नाशिक : डिजिटीलायझेशनच्या आजच्या जमान्यात आर्थिक व्यवहाराची गतीही ऑनलाइनमुळे वाढली आहे. मात्र, ऑनलाइन आर्थिक व्यवहार डोळसपणे न केल्यास धनाच्या अति लोभापायी तुमच्या बॅंकेच्या खात्यात रुपयाही शिल्लक राहणार नाही हे नक्की. सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन आर्थिक गंडा घालण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत. त्यातच अलीकडे सहज, सुलभपणे ऑनलाइन कर्ज तत्काळ मंजूर करून देणाऱ्या लोन ॲपचा फंडा वापरून गंडा घालण्याचा नवी युक्ती सायबर गुन्हेगारांकडून वापरली जात असून, आत्तापर्यंत अनेकांची लाखों रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत.
रोखीच्या व्यवहारापेक्षा सुरक्षितता म्हणून ऑनलाइन व्यवहाराकडे पाहिले जात असताना, सायबर गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. याबाबत जनजागृती करूनही फसवणूक होतच असल्याने अदृश्य स्वरुपातील सायबर गुन्हेगारांपुढे सायबर पोलिसही हतबल झाले आहेत. सायबर गुन्हेगारीत ओटीपी घेऊन फसवणूक करणे, एटीएम कार्ड क्लोनिंग करून गंडा घालण्याचे प्रमाण असले तरी त्याहीपलीकडे सायबर गुन्हेगार पोहोचलेले आहेत.
अलीकडे, समाजामध्येही सुलभतेने पैसा कसा उपलब्ध होईल, याकडे कल वाढला आहे. बँकांकडून कर्ज घ्यावयाचे असेल तर त्यासाठी अनेक अटींचे पालन करावे लागते. त्यामुळे सहजरित्या कर्ज उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही बँकांकडून ऑनलाइन कर्ज वितरणाचा फंडा वापरला जातो. त्यासाठीही काही अटी शिथिल असल्याने कर्जदारास ते सुलभ होते. याच बाबींचा सायबर गुन्हेगारांकडून गैरफायदा घेत ‘लोनॲप’च्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केली जात आहे.
फसवणूक कशी होते?
व्हॉटसॲप वा ईमेलद्वारे लिंकद्वारे काही मिनिटात लोन मिळवून देण्याचे आमिष दाखविले जाते. लिंक ओपन केल्यानंतर संबंधित व्यक्तीला प्ले-स्टोअरवरून लोन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यावेळी ॲप परमिशन दिल्याने तुमच्या मोबाईलमधील डेटा सायबर गुन्हेगार चोरतो. तसेच, लोन ॲपच्या माध्यमातून चार्जेसच्या नावाखाली किमान १५ ते ५० हजार रुपयापर्यंतची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडतात. त्यानंतरही लोन मिळत नसल्याची तक्रार केल्यास संशयित संपर्कक्षेत्राबाहेर जातो. तेव्हा संबंधिताला फसवणूक झाल्याचे लक्षात येते.
ऑनलाइन व्यवहार करतानाची दक्षता
आपला युपीआय पीन कोणालाही देऊ नये
कोणत्याही परिस्थितीमध्ये युपीआय मेसेज कोणत्याही क्रमांकांवर पाठवू नये
पैसे पाठवा, वस्तू पाठवतो असे सांगणाऱ्यावर विश्वास ठेऊ नका
गुगलवरून कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधताना सावधगिरी बाळगा; आर्थिक व्यवहार मात्र टाळा
प्रत्यक्ष वा सुरक्षित आर्थिक व्यवहारावर द्यावा भर
आर्थिक व्यवहाराबाबत शंका असल्यास संबंधित बॅंकेशी संपर्क साधावा
व्हॉटसॲप वा इ-मेलवर आलेली कोणतीही लिंक ओपन करू नये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.