथ निराधारांच्या पुनर्वसनासाठी, शेतकऱ्यांच्या व्यथा व्यवस्थेपुढे मांडण्यासाठी, महापुरुषांच्या विचारांची पेरणी करण्यासाठी यशवंत गोसावी यांनी आजवर आठ लाख किलोमीटरहून अधिक प्रवास केला आणि अजूनही सुरू आहे.
अनेक संकट या काळात त्यांच्यासमोर ‘आ’ वासून उभी ठाकली पण दानशूर, संवेदनशील लोकांच्या आधाराने ‘शिवनिश्चल’चा हा प्रवास यशवंत आणि पूनम गोसावी नेटाने पुढे नेत आहेत. जो शेकडो अनाथ लेकरांना मायेची उब अन् जिंकण्यासाठी उमेद देतो. (latest marathi news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.