Nashik Air Pollution : वाढत्या प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक समतोल राखण्यासाठी वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा, यासाठी जगभर पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली जात असताना दुसरीकडे वायू प्रदूषणावर जगाला नियंत्रण मिळवता आलेले नाही. थंड हवेचे ठिकाण मानले जाणाऱ्या नाशिकच्या प्रदूषणात वायू प्रदूषणाची भर पडते आहे. प्रामुख्याने दूषित धूर सोडणारी वाहने रस्त्यांवरून सर्रासपणे धावत असून, त्याकडे ना वाहतूक पोलिस शाखेचे लक्ष, ना प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई होत. ( Vehicles emitting polluted fumes are rampant on city roads )
ज्यांना कारवाईचे अधिकार आहेत, तो प्रदूषण विभागाच कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असल्याचा परिणाम यंदा नाशिककरांनी अनुभवलाच आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नाशिककर उन्हाच्या झळांनी हैराण झाले आहेत. शहरातील झाडांची विकासाच्या नावाखाली सर्रासपणे कत्तल होत आहे.
झाडांच्या गर्दीत हरवलेले टुमदार नाशिक आता सिमेंट क्रॉंकिटच्या जंगलात गडप झाले आहे. यात भर पडते आहे, ती वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांची. वायू प्रदूषणामुळे नैसर्गिक हवेमध्ये बदल झाला आहे. शुद्ध हवेचे प्रमाण खालावले आहे. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या रेडिएटरमधून इंधनाच्या घर्षणातून निघणारा धूर हवेत मिसळून शुद्ध हवा प्रदूषित करतो आहे.
अगदी शासकीय वाहनांपासून खासगी वाहनांची देखभाल नियमित होत नसल्यामुळे ती वाहने विषारी वायू हवेत सोडत आहेत. वायू प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहने बाजारात आली आहेत. बॅटरीवर धावणाऱ्या वाहनांचीही संख्या वाढते आहे. तरीही इंधनावर धावणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने वायू प्रदूषणाला इतक्यात आळा बसणे शक्य नाही. (latest marathi news)
राज्य परिवहन महामंडळाच्या इंधनावर धावणाऱ्या बहुतांशी बसेसमधून खूप मोठ्या प्रमाणात विषारी धूर हवेत मिसळतो. एवढेच नव्हे तर बसच्या मागे दुचाकीस्वार असेल, तर तो बसच्या धुरामुळे काळवंडतो. त्याचप्रमाणे बहुतांशी रिक्षाही धूर सोडतात. तर दुचाकी वाहनांचीही नियमित देखभाल नसल्यास त्याही वायू प्रदूषणात भर घालत आहेत.
कारवाईच्या नावाने बोंब
शहराच्या चौकाचौकात वाहतूक पोलिस असतात. त्यांच्यासमोरच एसटी बस, रिक्षा, टेम्पो, ट्रक, दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात धूर सोडत धावतात. परंतु वाहतूक पोलिस त्याविरोधात कारवाई करीत नाहीत. ज्या विभागाकडे वाहनाच्या यांत्रिक व तांत्रिक तपासणीची जबाबदारी आहे, त्या आरटीओ विभागाकडूनही असे वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांची प्रामाणिकपणे तपासणी होत नसल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाला तर शहरात वायू प्रदूषण आहे, याचीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आजतागायत या विभागाकडून प्रदूषण करणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई झाल्याचे कोणाच्या ऐकिवातच नसल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.