Nashik Water Shortage : तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ६८ टक्के पाऊस झाल्याने जानेवारी-फेब्रुवारीमध्येच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. परिणामी दोन ते अडीच महिन्यापासून १५ गावे व २९ वाड्यावस्तीवर टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला आहे. दररोज सात टँकरद्वारे पाण्याच्या १५ फेऱ्या सुरू आहेत आणि यात पुन्हा आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (Nashik Water shortage in Deola taluka marathi news)
महिनाभरात विहिरींची भूजल पातळी तब्बल ३० फुटाने खालावून ७० फुटांपर्यंत गेल्याने ५ गावांच्या पाणी टंचाईत भर पडली आहे. गतवर्षी जानेवारीत विहिरीची भूजल पातळी ३७ तर मे अखेर ४९ फुटापर्यंत असल्याने पाण्यासाठी एकही टँकर सुरू नव्हता. यंदा मात्र जानेवारीत विहिरींची भूजल पातळी ७० फूट खाली गेली आहे. देवळा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत.
तालुक्यातील धरणाच्या पाणीसाठ्यातून उपसा थांबवण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याची गरज आहे. तालुक्यातील किशोरसागर व गिरणा नदीकाठावरील विहिरीच्या साठ्यावर ४९ गावांच्या पाणीयोजना अवलंबून असल्याने अवैध पाणी उपसा थांबवावा लागणार आहे. सद्य:स्थितीत किशोरसागर धरणात केवळ २५ टक्के साठा शिल्लक असून हा साठा महिनाभरच पुरणार आहे.
गावे, वस्तींच्या संख्येत वाढ
देवळा तालुक्यातील गिरणारे, कुंभार्डे, कापशी, भावडे, मेशी, चिंचवे, भिलवाड वाड्यावस्त्यावर ७० ते ८० दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे तर महिनाभरापासून मेशी, सांगवी, डोंगरगाव, वराळे, वाखारी, शेरी या ६ गावांसह वाड्यांची भर पडली आहे. (latest marathi news)
पाण्यावरुन संघर्षाची शक्यता
यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने चणकापूर उजव्या कालव्याच्या पुरपाण्याने किशोरसागर धरण १०० टक्के भरले होते. सद्य:स्थितीत किशोरसागरात २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
चणकापूर उजव्या कालव्यातून पाणी सोडले तरी मध्येच पाण्याची गळती व चोरी मोठया प्रमाणात होण्याच्या तक्रारी नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यामुळे पूरपाण्या व्यतिरिक्त धरणात पाणी आणणे मुश्किल होत असते. या कारणामुळे पाण्यावरून वाद होण्याचे प्रमाण पुढील काळात आणखी वाढणार अशी चिन्हे आहेत.
कूपनलिका पडल्या कोरड्या
गुंजाळनगर (ता.देवळा) नागरी वसाहतीत अनेकांनी कूपनलिका (बोअरवेल) करत पाण्याची व्यवस्था करून घेतली आहे. मात्र यावर्षी फेब्रुवारीत बहुतांश बोअरवेल कोरडे झाल्याने आता पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आल्याने नळांना पाणी केव्हा येणार याकडे लक्ष ठेवावे लागत आहे.
''सद्य:स्थितीत मागणीनुसार पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. पुढील काळात भासणाऱ्या पाणीटंचाई संदर्भात पाटबंधारे विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील नियोजन करावे लागणार आहे.''- बबन अहिरराव, प्रभारी तहसीलदार देवळा
गतवर्षांची स्थिती
पाऊस : ८०० मिमी
टँकर : शून्य
विहिरीची भूजल पातळी (जानेवारी) : ३७ फूट
यंदाची स्थिती
पाऊस : ३०५.० मिमी
टँकर : १५ टँकर
विहिरीची भुजल पातळी (जानेवारी) : ७० फूट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.