Nashik Water Crisis : शहराला मुख्यत्वे पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची जलपातळी (वॉटर लेव्हल) ६०५.४ पर्यंत खाली गेली असून ५९९ पर्यंत पातळी आल्यास जॅकवेलपर्यंत पाणी येणार नाही, त्यामुळे शहरावर पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
अद्याप चर खोदणे तर दूर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्वेक्षणही करता येत नाही. मात्र हवामान विभागाने यंदा मॉन्सून लवकर व अधिक प्रमाणात पडण्याचे निरीक्षण नोंदविल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला एवढाच काय तो दिलासा मिळाला आहे. (Nashik Water Crisis level of Gangapur Dam dropped news)
मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर जवळपास दीड टीएमसी पाण्याची बचत झाली असली तरी त्यापूर्वी जायकवाडीसाठी पाणी सोडले गेले.
त्यामुळे नाशिक महापालिकेच्या आरक्षणात कपात करण्यात आली. महापालिकेने पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली. परंतु धरणांतील उपलब्ध पाणी साठा लक्षात घेता आरक्षणात कपात केली. नाशिकसाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले.
शहराला दररोज २० दशलक्ष घनफूट पाणी पुरवठा होतो. सद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. परंतु रोजचा पाणी वापर लक्षात घेता अठरा दिवसांच्या पाण्याचा शॉर्टफॉल आहे. अठरा दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल साधारण जुलै महिन्यात जाणवेल, असा अंदाज पाणी पुरवठा विभागाचा आहे.
प्रशासनाकडून कमी-अधिक पुरवठा करून शॉर्टफॉल भरून काढण्याचे प्रयत्न आहे. परंतु पंधरा एप्रिलच्या अहवालाने पाणी पुरवठा विभागाची झोप उडविली. गंगापूर धरणाच्या मध्य भागातील पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदणे गरजेचे आहे. या माध्यमातून अठरा दिवसांचा शॉर्ट फॉल भरून काढण्याबरोबरच धरणातील मृत जलसाठा उपयोगात आणता येईल.
सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने गंगापूर धरणात चर खोदण्याची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. निविदा उघडण्यासाठी विशेष परवानगी मागण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत परवानगी मिळालेली नाही.
...तर पाणी कपात
उन्हाचा चटका वाढल्याने बाष्पीभवनाबरोबरच पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे जलपातळी झपाट्याने खालावली आहे. सध्या ६०५.४ मीटरपर्यंत पाणी पातळी आहे. धरणात ६१२.३ मीटर पर्यंत पाणी ठेवावे लागते. पावसाळ्याच्या शेवटी ही स्थिती असते. ६०० ते ५९९ पर्यंत जलपातळी घटल्यास पाणी कपातीला नाशिककरांना सामोरे जावे लागणार आहे. (latest marathi news)
टॅँकर ५० फेऱ्या, वाढ होणार
शहरात तेरा टॅंकर सुरु आहेत. त्या माध्यमातून दररोज ५० फेऱ्या होतात. शहरात इंदिरानगर, मखमलाबादमधील शंकरनगर, सातपूर, पंचवटीतील काही भाग, जुने नाशिक, सिडकोमधील मोरवाडी, उत्तमनगर, विजयनगर, पवननगर आदी भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने टॅँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.
आठ हजार लिटर क्षमतेचे सहा विभागांसाठी सहा टॅँकर आहेत. दोन हजार लिटर क्षमतेचा छोटा टॅंकर आहे. टंचाईमुळे सहा टॅन्कर वाढविल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.
शहरासाठी पाण्याचे आरक्षण (दशलक्ष घनफुटात)
- गंगापूर धरण- ३८०७
- दारणा व मुकणे धरण- १५०७
- एकूण आरक्षण- ५३१४
पाण्याचा वापर (दशलक्ष घनफूट)
- १५ ते ३१ ऑक्टोबर- ३३४.६५
- एक ते ३० नोव्हेंबर- ५९३.६७
- एक ते ३१ डिसेंबर- ५९५
- एक ते ३१ जानेवारी- ६११.२७
- एक ते २९ फेब्रुवारी - ५७८.९८
- एक ते ३१ मार्च - ६०२.११
- एक एप्रिल ते ११ एप्रिल- २१९.५३
---------------------------------
एकूण वापर- ३५३५.२१
----------------------------------
दररोजचा पाणी वापर- ५५५.८ दशलक्ष लिटर्स.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.