V. N. Naik Institution Election esakal
नाशिक

V. N. Naik Institution Election: शिक्षण संस्थेसाठी 81.77 टक्के मतदान; बोगस मतदान, हाणामारी प्रकाराने गोंधळ

V. N. Naik Institution Election : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरासरी ८१.७७ टक्के मतदान झाले.

सकाळ वृत्तसेवा

V. N. Naik Institution Election : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरासरी ८१.७७ टक्के मतदान झाले. एकूण आठ हजार ८८३ सभासदांपैकी आठ हजार ४१७ सभासदांनी या वेळी मतदानाचा हक्क बजाविला. सुरवातीस शांततेत सुरू असलेल्या या प्रक्रियेला अखेरच्या टप्प्यात झालेल्या कथित बोगस मतदानामुळे उडालेल्या गोंधळाचे गालबोट लागले. (V N Naik Institution Election 81 percentage voting for educational institutions )

यात मतदान केंद्रातील गर्दी पांगविताना पोलिसाने माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र यास केलेल्या मारहाणीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संस्थेच्या आ‌वारात शनिवारी (ता. २७) सकाळी आठला मतदानाला सुरवात झाली. सकाळच्या सत्रात उमेदवारांनी मतदान केले. त्या वेळी सभासदांची तुरळक गर्दी होती. मात्र सकाळी दहानंतर सभासद मतदारांची संख्या वाढण्यास सुरवात झाली.

दुपारी बारानंतर ग्रामीण भागातील मतदारांचा जोर वाढू लागला. त्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. दुपारी दोनपर्यंत ५७.८८ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. दुपारनंतर साधारणतः शहरातील मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली. नाशिक तालुका व शहर या मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी झाली. या दोन तासांतच तब्बल २० टक्के मतदान झाले. अखेरच्या टप्प्यात बाहेरगाववरून आलेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सायंकाळी पाचपर्यंत ८१.७७ टक्के मतदान झाले.

आज मतमोजणी

मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मतदान पेट्या सील करत, मतमोजणी होत असलेल्या भावबंधन मंगल कार्यालयात रवाना करण्यात आल्या. रविवारी (ता. २८) सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ होईल. एकूण ६० टेबलांवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी १६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (latest marathi news)

गटनिहाय मतदान असे ः

गट मतदार संख्या झालेले मतदान टक्केवारी

सिन्नर १७९० १४६२ ८१.६८ टक्के

निफाड-चांदवड १९७० १७१४ ८७.०१ टक्के

नांदगाव-सटाणा-कळवण ८९४ ७६१ ८५.१२ टक्के

येवला-मालेगाव ६४७ ५९४ ९१.९६ टक्के

दिंडोरी-पेठ--सुरगाणा ५७९ ५२२ ९०.१६ टक्के

नाशिक शहर-तालुका-इगतपुरी व इतर २५३७ १८२९ ७२.०९ टक्के

एकूण ८४१७ ६८८३ ८१.७७ टक्के

दिव्यांग विशेष व्यवस्था तत्काळ बंद

निवडणूक निर्णय मंडळाने संस्थेच्या आवारात मतदान करण्यासाठी दिव्यांगांसाठी तयार केलेली विशेष व्यवस्था उभारली होती. मात्र, येथे उमेदवारांच्या नातेवाइकांनीच मोठी गर्दी केल्याने ही व्यवस्था कोलमडली. यावर निवडणूक मंडळाने तत्काळ निर्णय घेत संबंधित यंत्रणा बंद केली. त्यामुळे वृद्ध, आजारी, दिव्यांग यांना मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी इतरांचा आधार घ्यावा लागला.

उमेदवारांनी मांडले मतदान केंद्रावर ठाण

मतदारांना सोयीचे व्हावे, यासाठी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तालुकानिहाय बूथरचना केली होती. असे असताना अनेक उमेदवार मतदारांना थेट केंद्रापर्यंत घेऊन जात असल्याचे दिसत होते. यात दिंडोरी तालुका बूथवर पॅनलचे उमेदवार ठाण मांडून मतदारांना मतदानाचे आवाहन करत होते. त्या वेळी इतर पॅनलच्या उमेदवारांनी आक्षेप नोंदविला. त्या वेळी सर्वच उमेदवार प्रवेशद्वाराकडून बूथकडे रवाना झाले.

विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी चढ्या आवाजात सर्व उमेदवारांना आवाहन केल्यानंतर काही उमेदवार बूथमधून बाहेर आले. या सर्व गदारोळात उमेदवार आणि पोलिस यांच्यात बाचाबाची होऊन गोंधळ उडाला. त्यानंतर निवडणूक मंडळाचे अध्यक्ष जालिंदर ताडगे यांनी सर्वच उमेदवारांसह सर्वच कार्यकर्त्यांना बूथच्या बाहेर काढण्याचा पावित्रा घेतला. या सर्व गदारोळामध्ये उमेदवार कोंडाजी आव्हाड बूथवर जाऊन सर्वच मतदारांना आवाहन करत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले.

संस्थेला जत्रेचे स्वरूप

संस्थेच्या मतदार सभासदांची संख्या साधारणतः आठ हजारांपर्यंत असून, मतदानासाठी मात्र सभासद संख्येच्या तिप्पट गर्दी संस्थेच्या आवारात झाली होती. एका सभासदामागे त्यांचे कुटुंब, आप्तस्वकीय देखील आले होते. मतदान केंद्रांमध्ये सभासदांबरोबर दोन ते तीन नातेवाईकही मतदान केंद्रात येत असल्याने या ठिकाणी सर्वच बूथवर गर्दी दिसून आली. याशिवाय यंदा चार पॅनल अन् उमेदवारांच्या भाऊगर्दी होती यातच अनेक राजकीय नेतेही रिंगणात उतरल्याने त्यांच्या समर्थकांनीही आवारात गर्दी केली होती. त्यामुळे संस्थेला जत्रेचे स्वरूप आले होते.

कोणाला सांगावे... बोलावे...

नाईक शिक्षण संस्था ही वंजारी समाज बांधवांची असल्याने सर्व समाजबांधव या ठिकाणी मतदानानिमित्त जमले होते. मतदार समाज बांधव व आपापसांत नातेवाइक असल्याने या ठिकाणी सगळा नातेवाइकांचा गोतावळा एकत्र झाला होता. या ठिकाणी एकच गर्दी झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस यांना उपस्थितांना आवरणे जिकिरीचे झाले. पोलिस, निवडणूक अधिकारी यांच्याकडून अनेकदा सांगूनही कोणीच कोणाचे ऐकत नसल्याचे दिसून आले. निवडणूक निर्णय मंडळाचे अधिकारी व सदस्य, संस्थेचे कर्मचारी हे सर्वच समाज बांधव व एकमेकांचे नातेवाइक असल्याने कोणाला बोलावे आणि कोणाला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मतदानाचा टक्का घसरला

यंदा चार पॅनल रिंगणात उतरले होते. नात्यगोत्यातील उमेदवार रिंगणात असल्याने सभासदांची मोठी अडचण झाली होती. प्रामुख्याने शहरातील मतदार सर्वच पॅनल उमेदवारांशी संबंधित होते. त्यामुळे नेमके कोणास मत द्यावयाचे, ही मोठी अडचण झाली होती. त्यामुळे शहरातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. परिणामी एकूण मतदानावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. गतवर्षी झालेल्या निवडणुकीत ८८.३३ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र यात सहा टक्क्यांनी घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT