Saptashrungi Devi Gad esakal
नाशिक

Saptashrungi Devi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगड...

दिगंबर पाटोळे

"महाराष्ट्रातील देवीच्या शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ अर्थात त्रिगुणात्मक स्वरूपी श्री सप्तशृंगी निवासिनी देवी नाशिकपासून ६५ किलोमीटर असून, सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेतील सात शिखरांच्या प्रदेशात चार हजार ६५९ फूट उंचावरील डोंगरकपारीतील मंदिरात वसली आहे. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते." - दिगंबर पाटोळे, वणी (जि. नाशिक)

आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीमातेचे. असे या देवीचे माहात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. आदिशक्तीचे मूळ स्थान सप्तशृंगी हेच होय. (navratri special article on saptashrungi gad nashik )

ओंकारातील मकार पूर्ण रूप होऊन सप्तशृंग गडावर स्थिरावला म्हणून हेच मूळ रूप आणि हीच आदिमाया. १८ हातांची ही महिषासुरमर्दिनी, हीच महालक्ष्मी, हीच महाकाली, हीच महासरस्वती होय. त्रिगुणात्मक स्वरूपात आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणून श्री सप्तशृंगीदेवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो.

या व्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी.

नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे. सप्तशृंगीमाता ही नाथपंथियांची कुलस्वामिनी असल्याने संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेण्यापूर्वी येथे येऊन मातेचे दर्शन घेतले होते.

डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फुटी मूर्ती आहे. तिला १८ भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी पुराणातील उल्लेखानुसार महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.

यात मूर्तीच्या उजव्या बाजूने खालून वरच्या भागात पाहावयाचा क्रम पुढीलप्रमाणे ः इंद्राचे वज्र, विष्णूचे चक्र, विश्‍वकर्माचे मुसळ, वायुदेवताचा बाण, शंकराचे त्रिशूल, विश्वकर्माचे मुदगल, अंकुश, परशू व कालदेवतेची तलवार याप्रमाणे; तर डाव्या बाजूने वरून खालच्या भागात पाहावयाचा क्रम पुढीलप्रमाणे ः कालदेवतेची ढाल, यमाचे कालदंड, वरुणदेवतेचे पाश, विश्वकर्माची तर्जणी, शंकराचे डमरू, वायुदेवतेचे धनुष्य, इंद्राची घंटा, कुबेराचे पानपात्र, अग्निदेवतेची शक्ती याप्रमाणे देवीच्या हातात असलेल्या आयुधांचा समावेश आहे. देवीच्या मूर्तीची मान काहीशी झुकलेली आहे. त्याबाबतची कथाही गमतीदार आहे. गडासमोरीलच मार्कंडेय पर्वतावर मार्कंडेय ऋषी तपश्‍चर्या करीत होते. त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

चैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतात. चैत्रात देवीचे रूप हसरे, तर नवरात्रोत्सवात ते गंभीर असल्याचे सांगितले जाते. चैत्रोत्सव देवीच्या माहेरच्यांचा, तर नवरात्रोत्सव सासरच्यांचा असे गमतीदार कारणही त्यामागे सांगितले जाते.

दरवर्षी अश्विन शुद्ध म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवाची सांगता नवमीच्या हवनाची पूर्णाहुती दुसऱ्‍या दिवशी दसऱ्‍याला देऊन होते.

या दिवशी देवीच्या यथासांग पूजेबरोबर शस्त्रपूजाही केली जाते. नवरात्रोत्सवातील सप्तमीस म्हणजेच सातव्या माळेला गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. सप्तमीला आई सप्तशृंगीचे दर्शन घेतल्याने आपल्या सगळ्या चिंता दूर होतात, या भावनेने भाविक गडावर दर्शन घेण्यासाठी येतात. सप्तमीला सप्तशृंगगडावर सप्तशृंगीआईचा वास असतो, असेही म्हटले जाते.

एप्रिलमध्ये चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमीपासून गडावर चैत्रोत्सवास प्रारंभ होतो. हा उत्सव साधारणत: दहा ते बारा दिवस सुरू राहतो. या उत्सवात आईचं माहेर म्हणविल्या जाणाऱ्या खानदेशातून लाखो संख्येने भाविक गडावर पायी येतात. चैत्र पौर्णिमा व विजयादशमी या दिवशी आई सप्तशृंगीच्या शिखरावर दरेगावचे गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने ध्वज लावतात. देवीच्या शिखरावर चढण्यासाठी मार्ग नाही. तरीही हे अवघड कार्य दरेगावचे गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने करीत आहेत.

गडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणे आहेत. मार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या केलेला मार्कंडेय पर्वत कोटीतीर्थ तेथेच आहे. गिरिजा नामक एक तीर्थ असून, सांप्रत त्यास शिवालय तीर्थ म्हणतात. या तीर्थात स्नान केले असता सर्व पातकांचा नाश होतो, असे म्हटले जाते. पूर्वी सप्तशृंगगडावर १०८ कुंडे असल्याचा उल्लेख आहे. सध्या प्रत्यक्षात १० ते १५ कुंडे दिसतात. बाकीची कुंडे बुजली असावीत.

गडावरून पूर्व दिशेकडे गेले की मारुतीचे मंदिर व पुढे दाजिबा महाराजांची समाधी लागते. दाजिबा महाराजांच्या समाधीपासूनच जवळच सूर्यकुंड, कालीकुंड आहेत. ही दोन कुंडे छत्रसिंग ठोके यांनी बांधली. याच कुंडांच्या पाण्याचा वापर श्री भगवतीच्या दैनंदिन स्नानासाठी केला जातो. तांबुलतीर्थ, काजळतीर्थ व अंबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेत. तांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहे. देवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते.

गडाची व्यवस्था पाहण्यासाठी सप्तशृंगगड ग्रामपंचायत आहे. याशिवाय, देवी मंदिर व परिसरासाठी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट ही विश्वस्त व्यवस्था आहे. त्यांच्यातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम, धर्मशाळा, भक्त निवास, महाप्रसादालय, धर्मार्थ दवाखाना यांसारख्या सोयी-सुविधा भाविकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. अगदी हॉटेलसह सर्व वस्तूंची दुकाने, लॉजिंग येथे आहेत.

गडावर जाणे आता सर्वांना सहज शक्‍य झाले आहे. नाशिकसह जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या बस व खासगी वाहनांद्वारे थेट गडापर्यंत जाता येते. याशिवाय, गड चढून जाण्यासाठी नांदुरीतून पायऱ्यांचा रस्ता, वणी गावाच्या बाजूकडून चंडिकापूर मार्ग रडतोंडी व ६० पायऱ्या म्हणून ओळखला जाणारा पायऱ्यांचा रस्ता आहे. तसेच, देशातील पहिला फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प येथे साकारण्यात आला. त्यामुळे दिव्यांग, वृद्ध, लहान बालकांना आदिमाया सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेणे सहज व सुलभ झाले आहे.

पूजा विधी-

श्री भगवतीचे मंदिर पहाटे साडेपाचपासून रात्री नऊपर्यंत दर्शनासाठी उघडे असते. पहाटे साडेपाचला देवीची काकड आरती, सकाळी सात ते नऊपर्यंत श्री पंचामृत महापूजा, दुपारी बाराला महानैवेद्य आरती, सायंकाळी सातला सांज आरती होते.

सप्तशृंगगडाजवळील तीर्थक्षेत्रे व शहरे

@ श्रीक्षेत्र वणी गावातील जगदंबा माता मंदिर- २३ किलोमीटर

@ मार्कंडेय पर्वत- पायी दोन ते तीन तास

@ चणकापूर धरण- ३१ किलोमीटर

@ सापुतारा (पर्यटनस्थळ)- ५० किलोमीटर

@ कळवण- २७ किलोमीटर

@ नाशिक- ६५ किलोमीटर

@ दिंडोरी (स्वामी समर्थ आध्यात्मिक प्रधान सेवा केंद्र)- ४१ किलोमीटर

@ करंजी देवस्थान (श्री दत्त मंदिर)- ३१ किलोमीटर

@ पारे गाव (पाराशरी ऋषी आश्रम)- ३२ किलोमीटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT