नाशिक : उत्तर महाराष्ट्रात नाशिक, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतील अनेक भागांत भातलागवड केली जाते. विभागातील एक लाख सहा हजार १३८ हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी अवघ्या ४२ हजार ८४८ हेक्टर क्षेत्रावर केवळ ४०.३७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, सध्या पावसाने ओढ दिल्याने हा भात उत्पादक पट्टा अडचणीत सापडला आहे. लागवडी पुढे गेल्यास उत्पादन घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
उत्पादन घटण्याची शक्यता
नाशिक जिल्हा भात उत्पादनात आघाडीवर असूनही जुलैअखेर निम्म्याही लागवडी पूर्ण झालेल्या नाहीत. त्याखालोखाल नंदुरबार असून, येथे लागवडी बऱ्यापैकी झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात लागवडी अद्याप प्रतीक्षेत आहेत. विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. संरक्षित पाणी असणाऱ्यांनी लागवडी पूर्ण केल्या. मात्र, जिरायती भागात लागवडी खोळंबल्या आहेत. रोपांचा कमाल लागवड कालावधी ओलांडून गेल्याने अडचणी वाढल्या आहेत. सध्या वातावरण ढगाळ व दमट आहे. दोन आठवड्यांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रोपवाटिकांत रोपे लावणीला आली असताना लागवडी प्रतीक्षेत आहेत.
भात उत्पादकांच्या अडचणीत वाढ
साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत लागवडी संपतात. मात्र, अद्याप त्या निम्म्याही झालेल्या नाहीत. रोपे तयार झाल्यानंतर २१ ते ३० दिवसांनंतर शास्त्रोक्त पद्धतीने लागवडी होतात. अनेक ठिकाणी रोपे ५० दिवसांची होऊनही लागवडी नाहीत. त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.
ही आहे परिस्थिती
* पावसाने ओढ दिल्याने रोपे तयार होऊनही लागवडीची प्रतीक्षा
* संरक्षित पाण्यावर गाळ करून लागवडी सुरू
* ज्यांच्याकडे संरक्षित पाण्याचे साठे नाही, तेथे लागवडी ठप्प
* उन्हाच्या चटक्यामुळे लागवडी पिवळ्या होऊन करपू लागल्या
* रोपे अधिक दिवसाची होऊन लागवड न झाल्याने उत्पादन घटण्याची भीती
विभागातील भातलागवड स्थिती (हेक्टर)
जिल्हा... प्रस्तावित क्षेत्र...लागवड...टक्केवारी
नाशिक...७८६१३...२६०८६...३३.१८
नंदुरबार...२३०१३...१५०१८...६५.२६
धुळे...४५१२...१७४४...३८.६५
नाशिक जिल्ह्यातील स्थिती (जुलैअखेर)
तालुका...क्षेत्र...झालेली लागवड
इगतपुरी...२६६०३...१२११३
सुरगाणा...१३७१०...२७३३
त्र्यंबकेश्वर...११६३४...८७०
पेठ...९४६२...२३५२
कळवण...४५२६...१५९०
सटाणा...२०३१...३४४
नाशिक...३७०८...२९.९०
हेही वाचा > कोरोनाचा भयानक काळ...अशातही 'तिने' क्षणाचाही विलंब न लावता दिला पार्थिवाला खांदा! काय घडले वाचा
अनेक भागांत भात पिकाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पावसाची वाट पाहून लागवड करणे हा पर्याय आहे. पावसाचा खंड पडून उशीर झाल्यास रोपे खराब होतील व त्याचा उत्पादनावर परिणाम होईल. आता पावसाचा अंदाज घेऊन चिखलणी करून लागवड करावी, घाई करू नये, ज्यामुळे रोपे जळून नुकसान होणार नाही. - डॉ. दत्तात्रय कुसाळकर, सहयोगी संशोधन संचालक, ‘मफुकृवि’चे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
पाऊसच नसल्याने लागवडी थांबल्या आहेत. दीड महिन्यापेक्षा जास्त दिवसांची रोपे झाली आहेत. त्यामुळे पाऊस आला तरी उत्पादन ७५ टक्क्यांपर्यंत घटणार आहे. त्यामुळे आमच्यावर दुष्काळी परिस्थिती आहे. १९७२ दुष्काळात प्यायला पाणी होते, मात्र अन्न नव्हते. आता भरपावसाळ्यात प्यायलाही पाणी नाही. - यशवंत गावंडे, शेतकरी, गावंधपाडा, ता. पेठ
(संपादन - किशोरी वाघ)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.