लासलगाव : १७ कोटी रुपये खर्चून केलेली नवीन जलवाहिनी फुटली. त्यानंतर मोटार जळाली. अशा अनेक कारणांमुळे गेल्या १५ ते १८ दिवसांपासून लासलगाव शहराला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. अनेक अडथळ्यांवर मात करीत पाईपलाईन आणि मोटारीचे काम पूर्ण झाले. (Water supply stopped for 15 days due to bursting of Lasalgaon water channel)
मात्र, १६ गावांना पाणीपुरवठा करणारे नांदूरमध्यमेश्वर धरण कोरडे पडल्याने ऐन उन्हाळ्यात शहरातील नागरिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहे. परिणामी, अनेक कुटुंब स्थलांतर करण्याच्या विचारात आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व नेते व्यस्त आहेत. मात्र, लासलगाव शहरातील सर्वसामान्य जनता पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहे.
पाणी समस्येला कंटाळून लासलगाव शहरातील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार असून, प्रत्येक प्रभागात स्वाक्षरी मोहीम राबवून यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे पोस्टर सध्या व्हायरल होत आहे. लासलगावातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवल्याने २०२४ च्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याबाबत झेंडा चौकात पोस्टर लावण्यात आले असून.
याबाबत मुख्य केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र पाठविणार असल्याचे यामध्ये नमूद आहे. सोळा गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत जी काही ७ ते ८ किलोमीटर नवीन पाईपलाईन दुरुस्ती १७ कोटी रुपये खर्चून झालेली आहे. तरी देखील सदर पाईपलाईन वारंवार लिकेज होते. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास विलंब होतो. (latest marathi news)
१६ गाव समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज बिल वेळेत भरले जात नाही. त्यामुळे तेथील वीजपुरवठा खंडित केला जातो. त्याचा विपरीत परिणाम देखील नागरिकांना सहन करावा लागतो. समितीमार्फत पाण्याचे कुठल्याही प्रकारे नियोजन न केल्यामुळे लासलगावकरांना विकत पाणी घ्यावे लागते. त्यामुळे योग्य ती चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
"सध्या लासलगावमध्ये व्हाट्सॲप ग्रुपवर तासनतास पाणीटंचाईवर रात्रभर गप्पा रंगतात. परंतु, प्रत्यक्षात कुठलाही ठोस निर्णय घेतला जात नाही. कोणीही नागरिक पाणीटंचाईवर बोलायला तयार नाही. याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे लासलगावमध्ये सध्या विरोधकच शिल्लक नाही." - एक टंचाईग्रस्त नागरीक, लासलगाव
"पाईपलाईन लिकेज व मोटार दुरुस्तीवर मात करीत लासलगावकरांना पाणी मिळेल असे वाटत असतानाच धरणातील पाणी आटल्याने नागरीकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तथापि, वरिष्ठ पातळीवर आपण रोटेशन सोडण्याच्या दृष्टीने पत्रव्यवहार केला आहे." - लिंगराज जंगम, ग्रामसेवक, लासलगाव
"रिक्षा चालवून आजची कमाई झाली ३४० रुपये. त्यातून डिझेल भरले १४० रुपयांचे आणि पाणी टँकरला दिले दोनशे रुपये. सांगा कसं कुटुंब चालवायचं. पाणीटंचाईमुळे आमच्यावर गाव सोडण्याची वेळ आहे." - शिरसाठ, रिक्षाचालक, लासलगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.