Nashik News : तालुक्यातील एका कुटुंबासाठी सहा दिवसांनी हजार लिटर पाणी दिले जात आहे. हे पाणी पुरवताना महिलांची होणारी कसरत अवघड आहे. ‘२४ तास नळाला पाणी देणार’ अशी घोषणाही झाली. अन् तशी योजनाही आली. नळ आले पण पाणी २४ तास आलेच नाही. नळाला पाणी येतंय पण ते पाच ते सहा दिवसांनी. तेही फक्त अर्धा ते एक तास. पाणी आल्यानंतर जेमतेम एक हजार लिटर पाणी भरणे होते. ( water did not come for 24 hours in chandwad district )
कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेली पाणीपुरवठा योजना चांदवडकरांसाठी पांढरा हत्तीच ठरली आहे. चांदवड शहरासाठी ओझरखेड धरणावरून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महा अभियानांतर्गत २४/७ दिवस स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे कामकाज होऊन एक ते दीड वर्ष लोटले. मात्र, तरीदेखील या योजनेद्वारे शहराला पाच ते सहा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. मोठा गाजावाजा करत ही योजना सुरु झाली.
या योजनेचे पाणी चांदवडकरांना अजूनही २४ तास कधीच मिळाले नाही. सहा-सात दिवसांनी पाणी येते. तेही फक्त अर्धा ते एक तास. यामुळे भर उन्हाळ्यात चांदवडकरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. चांदवड तालुक्यात मागीलवर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे चांदवड शहरवासीयांवर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा खोकड तलाव देखील आटला आहे.
यामुळे शहरातील विहिरी, बोअरवेल कोरडे पडले असून, पाण्याचे संकट तीव्र झाले आहे. या परिस्थितीत उष्णतेने रौद्र रूप धारण केल्याने तापमानात कमालीची वाढ झाली आहे. चांदवड शहरासाठी मंजूर करण्यात आलेली ओझरखेड धरणावरील नवीन पाणीपुरवठा योजनेचा फायदा होईल, अशी अपेक्षा चांदवडकर व्यक्त करीत होते. मात्र, या योजनेचे कामकाज होऊन देखील सदर योजना अद्यापही रखडली आहे. (latest marathi news)
दुष्काळी परिस्थितीत दररोज पाणी मिळणार नसेल तर या योजनेचा चांदवडकरांना फायदा काय, असा प्रश्न नागरिक व्यक्त करीत आहे. शिवाय ही योजना पूर्णत्वास झाल्यावर काही महिन्याच्या आत योजना कार्यान्वीत करावयाची होती. त्याकडे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने योजना फक्त कागदावरच राहिली.
''चांदवड शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे दररोज पाणी मिळणे अपेक्षीत होते. मात्र, या योजनेद्वारे अद्यापही २४ तास पाणीपुरवठा केला जात नाही. आज भीषण दुष्काळी परिस्थिती असताना तब्बल ५ ते ६ दिवसांनी नळाला पाणी येत आहे. तसेच, या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी कमी दाबाने येत असल्याने अनेक त्रुटी या योजनेत आहे.''- गुड्डू खैरणार, उपशहरप्रमुख, शिवसेना, उबाठा
''नगर परिषदेच्या हद्दीतील कोंबडवाडी भागात ४०० ते ५०० आदिवासी बांधवांसह इतर नागरिक राहतात. जनावरे पण आहेत. या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन केली असून, टाकी बसवण्यात आली आहे. मात्र, या टाकीत पाणीच येत नाही. यामुळे येथे राहत असलेल्या नागरिकांची मोठी परवड झाली आहे. यासाठी नगर परिषदेकडे वारंवार मागणी करून देखील पाणी सोडले जात नाही.''- योगेश राऊत, ग्रामस्थ
''सध्या पाण्याचे सगळे स्रोत आटलेले आहेत. खोकड तलावात देखील पाणी नाही. चांदवडकरांचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत आहेत. लोकांमध्ये तीव्र संताप आहे. तरीदेखील सरकारी यंत्रणा तसेच आमदारांना याकडे पहायला वेळ नाही. त्यांचे अजिबात लक्ष नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून जर शहरवासीयांना पाणी मिळत नसेल तर ही योजना फसवी आहे, असेच म्हणावे लागेल. या योजनेसाठी सरकारचे पैसे खर्च झाले अन् या योजनेतून ठेकेदार, तत्कालीन लोकप्रतिनिधी व अधिकारीच गब्बर झाले.''- शिरीषकुमार कोतवाल, माजी आमदार, चांदवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.