Nashik Water Shortage : वारंवार जलवाहिन्या नादुरूस्त होत असलेल्या गिरणा धरणातून मिळणारे आवर्तन लांबते, म्हणून पर्याय म्हणून स्वीकारण्यात आलेल्या माणिकपुंज धरणावरील जलवाहिन्या देखील फुटून मोठ्या प्रमाणात गळती वाढली आहे. याचा परिणाम पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था मोडकळून पडण्यात दिसू लागले आहे. (Nashik Water supply to Nandgaon every 20 days marathi news )
सध्या नांदगाव शहराला करण्यात येणार पाणीपुरवठा वीस ते पंचवीस दिवसांवर पोचला आहे. पालिकेच्या मालकीचे दहेगाव धरणातील जलसाठा डिसेंबर अखेरीलाच संपुष्टात आला. त्यानंतर एकूणच शहरसाठीच्या पाणी वितरणाचे सगळे नियोजन विस्कळित झाले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून ऐन फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
माणिकपुंज धरणातून शहराला किमान दररोज सव्वीस लाख लिटर पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना वारंवार जलवाहिन्या फुटू लागल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होऊन सध्या फक्त चार लाख लिटर पाणी जलकुंभापर्यंत पोहचते. माणिकपुंजमधून मिळणारे पाणी आणि गिरणाच्या आवर्तनातून मिळणाऱ्या पाण्याची सांगड घालून शहराला पाणीपुरवठा केला जात असतो, मात्र माणिकपुंजमधून पालिकेकडे येणाऱ्या जलवाहिन्या कशामुळे फुटतात हे संशयास्पद असले तरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी म्हणून त्यावर तोडगा निघत नाही अशी देखील दुसरी बाजू आहे.
गिरणा धरणावरील ५६ खेडी नळयोजना कालबाह्य ठरली म्हणून सुधारित ७८ खेडी नळयोजना हाती घेण्यात आली, या योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे, मात्र गिरणा धरणावरील सध्याच्या जुन्या ५६ खेडी नळपाणी पुरवठा योजना आचके देत आहे. या योजनेतून शहराला महिन्यात एकदाच आवर्तन मिळते, मात्र पर्याय म्हणून स्वीकारण्यात आलेल्या तात्पुरत्या माणिकपुंज धरणावरील पाणीपुरवठा योजनेची अवस्था ‘मोले घातले रडाया’ अशी बनली आहे.
गळत्यांचे प्रमाण वाढून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणी वितरणाचे गणित विस्कळित बनले आहे. आठ वर्षांपूर्वीच माणिकपुंज धरणातून शहराला पाणी देण्यासाठी ही योजना स्वीकारली, तेव्हाच या योजनेचे तांत्रिक आरेखन चुकलेले होते. धरणातून पाणी उचलून प्रत्यक्ष जलकुंभात आणताना ताशी सत्तर हजार लिटर पाणी याप्रमाणे मिळणे अपेक्षित होते. शिवाय दरडोई माणसी वीस लिटर असे प्रमाण ठरवून योजनेचे आरेखन निश्चित करण्यात आले.
याचाच अर्थ साधारणपणे आठ तासाला चार लाख लिटर पाणी मिळायला हवे होते, प्रत्यक्षात तेवढे पाणी मिळत नसल्याने योजना विवादात सापडली आहे. त्यावर जादा पाणी उचलण्यासाठी एक्स्प्रेस फिडरचा प्रस्ताव तेव्हाच्या पालिका प्रशासनाने आणला. शेवटी फिडर बसवून पाण्याचा उपसा सुरू झाला तरी अपेक्षेप्रमाणे पालिका जलकुंभात पाणीच पोहचत नाही ही ओरड मात्र कायम राहिली, आजही ती कायम राहिली आहे. माणिकपुंज योजना स्वीकारल्यापासून कधी जलवाहिन्या फुटल्यात तर कधी वीजपुरवठा खंडित झाला. या समस्या कायम आहेत, त्याचीच पुनरावृत्ती सध्याही कायम आहे.
वीज खंडित तरीही पाणी कमी कसे?
माणिकपुंज धरणात सध्या २३० दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा असून त्यात उपयुक्त जलसाठा ७० दशलक्ष घनफूट असा आहे. १६० दशलक्ष घनफूट मृतसाठा आहे, तो ऑगस्ट अखेरपर्यंत पुरणार असल्याचा दावा जलसंपदा विभागाचा आहे. असे असले तरी वीज विभागाने धरणावरील वीजपुरवठा खंडित केल्यानंतर देखील ४५ दशलक्ष घनफूट पाणी कमी झाले, ते कसे कमी झाले? बाष्पीभवन झाले असेल तर किती व कसे अशी सगळी उत्तरे हवी आहेत. मात्र सर्वच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहेत.
''दहापैकी आठ विहिरी अधिग्रहीत करीत असून नादुरुस्त कूपनलिका सुरू करणे यासारख्या पर्यायी उपयोजना पालिका प्रशासनाने आखल्या आहेत. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.''- विवेक धांडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक नांदगाव पालिका (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.