मालेगाव (जि. नाशिक) : महापालिकेसह जिल्ह्यात २३ मेपर्यंत कठोर लॉकडाउन असताना कोरोना संसर्ग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण शहरात व बाहेर फिरणाऱ्या तसेच विनामास्क असलेल्या नागरिकांची ठिकठिकाणी रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिले. मंगळवारी (ता. १८) दिवसभरात १२४ जणांची विविध चौकात चाचणी करण्यात आली. यात एक संशयित कोरोनाबाधित आढळला. कोरोनाबाधितांना कोविड केंद्रात दाखल करण्याचे आदेश दिल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Rapid antigen testing of pedestrians in Malegaon)
महापालिका कार्यक्षेत्रात शहरात चार तपासणीनाके करण्यात आले आहेत. शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी संसर्ग पूर्णत: आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू आहेत. गोसावी यांनी बुधवारी (ता. १९) लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी प्रभाग एक व दोन मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. संसर्ग रोखण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग चांगल्या पद्धतीने व्हावे, शहराबाहेरून गावात येणारे, तसेच एखादा बाधित व्यक्ती विनाकारण शहरात फिरत असल्यास त्याच्यामुळे होणाऱ्या कोरोना प्रसारास आळा घालता यावा यासाठी उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ममता लोथे, डॉ. अलका भावसार आदींच्या पथकाने शहरातील रावळगाव नाका, महात्मा गांधी पुतळा, छत्रपती शिवाजी पुतळा, मोतीबाग नाका येथे विविध नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या. मोतीबाग नाक्यावर तीन दिवसांपासून तपासणी सुरू आहे. श्री. गोसावी यांनी विविध तपासणी नाक्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पोलिस चौकींवर तपासणी करताना तपासणी नाक्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तपासणीदरम्यान कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णास मसगा महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कोरानाबाधितांच्या जवळच्या नातेवाईकांचे सक्तीने स्वॅब घ्यावे, स्वॅब न देणाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरण करावे. गृहविलगीकरण कमी करून संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. निवासस्थानी स्वतंत्र कक्ष व सोयी-सुविधा असलेल्यांनाच हमी घेऊन गृहविलगीकरणाची परवानगी द्यावी, आदी सूचना गोसावी यांनी केल्या.
तपासण्यांची संख्या :
गिरणा पूल, मोतीबाग नाका - ३१
मोसम पुल महात्मा गांधी पुतळा - ३०
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - ३८
रावळगाव नाका, कॅम्प - २५
---------------------------------
एकूण : १२४
(Rapid antigen testing of pedestrians in Malegaon)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.