Nashik News : नियमानुसार प्रतिनागरिक दररोज १३५ लिटर पाणीपुरवठा करणे बंधनकारक आहे. परंतु १९ दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून प्रतिमाणसी १२५ लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. या अघोषित पाणीकपातीमुळे शहराच्या बहुतांश भागात कमी-अधिक पाणीपुरवठा सुरू आहे. (Unannounced water cuts in wake of scarcity)
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये नाराजी नको म्हणून व्हॉल्वमनला हाताशी धरून सोईच्या भागात अधिक आटे ढिले करण्याचे काम होत असल्याने माजी नगरसेवकांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर जवळपास दीड टीएमसी पाणी वाचले. परंतु दुसरीकडे पाणी कमतरतेमुळे महापालिकेच्या आरक्षणात कपात करण्यात आली. नाशिकसाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले. शहराला दररोज २० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा होतो. सद्यःस्थितीत उपलब्ध पाण्याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे.
परंतु रोजचा पाणी वापर लक्षात घेता अठरा ते एकोणीस दिवसांच्या शॉर्टफॉल आहे. उष्णता वाढल्याने बाष्पीभवन वाढले आहे. त्यामुळे पाण्याची मागणीदेखील वाढली. सध्या ६०४ मीटरपर्यंत पाणीपातळी आहे. ५९९ पर्यंत पातळी आल्यास नाशिककरांसमोर जलसंकट उभे राहील. शहरात सात जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. (Latest Marathi News)
यातील विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून सर्वाधिक १३३ दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होतो. तर शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून १२५ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जात आहे. बारा बंगला ६२, नाशिक रोड ५५, गांधीनगर ५१, पंचवटी ६७, निलगिरी बाग ४६ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचा उपसा वाढला आहे.
शहरात तेरा टँकरच्या माध्यमातून दररोज ५० फेऱ्या सुरू आहेत. धरणाच्या मध्यातील पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदण्याचा प्रस्ताव आहे. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने शासनाच्या सुकाणू समितीकडे परवानगीचा प्रस्ताव पडून आहे.
त्यामुळे चोहोबाजूने येणारे पाणीटंचाई संकट दूर करण्यासाठी आतापासूनच पाणीपुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. प्रतिमाणसी १३५ लिटर्स पाणीपुरवठा करणे बंधनकारक आहे. परंतु शंभर ते सव्वाशे लिटर्स पाणीपुरवठा केला जात असल्याने पाणी वाचविण्यासाठी अघोषित कपात केल्याचे बोलले जात आहे.
लॉगबुक नोंद बंधनकारक
पाणीपुरवठा करताना अघोषित कपात होत असल्याने कमी-अधिक प्रमाणात पाणी पुरवठ्याच्या तक्रारी शहरात आहे. त्यात व्हॉल्वमनचा वाटा अधिक असून नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर माजी नगरसेवकांकडून व्हॉल्वमनला हाताशी धरून व्हॉल्वचे आटे अधिक ढिले करून काही भागात अधिक पाणीपुरवठा केला जात आहे.
असमान वितरणामुळे व्हॉल्व्हमनला लॉगबुकमध्ये नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले. किती वाजता, किती प्रमाणात पाणी सोडले अथवा बंद केले, याची नोंद बंधनकारक करण्यात आली. परंतु लॉगबुक गायब होण्याचे प्रकार झाले. एकूण २३७ कंत्राटी व्हॉल्वमन आहे. त्यातील १३० कायम सेवेतील तर १०७ कंत्राटी आहे.
कंत्राटी व्हॉल्वमन राजकीय नेत्यांच्या शिफारशीनुसार कामावर आहे. त्या कामाचे ऋण पाणीटंचाईच्या काळात फेडले जात असल्याचे बोलले जात आहे. तक्रारी वाढल्यानंतर आता व्हॉल्व्हमनवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.
शहरासाठी पाण्याचे आरक्षण (दशलक्ष घनफुटात)
- गंगापूर धरण- ३८०७
- दारणा व मुकणे धरण- १५०७
- एकूण आरक्षण- ५३१४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.