Nashik News : इगतपुरी तालुक्यात गत आठवडाभरात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली असल्याने विविध नुकसानीच्या घटना घडत आहेत. पावसाळी वातावरणात पूर्व भागातील सोनोशी टाकेद हद्दीतील चिखलदरा वस्तीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या शेतकरी सुनील आंबेकर यांच्या पत्नीला पहाटे सहाच्या दरम्यान सर्पदंश झाला. त्यानंतर सर्पदंश झालेल्या अश्विनीला पायी रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना चिखलदरावाडी रस्त्यामधील ओहळला पूर आलेला होता. (young man risked his life to save his wife from snake bite )
चिखलदरा धोंगडे वस्तीतील रस्त्याला पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून पलीकडे रस्ता ओलांडणे कठीण होते. त्यामुळे अश्विनीला उपचारासाठी दाखल करण्यासाठी उशीर होत होता. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. अशा कठीण परिस्थितीत प्रसंगावधान राखून सुनील आंबेकर यांनी पत्नीला खांद्यावर घेत स्वतःचा जीव धोक्यात घालत भरपावसात पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडत चिखलदरावाडीतून सोनोशी गाव गाठले. त्यानंतर तत्काळ गाडीतून घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी आठला उपचारासाठी दाखल केले.
सर्व परिस्थिती लक्षात घेऊन घोटी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. सदावर्ते व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राहुल वाघ यांनी विलंब न लावता तत्काळ उपचार चालू केले. सुनील यांनी आपबिती सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांना सांगितली. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी एकच्या सुमारास अश्विनी आंबेकर शुद्धीवर आल्या. सामाजिक कार्यकर्ते शिंदे यांनी अश्विनी व सुनील आंबेकर यांची भेट घेत सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आभार मानले. (latest marathi news)
पूल कधी उभारणार, ग्रामस्थांचा प्रश्न
सोनोशी येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलदरा धोंगडे वस्तीत जाणाऱ्या रस्त्यावर पूल नसल्याने शेतकरी कुटुंबीयांची मोठी गैरसोय होते आहे. रात्री-अपरात्री ओहळातील पाण्यातून मार्गक्रमण करत जीव धोक्यात घालत गावाकडे ये-जा करत आहे. पुलासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केली; परंतु अद्यापपर्यंत पुलाचा प्रश्न सुटलेला नाही. प्रशासनाने रस्ता व पुलाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
''पूल नसल्यामुळे पत्नीला खांद्यावर घेऊन ओहळतील पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडून घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जर पुलाची सुविधा झाली तर असा जीवघेणा संघर्ष कायमचा थांबेल, तरी प्रशासनाने लक्ष द्यावे.''- सुनील आंबेकर
''सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळ वाया न घालवता व कुठेही न हलवता तत्काळ १०८ टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल करावे. शासकीय रुग्णालयात सर्पदंशावर प्रतिबंधक लस, सर्व सुविधा उपलब्ध असतात.''- डॉ. एस. डी. सदावर्ते, वैद्यकीय अधीक्षक, घोटी ग्रामीण रुग्णालय
''सुनीलने पत्नीचे प्राण वाचविण्यासाठी जिवाची बाजी लावत वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने, तत्काळ उपचार करत अश्विनीचे प्राण वाचवू शकलो.''- डॉ. राहुल वाघ, स्त्रीरोगतज्ज्ञ, घोटी ग्रामीण रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.