Nashik Water Crises : देवळा तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता शिगेला पोहोचली असून पाणीटंचाईचा प्रश्न मिटविण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. ४० अंशावर गेलेले तापमान आणि पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढतच आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्याने तालुक्यातील २५ गावे ३७ वाड्यावस्त्यांवर ३३ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी लोहोणेर, महालपाटणे व इतर गावांतील ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ()
तालुक्यातील लघुपाटबंधारे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे त्यांवर आधारित असलेल्या पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यात गतवर्षी ८०० मिमी पाऊस पडला होता. यंदा ३०५ मिमी पाऊस झाला. यामुळे भूजलपातळी १०० फूट इतक्या खोलवर गेली आहे.
तालुक्यातील पूर्व व दक्षिण भागातील गावांत पाणीटंचाईची भीषणता अधिक आहे. त्यामुळे ३३ टँकरच्या साहाय्याने पाण्याच्या खेपा केल्या जात आहेत. जनावरांचाही चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यावर्षीचा उन्हाळा वाढते तापमान आणि पाणीटंचाईमुळे असह्य झाल्याचे चित्र आहे.
टॅंकरने पाणीपुरवठा होणारी गावे
गिरणारे, कुंभार्डे, कापशी, भावडे, मेशी, चिंचवे, भिलवाड, डोंगरगाव, सांगवी, वराळे, दहिवड, वाखारी, तिसगाव, शेरी, कणकापूर, कांचने, पिंपळगाव, गुंजाळनगर, उमराणे, महात्मा फुले नगर, खर्डा, श्रीरामपूर, खुंटेवाडी, मुलूकवाडी, खडकतळे, वाजगाव, सुभाषनगर यांसह इतर वाड्यावस्त्या. (latest marathi news)
पाच वर्षांची पावसाची स्थिती
२०१७/१८ - ४०६.६६ मिमी,
२०१८/१९ - ३०१.५३ मिमी ,
२०१९/२०- ५८६.३६ मिमी ,
२०२०/२१ - ८६५.०३ मिमी ,
२०२१/२२ - ८०० मिमी,
२०२२/२३ - ३०५ मिमी .
रामेश्वर पूर्ण भरणार का?
चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर लघुपाटबंधारा भरण्यासाठी गेल्या १०-१२ दिवसांपासून पाणी सोडण्यात आले आहे. परंतु या बंधाऱ्यात आतापर्यंत केवळ १५ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा कालवा २० मे पर्यंतच चालणार असल्याने पुरेसा पाणीसाठा होणार नसल्याने बंधारा किमान ५० टक्के भरण्यासाठी कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी होत आहे.
वहनक्षमता कागदावरच जास्त
देवळा तालुक्यासाठी १६६ दलघफू पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले असून रामेश्वर लघु पाटबंधाऱ्याची क्षमता ७१.४३ दलघफु आहे. जमिनीची भूक बघता पाणी मोठ्या प्रमाणावर जिरत आहे. याशिवाय मूळ कळीचा मुद्दा असा आहे की या कालव्याची वहनक्षमता कागदावर जास्त दिसत असली तरी प्रत्यक्ष वहनक्षमता कमी आहे, ती वाढवण्याची गरज आहे.
''देवळा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवायचा असेल तर चणकापूर उजव्या कालव्याचे रुंदीकरण करत वहनक्षमता वाढवणे आणि या कालव्याच्या माध्यमातून येथील धरणे, तलाव भरून घेत नाले-ओढे-ओहोळ वाहते करणे हाच एकमेव पर्याय आहे. वर्षानुवर्षे हा भाग दुष्काळीच राहिला आहे.''- शिवाजीराव पवार, संचालक देवळा बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.