नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात एक इन्क्यूबेटर आणि एका अॅक्सीलरेटरसह ४६ स्टार्टअप्सची (Start-up) राष्ट्रीय पारितोषिक विजेते म्हणून घोषणा झाली. त्यामध्ये नाशिकच्या संगणक अभियंता अक्षय दीक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या कृषीशी निगडीत वेसाटोगो स्टार्टअपचा समावेश आहे. श्री. दीक्षित यांच्या या सॉफ्टवेअर बेस कंपनीने शेतकऱ्यांसाठी ‘ग्रामिक' हे मोबाईल ॲप्लीकेशन आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सिस्टीम' ही डिजीटल प्रणाली विकसित केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्री. गोयल यांच्याशी पहिल्या स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक अंतर्गत झालेल्या संवादात सहभागी होण्याची संधी अक्षय यांना मिळाली. संवादामध्ये निवडक स्टार्टअप्समधील १७५ प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२१ साठी २ हजार १०० हून अधिक नामांकने प्राप्त झाली होती. त्यातील १७५ स्पर्धक अंतिम करण्यात आले होते. त्यापैकी ४३ स्टार्टअप्सना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यात कृषी, पशुपालन,पेयजल, शिक्षण आणि कौशल्यविकास, उर्जा, उद्योग तंत्रज्ञान, पर्यावरण, आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, आरोग्य आणि स्वास्थ्य, उद्योग, अवकाश, वाहतूक आणि प्रवास या क्षेत्रांचा समावेश होता.
वडील वायूसेनेत असल्याने अक्षय यांची राष्ट्रीय सेवा करण्याची महत्वाकांक्षा होती. पण वायूसेनेतील तांत्रिक कारणास्तव संधी हुकली आणि २०१८ मध्ये ‘जय जवान जय विज्ञान' ही संकल्पना डोळ्यापुढे ठेऊन अक्षय यांनी कृषी क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फाऊंडेशन आणि नाशिकमधील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अडचणींचा शोध घेतला जात होता. त्यावेळी शेतमाल वाहतूक आणि पुरवठा साखळीतील अडचणी समोर आल्यात. टाटाच्या ‘डिजीटल इम्पॅक्ट स्क्वेअर'च्या माध्यमातून अडचणींवर पर्याय शोधण्यासाठी अभियंत्यांना बोलवण्यात आले. त्यासाठी अक्षय यांनी अर्ज केला होता. अभियांत्रिकीची पदवी पूर्ण होण्याच्या अगोदर ‘वेसाटोगा‘ स्टार्टअपचा जन्म झाला. लागवड ते शेतमालाचे उत्पादन आणि ते बाजारपेठेपर्यंत नेण्यापर्यंतची साखळी प्रकल्पाचे काम अक्षय यांनी पूर्ण केले. त्यासाठी देशातील ५० तरुणांमध्ये अक्षय आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निवड झाली होती. संशोधन प्रशिक्षक संदीप शिंदे आणि प्रा. सचिन पाचोरकर यांचे मार्गदर्शन त्यांना उपयोगी ठरले.
६८० कोटींची उलाढाल
‘वेसाटोगा‘च्या माध्यमातून ६८० कोटींची उलाढाल झाली आहे. ‘सह्याद्री‘च्या जोडीला आता ओम गायत्री नर्सरी संलग्न झाली असून ग्रेप मास्टर संलग्न होणार आहे. ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सिस्टीम'शी बारा हजारांहून अधिक शेतकरी जोडले आहेत. त्यात नाशिकसह नगर, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतमाल पोच झाल्यानंतर शेतकऱ्यांना माहिती मिळते. खरेदी-विक्री व्यवहाराच्या डिजीटल नोंदी होतात. शेतमाल, खरेदी, दर निश्चिती, काढणी, पुरवठा, साठवणूक अन त्यासंबंधीच्या नंदी, पुरवठा, वाहतूक, विक्री या बाबी प्रणालीत समाविष्ट आहेत, असेही अक्षय यांनी सांगितले.
‘वेसाटोगो‘ची निर्मिती प्रक्रिया
संस्कृत भाषेत वेसा म्हणजे छोटा (अल्पभूधारक) शेतकरी, तर टोगो म्हणजे जपानी भाषेत एकात्मता याच्यातून ‘वेसाटोगा‘ अशी नावाची निवड केल्याचे अक्षय सांगतात. ते म्हणाले, की तीन सहकाऱ्यांच्या मदतीतून कृषी व्यवसाय व्यवस्थापन संगणकीय ॲप तयार करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत माल पोचवण्याची साखळी समाविष्ट आहे. उत्पन्न मिळवून आतापर्यंत ६० ते ७० लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लागवड ते काढणी पश्चात बाजारपेठ साखळीमधील प्रमुख समस्या विचारात घेण्यात आल्यात. पंधराहून अधिक गावातील साडेतीनशेहून अधिक शेतकरी आणि शंभर वाहतूकदारांच्या भेटी घेतल्यात. बाजार समित्या, शेतकरी उत्पादक कंपन्या, निर्यातदार यांच्यासह संघटित आणि असंघटीत व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे आणि इतरांच्या सूचनांमधून सुलभ प्रणाली सुरु झाली. शेतमाल खरेदी, बाजारपेठीय माहिती व वाहतूक व्यवस्थापनासाठी ‘ग्रामिक' आणि ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सिस्टीम' विकसित झाली. सोशल एंटप्रायईज ऑफ द इअर २०१९, टॅकनेट इनिशिएटिव्ह ॲवॉर्ड २०१९, इमर्जिंग सोशल इंटरप्राईज ऑफ द इअर २०२१ हे सन्मान यापूर्वी मिळाले आहेत.
.
''राष्ट्रीय पुरस्काराच्या रुपाने पाच लाख रुपये मिळत असताना सरकारी योजनांमधून मदत होईल. गुंतवणूकदार संलग्न होतील. आता यापुढील काळात ‘ग्रामिक'च्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना एकत्र येऊन शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी मदत व्हावी यावर काम केले जाणार आहे.'' - अक्षय दीक्षित (वेसाटोगा स्टार्टअप)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.