Nashik Water Scarcity : तालुक्यातील बहुतांश पाणीयोजना या गिरणा नदीच्या आवर्तनावर तर काही पाणीपुरवठा योजना ह्या धरणांतील पाणीसाठ्यावर अवलंबून आहेत. ज्या पाणीयोजना गिरणा नदीच्या आवर्तनावर अवलंबून आहेत त्यांची अवस्था अशी आहे की, 'गिरणानं पाणी आटनं का पाणीटंचाईनं संकट दाटणं...?' कारण नदीला पाणी असेपर्यंत या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत भक्कम असतात मात्र नदी आटली की, विहीरीचे स्रोत मंदावतात व पाणीपुरवठ्याला मोठ्या मर्यादा पडतात. (Nashik Water Scarcity Time to buy water of girna river marathi news )
सध्या तालुक्यातील ३२ गावे-वाड्यांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी ९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. देवळा शहरासह इतर गावांना नऊ गाव सामुदायिक पाणीपुरवठा योजनेद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा केला जातो. देवळा शहराची वाढलेली व्याप्ती व लोकसंख्या लक्षात घेता या शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही करण्यात आली आहे.
सामुदायिक पाणीपुरवठा योजना जुनी झाल्याने पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होते व गावांना थेट पाणी पोहचण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. सध्या गिरणा नदीचे पात्र कोरडे पडल्याने देवळा शहरासह इतर गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गुंजाळनगर व इतर गावांचीही अवस्था तहानलेलीच आहे. त्यावर उपाययोजना म्हणून टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
८०० रुपयास एक टँकर आणि पिण्याचा पाण्याचा जार ३० रु. प्रमाणे खरेदी करावा लागत आहे. मेशी, महालपाटणे, वासोळ, रणदेवपाडे व डोंगरगाव या पाच गावांसाठी पाच गाव पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. परंतु ही योजना गेल्या काही वर्षांपासून बंदच आहे. गिरणा नदीवर विहीर व वासोळजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प अशा ७ कोटींची योजना सध्या शून्य टक्के काम करीत आहे.
महालपाटणे व वासोळ या गावांनी त्यांच्यापुरती तात्पुरती सोय असली तरी इतर गावे मात्र तहानलेली आहेत. त्यामुळे या गावांना पाणीटंचाईचा चटका सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या दक्षिणेकडील गावांच्या पाणीपुरवठा योजना ह्या वार्शी धरण, रामेश्वर येथील किशोरसागर धरण व परसूल धरण यातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहेत.
परंतु सध्या ही धरणे कोरडी पडल्याने धरणांवर अवलंबून असलेल्या सर्वच गावांत पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. परसूल धरणावर अवलंबून उमराणे, दहिवड व इतर गावांमध्येही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महालपाटणे, खर्डे, वरवंडी, खालप, सरस्वतीवाडी येथील ९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
टंचाईग्रस्त गावे - ३२
टँकर सुरु - १६
दररोजच्या खेपा - ३०
विहिरींचे अधिग्रहण : ९ (latest marathi news)
तीनही धरण भरण्याची गरज
देवळा शहरासह तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर लोहोणेर गावाजवळ तसेच जेथे पाणीपुरवठा योजना आहेत तेथे कोल्हापूर पद्धतीचे नो लिकेज बंधारे बांधण्याची गरज आहे. गिरणा नदीवर बलून बंधारे बांधल्यास त्याचा गिरणा नदी परिसरातील नागरिकांना व गिरणा नदीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांना निश्चित फायदा होऊ शकतो. तसेच पूरपाण्याने का होईना पण चणकापूर उजव्या कालव्याच्या माध्यमातून वार्शी, रामेश्वर व परसूल ही तिन्ही धरणे भरण्याची आवश्यकता आहे.
''गेल्या १५ दिवसांपासून आमच्या गावात पिण्याचे पाणी आलेले नाही. गावांतर्गत पुरवठा होणाऱ्या वापरावयाच्या पाण्याचीही टंचाई आहे. पाण्यासाठी नागरिकांची मोठी वणवण होत असून तातडीने टॅंकर चालू करावा अशी मागणी करण्यात येत आहे.''- जगदीश निकम, ग्रामपंचायत सदस्य, वाखारवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.