सातपूर (जि. नाशिक) : महापालिकेने (NMC) अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई अधिक तीव्र केली असून, मोतीवाला कॉलेजच्या अनधिकृत बांधकामावर (Encroachment) कारवाई करत कॅन्टीन, वाहन पार्किंग शेड, रिहबिलेशन सेंटर आदींवर कारवाई केली. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मोतीवाला कॉलेजच्या संचालकांनी केला आहे. (NMC hammer on encroachments of Motiwala College Nashik News)
मनपा आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांच्या सूचनेनंतर सातपूर विभागीय कार्यालय ॲक्शन मोडमध्ये आल्याचे बघायला मिळत आहे. सातपूर परिसरातील या आठवड्यातली तिसरी अतिक्रमण विरोधातील मोठी कारवाई मोतीवाला कॉलेजवर करण्यात आली आहे. ध्रुवनगर येथील मोतीवाला कॉलेजने आपल्या आवारातील काही अंतर्गत बदल केले होते. या बदलाची महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता बदल करण्यात आले होते. याबाबत महापालिकेकडे एका माजी नगरसेवकाने तक्रार केली होती. या अगोदर मनपा पथकाने कॉलेजला अतिक्रमण काढून घेण्याची मुदतदेखील दिली होती, परंतु कॉलेजने अतिक्रमण काढले नसल्याने महापालिका अतिक्रमण विभाग, पश्चिम विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय आणि सिडको विभागीय कार्यालय येथील कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.
सुमारे दोन तास चाललेल्या या कारवाईत कॉलेजचा अनेक भाग जमीनदोस्त करण्यात आला. याप्रसंगी विभागीय अधिकारी नितीन नेर, सिडको विभागीय अधिकारी मयूर पाटील, विभागीय अधिकारी हरीश्चंद्र, शिवाजी काळे, नगररचना विभागाचे गोकुळ पगारे, अतिक्रमण विभागाचे तानाजी निगळ, मिलिंद जाधव, मयूर काळे, सत्यम शिंदे, उमेश खैरे, विजय सपकाळ, प्रमोद आवाळे, गौतम खरे, विद्युत विभागाचे संजय पाटील, दिलीप मोकाशी यांच्यासह मनपाच्या चारही विभागातील वाहने, अतिक्रमण, विद्युत, पाणीपुरवठा आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी, पोलिस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
कारवाई सूडबुद्धीने
मोतीवाला संस्थेकडून या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय हेतूने ही कारवाई प्रेरित असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. एका राजकीय नेत्याच्या तक्रारीवरून ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप संस्थेकडून करण्यात आला. कोरोनाकाळात संस्थेने उत्कृष्ट काम केले आहे. या कार्याबद्दल संस्थेच्या गौरव ही करण्यात आला आहे. कारवाई करून कोरोनाकाळात केलेल्या चांगल्या कामाचा एकप्रकारे महापालिका मोबदला देत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.