Maharashtra News: शहादा (जि. नंदुरबार) येथे झालेल्या ४९ व्या कुमार आणि मुलींच्या गटाच्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बेशिस्तीचे कारण देत उपविजेत्या संघास पारितोषिकापासून वंचित ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
इतकेच नाही, तर राष्ट्रीय स्पर्धेतील पुरस्कार विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र संघातून डावलल्याचा प्रतापही घडवून आणला. यासंदर्भात निवड समिती सदस्याशी संपर्क साधला असता चंद्रजित जाधव यांच्या सांगण्यावरून निवड केली नसल्याचा कबुलनामा किरण मिटकरी यांनी दिला. (National award winning kho kho players dropped from state team news)
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील खो-खो मैदानावर पत्रकार परिषद घेताना याबाबत मंदार देशमुख, उमेश आटवणे व पदाधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देताना अनेक प्रश्न उपस्थित केले. बेशिस्तपणा केला, म्हणजे नेमके काय केले, असा सवाल उपस्थित करताना सालाबादप्रमाणे नाशिकच्या खेळाडूंवर जाणीवपूर्वक अन्याय झाल्याचा आरोप या वेळी केला आहे.
अंतिम सामन्यात सदोष पंचगिरीचा फटका नाशिक संघाला बसला. त्यांना मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात सदोष पंचगिरीबद्दल नाशिकचे मार्गदर्शक, व्यवस्थापक, तसेच सचिव यांनी वारंवार पंचांकडे तक्रार केली. एककल्ली कारभार सुरूच ठेवल्याने नाशिक संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
दुसरीकडे पारितोषिक वितरण समारंभात नाशिक जिल्ह्यावर शिस्तभंगाची कारवाई केल्याचे सांगत पारितोषिक नाकारण्यात आले. तसेच, वैयक्तिक बक्षीसही नाकारले. महाराष्ट्र संघात एकाही खेळाडूला स्थान दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. अशात गुणवत्ता क्रमात खालील खेळाडूंची निवड करताना नाशिकच्या मुलींना डावलल्याचा आरोप केला आहे.
यासंदर्भात निवड समितीची भूमिका जाणून घेण्यासाठी सदस्य किरण मिटकरी यांना संपर्क साधला असता, चंद्रजित जाधव यांच्या सांगण्यानुसार मुलींची निवड केली नसल्याची कबुली त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेत दिली.
या खेळाडूंवर झाला अन्याय...
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर मात्र या स्पर्धेत अन्याय झाला. यात सरिता दिवा, ज्योती मेढे, सुषमा चौधरी, यशोदा देशमुख यांचा समावेश आहे; तर कुमार गटातून चिंतामण चौधरी, चेतन चौधरी यांना डावलत अन्याय केला आहे. निवड झालेल्या खेळाडूंच्या कामगिरीचा तपशील जाहीर करावा व या खेळाडूंच्या कामगिरीबरोबर तुलना करावी, असे जाहीर आव्हान या वेळी देण्यात आले.
‘आदिवासी म्हणून अन्याय’
डावललेले सर्व खेळाडू हे आदिवासी समुदायाचे आहेत. त्यांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप असून, यासंदर्भात थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्राचे अनुसूचित जमाती मंत्रालय यांसह राज्यस्तरावरील आदिवासी आयुक्तालयस्तरावर रीतसर तक्रार नोंदवत सखोल चौकशीची मागणी केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.