Milk Adulteration : ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा असणाऱ्या दुग्ध व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीचा झालेला शिरकाव सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आणणारा ठरला आहे.
शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या दुधामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हानिकारक रसायने मिसळण्याचा किंवा त्यापासून कृत्रिम दूध निर्मिती करण्याचा गोरख धंदा जोरात सुरू आहे.
यामुळे घराघरात वापरले जाणारे दूध शुद्ध आहे याची हमी कोणीही देणार नाही. दुग्ध उत्पादनासाठी अग्रेसर असलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेली कारवाई कौतुकास्पद आहे.
सामान्य जणांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात आले असले तरी दूध भेसळीच्या तळापर्यंत जाऊन या व्यवसायात रुजलेल्यांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे. तरच प्रत्येकाच्या घरातल्या मुलाबाळांना शुद्ध दूध मिळते असे खात्रीने म्हणता येईल. (Need to go to base of milk adulteration action of police insiders welcomed by general public Nashik Crime)
अवर्षणग्रस्त परिस्थिती आणि दुष्काळाशी सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यात विशेष करून पूर्व भागात अलीकडच्या काही वर्षात शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय भरभराटीला आला आहे.
सुशिक्षित तरुण देखील चांगल्या नोकरी मिळत नसल्याने या व्यवसायात कष्ट घेत अर्थार्जन करत आहेत. अनेक जण स्थिरस्थावर देखील झाले आहेत. तालुक्यात साधारणपणे दैनंदिन तीन ते सव्वा तीन लाख लिटर दुधाचे उत्पादन घेतले जाते.
अनेक खाजगी आणि सहकारी दूध प्रक्रिया संस्था शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेले दूध गाव पातळीवर असलेल्या दूध संकलन केंद्राच्या मार्फत विकत घेतात. यात शेतकऱ्याला मिळणारा भाव आणि दुध संकलन केंद्र चालक, प्रक्रिया संघाना या दुधापासून मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत असते.
तो अभ्यासासाठी स्वतंत्र विषय देखील होईल. अलीकडच्या चार ते पाच वर्षात बघितले गावागावात दूध संकलन केंद्रांचे पेव फुटले आहे . दोनच्या जागी चार सहा संकलन केंद्र कार्यरत झाली. हे काही अचानक झाले नाही.
तर दूध व्यवसायात भेसळीच्या गोरखधंद्यातून मिळणारा नफा त्यासाठी कारणीभूत ठरला. यापूर्वीच्या काळात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दूध संकलन केंद्र व डेअरीची तपासणी केली जायची.
त्यात काही काळेबेरे आढळले तर ,'चांगभलं' करत कारवाई दुर्लक्षित व्हायची. मात्र दोन दिवसांपूर्वी नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या विशेष पथकामार्फत सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव येथे धडक कारवाई करत दूध भेसळीच्या व्यवसायातल्या हिमनगाचे टोक उध्वस्त केले असे म्हणता येईल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आता गरज आहे ती निपक्ष पद्धतीने या गुन्ह्याचा पुढील तपास करून आणखी खोलात जाण्याची. श्री. उमाप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणा नक्कीच योग्य पद्धतीने तपास करून या व्यवसायातील बांडगुळांना शोधून काढेल असा विश्वास सर्वसामान्यांना वाटतो आहे.
कारण श्री.उमाप यांनी जिल्ह्याचा पदभार हाती घेतल्या नंतर अवैध व्यवसायिकांच्या विरोधात ज्या पद्धतीने मोहीम उघडली तीच धडाकेबाज कारवाई दूध भेसळीच्या बाबतीत सर्वसामान्यांना अपेक्षित आहे.
दिवाळी सणाच्या तोंडावर अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणारी केंद्रे आणि मिठाई दुकानांवर छापेमारी केली जाते. मात्र ही कारवाई केवळ दिवाळी गोळा करण्यापूर्वीच असते हे लपून राहिलेले नाही.
ग्रामीण भागात सुरू असलेला दूध भेसळीचा गोरख धंदा एफडीएच्या अधिकाऱ्यांना ज्ञात नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कालच्या सिन्नर येथील कारवाई वेळी पोलिसांकडून एफडीएच्या अधिकाऱ्यांना वारंवार निरोप धाडण्यात आले होते.
संबंधित अधिकाऱ्यांनी यायला उशीर केला असे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.
मागच्या काळात घडलेल्या काही (अंधारातील) कारवायांच्या सूरस कथाही ऐकायला मिळाल्या. दूध भेसळीत रमलेल्यांची एफडीएकडे पूर्ण माहिती आहे. परंतु जाणीवपूर्वक कारवाया होत नाही ही वस्तुस्थिती यानिमित्ताने दुर्लक्षित करून चालणार नाही.
"दुध भेसळीचा व्यवसाय सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणारा आहे. या व्यवसायात असणाऱ्यांनी पैसे कमविण्याच्या हेतूने सामाजिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरवू नये. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या जीवावर अशा पद्धतीने उद्योग करणे यापुढील काळात पोलीस यंत्रणा खपवून घेणार नाही. सिन्नरच्या कारवाईत अटक केलेल्यांकडून या व्यवसायाशी संबंधित बाबींच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाईल. दुधातील भेसळ ही सर्व प्रकारच्या आजारांना निमंत्रण देणारी आहे. भावी पिढीच्या सुदृढतेसाठी नागरिकांनी अशा व्यवसायाशी संबंधित माहिती थेट कळवावी किंवा पोलीस हेल्पलाइनवर द्यावी. गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल." - शहाजी उमाप (जिल्हा पोलीस अधीक्षक नाशिक)
"दुष्काळात होरपळणाऱ्या सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादन हा जगण्यासाठीचा पर्याय आहे. प्रतिकूल परिस्थितीत सिन्नरमध्ये हा व्यवसाय भरभराटीला आला. मात्र गुन्हेगारी प्रवृत्तींचा शिरकाव चिंताजनक आहे. एकामुळे चांगले बदनाम होतात. त्यामूळे अशा अप्रवृत्तीचे आपण कधीही समर्थन करणार नाही. पोलिसांची कारवाई स्वागतार्ह आहे. यापुढील काळात अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांचे विरोधात कठोर कारवाई केली जावी. दूध हे अमृत असून ते सर्वांपर्यंत निर्भेळ पोहचवण्याची जबाबदारी सामाजिक घटक म्हणून आपली सर्वांची आहे."
- माणिकराव कोकाटे (आमदार, सिन्नर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.