Nashik News : सह. दुय्यम निबंधक अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा मुद्रांक विभागाने सोमवारी (ता. ११) लेखणीबंद आंदोलन केले. आंदोलनात जिल्ह्यातील २६ दुय्यम निबंधकांसह मुख्यालयातील शेकडो कर्मचारी सहभागी झाल्याने साधारणत: साडेतीनशे कागदपत्रांची नोंदणी रखडली आहे. मुद्रांक अधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले. (nashik workers staged one day strike marathi news employee)
त्यानुसार मुद्रांक विभागातील जिल्हा निबंधक वर्ग-१ आणि सह. दुय्यम निबंधक वर्ग-२ यांच्याविरोधात त्यांच्याच विभागात काम करणाऱ्या खासगी डाटा एन्ट्री ऑपरेटर महिलेने उपनगर पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील मुद्रांक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी एकवटले आहेत. या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय लेखणीबंद आंदोलन केले.अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्या महिला कर्मचाऱ्याने हे आरोप केले आहेत, तिने यापूर्वीही अधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करून विभागाला वेठीस धरण्याचे काम केले होते. मुळात ही महिला वेळेत कामावर हजर नसणे, विनापरवानगी रजा घेत असल्याने कार्यालयीन प्रमुखांनी तिला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यातून सूडबुद्धीने संबंधित महिलेने गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे कार्यालयाची प्रतिमा मलिन होत असून, भविष्यात पुरुष अधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामे सांगणे धोक्याचे ठरू शकते. प्रसंगी कार्यवाहीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती निवेदनात व्यक्त केली आहे. मुद्रांक विभागाच्या आंदोलनामुळे जिल्हाभरात दस्त नोंदणीचे व अन्य कार्यालयीन कामकाज ठप्प पडले.
निवेदनावर एस. एस. जोशी, व्ही. डी. राजुळे, शरद दवंगे, पी. एल. वामन, आर. एस. आव्हाड, किरण झोटिंग, संदीप भुसारी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील सुमारे आठ कोटींचे व्यवहार थंडावले. आंदोलनाची माहिती नसल्याने कार्यालयात येणारे वकील व सामान्यांची परवड झाली. त्यांना कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील टाळे पाहून परतावे लागले.
दोन तास जास्त काम करणार
मुद्रांक शुल्क विभाग सोमवारी बंद राहिल्याने सुमारे आठ कोटींचे व्यवहार झाले नाहीत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कामांचे झालेले नुकसान बघता आठवड्यातील अन्य दिवशी दोन तास जास्त काम करून ही तूट भरून काढली जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.