सिन्नर : संक्रांतीच्या सणाला येवल्यापाठोपाठ सिन्नर तालुक्यात पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. डिसेंबरच्या मध्यावरच सिन्नर शहर तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये आसमंत रंगीबेरंगी पतंगांनी व्यापून गेल्याच्या दृष्टीस पडते.
संक्रांत जसजशी जवळ येते तस तसा हा माहोल अजूनच वाढतो. मात्र या उत्सवाचा बेरंग होऊ लागला आहे. आज घडीला सिन्नर शहरच नव्हे तर ग्रामीण भागात देखील पतंगबाजांच्या हाती प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा सर्रासपणे दिसू लागला आहे.
प्रशासनाकडून पोलिसांना तसेच नगरपालिकेला नायलॉन मांजा विक्री व वापर यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र हे निर्देश या दोन्ही यंत्रणांकडून केवळ कागदावरच पाळले जात असल्याचे चित्र आहे. (Nylon Manja selling rampantly Sinnar people security in crisis Police municipal teams ignorance Nashik News)
सिन्नरच्या गल्लीबोळात तसेच ग्रामीण भागातील गावागावांमध्ये पतंग उडवणाऱ्या अगदी लहान मुलांच्या हातात देखील नायलॉन मांजा आढळून येत आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईचे भय ना पतंग उडवणाऱ्यांना आहे. ना मांज्याची विक्री करणाऱ्यांना राहिले आहे.
मधल्या काळात पोलिसांनी पालिकेची पथके सिन्नरच्या विविध भागांमध्ये फिरली. त्यांनी पतंग विक्री करणाऱ्या दुकानांची झाडाझडती घेतली. एका ठिकाणी दडवून ठेवलेला लाखो रुपयांचा नायलॉन मांजाचा साठा देखील जप्त केला.
मात्र त्या पलीकडे कोणतीही ठोस कारवाई पुन्हा झाली नाही. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे नायलॉन मांजा विक्री रोखण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र या पथकाकडून देखील त्याबाबत कारवाई होताना दिसत नाही.
त्यामुळे मानवी जीवनात तसेच पशु पक्षांच्या जीवितास अपायकारक असलेल्या नायलॉन मांजाचा वापर सर्रासपणे होताना दिसत आहे. पालकांमध्ये देखील याबाबत जबाबदारीचे भान राहिलेले नाही.
त्यामुळे पतंग कटल्यावर तिच्यासोबत असलेला नायलॉन मांजा अनेकांच्या जीवितस धोका निर्माण करू शकतो. गेल्या काळात तशा प्रकारच्या घटना देखील सिन्नर शहरच नव्हे तर तालुक्यात देखील घडल्या आहेत.
पतंग उडवण्याचा आनंद जरूर घेतला पाहिजे मात्र त्यासाठी नायलॉन मांजाचा आग्रह धरणाऱ्या मुलांना पालकांनी समज दिली पाहिजे.
नाशिक शहरात तेथील पोलीस आयुक्तांनी केलेल्या कारवाईच्या धरतीवर सिन्नर शहर व तालुक्यात देखील मांजाची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर तडीपरी सारखे कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र याकडे नगरपालिका प्रशासनासह तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
'गट्टू ' या सांकेतिक नावाने सिन्नरच्या बाजारपेठेत नायलॉन मांजाची चोरटी विक्री केली जात आहे. 350 रुपये, 450 रुपये आणि 750 रुपये असे दर नायलॉन मांजाच्या एका बंडल मागे आकारले जातात.
परिचयातील व्यक्तीमार्फतच ही विक्री होत असल्याने त्याबाबत शासकीय यंत्रणा अंधारात राहते असे म्हणावे लागेल. तर दुसरीकडे नायलॉन मांजाची साठवणूक करणाऱ्यांकडून यंत्रणा मॅनेज केली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही अशी देखील चर्चा आहे.
"नायलॉन मांजा चा वापर माणसांप्रमाणेच पशु पक्षांनाही घातक आहे. नगरपालिकेसह तालुक्यातील पोलीस यंत्रणेला या संदर्भात धडक कारवाईचे निर्देश दिले जातील. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांसोबतच प्रत्यक्ष पतंग उडवणाऱ्यांच्या विरोधात देखील कारवाई केली जाईल. पालकांनी देखील मुलांकडून नायलॉन मांजा वापरला जाणार नाही यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे."- सुरेंद्र देशमुख (तहसीलदार, सिन्नर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.