पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याला मोक्षप्राप्ती होण्यासाठी हिंदु संस्कृतीत दशक्रिया, पंचक्रिया विधी असे उत्तरकार्य पवित्र नदीकाठी करण्याची रूढीपरंपरा आहे. सध्या कोरोनामुळे वाढलेल्या मृत्युने स्मशानभुमीत मृतदेहाची रांग लागली आहे. पण, त्या मृतदेहाचे उत्तरकार्य कार्य करण्यासाठी पिंपळगावच्या पाराशरी नदीतिरी शुकशुकाट आहे. कौटुंबिक पद्धतीने घरीच दशक्रिया विधी होत असल्याने नदीकाठी कावळाही फिरकेनासा झाला आहे.
पंधरा दिवसात साठहून अधिक निधन
घरातील मृत व्यक्तीच्या मन:शांतीसाठी पिंपळगाव शहरात सोमनाथ देवालयासमोरील शांतीधाममध्ये दशक्रिया विधी करण्याची परंपरा आहे. नाभिकांकडून मुंडन करणे, पिंड दान, प्रवचन असे कार्यक्रम होतात. त्या कुटुंबांच्या सांत्वनासाठी आप्तस्वकीय मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. ग्रामपंचायतीच्या वतीने दशक्रिया विधीसाठी घाट, भव्य शेड यासह वृक्षारोपण अशा सुशोभिकरणामुळे परिसराचा कायापालट झाला. गेल्या पंधरा दिवसात पिंपळगाव शहरात साठहून अधिक व्यक्तींचे निधन झाले. स्मशानभूमी मृतदेहांनी गजबजलेली आहे. मात्र, मृतांच्या आत्म्याला सदगती प्राप्ती होणारा दशक्रिया विधीचा परिसर ओस पडला आहे. कौटुंबिक स्वरूपात घरीच दशक्रिया पार पडत आहे. बाहेरगावचे भाऊबंद तिकडे मुंडन करून घेत शोक व्यक्त करीत आहे. गर्दीला प्रशासनाने मर्यादा घातल्याने शांतीधाममध्ये स्मशान शांतता आहे. नेहमी गजबजलेल्या या परिसरातील वर्दळ थांबली आहे. पिंड घेण्यासाठी येणारे कावळेही आता येत नाही. त्यामुळे ‘काव.., काव…’चा आवाज थांबला आहे. दुसरीकडे या व्यवसायावर आधारित आचारी, नाभिक, केटरर्स, सफाई कामगार या सर्वांवर बेरोजगारीचे दिवस आले आहे.
दारासमोर दशक्रिया विधी…
पिंपळगाव बसवंतसह उंबरखेड, साकोरे मिग, पालखेड, शिरवाडे वणी आदी गावातील दशक्रिया कार्यक्रम नदीतीरावर बंद केले आहेत. त्यामुळे अनेकजण घरसमोर, जवळच्या ठिकाणी सध्या दशक्रियाचे छोटेखानी कार्यक्रम करीत आहे. जवळील कालवा, नदी किंवा वाहत्या पाण्याजवळ जाऊन पिंडदान करीत आहेत. प्रवचनाचे कार्यक्रमही थांबले आहेत.
कोरोनाचा वाढचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक दशक्रिया विधीला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद केले आहेत. आजपर्यंत कधीही दशक्रिया विधी पिंपळगावच्या पाराशरी नदीशिवाय कुठेही झाले नाही. कोरोनाच्या उद्रेकाने ही परंपरा मोडीत निघाली आहे.
- प्रा.रवींद्र मोरे, पिंपळगाव बसवंत