पिंपळगांव बसवंत (जि. नाशिक) : निफाड, येवला तालुक्यासाठी शेतीसिंचनासाठी वरदान ठरलेल्या पालखेड धरण व डाव्या कालव्याला झळाळी मिळणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून नाममात्र व्याजदराने धरण व कालव्याच्या नूतनीकरणासाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज मिळणे दृष्टीक्षेपात आहे.
तसे झाल्यास पुढील पन्नास वर्ष धरण व कालव्याचे आर्युमान वाढणार असून कालवा फुटणे, पाण्याची गळती असे अपव्यय टळणार आहे. शेतीसिंचन व पाण्याचा पाणी मुबलक मिळून कार्यक्षेत्रातील दोन तालुके सुजलाम्-सुफलाम् होण्यास मदत मिळणार आहे. (Palkhed Dam Canal will get relief Inspection of Officers Nashik News)
१९७२ मध्ये पालखेड धरणाची उभारणी झाली. दिडोंरी तालुक्याचा पूर्व भाग, निफाड, येवला असा १२८ किमी अंतराचा डावाकालवा उभारला गेल्याने त्यावेळच्या जिरायत शेतीला वरदान ठरून हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन परिसर बागाईत बनला.
निफाड तालुक्यात द्राक्षाच्या बागा फुलविण्यात व शेतकऱ्यांना परकीय चलन मिळवून देण्यात पालखेड धरणाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. पण हे धरण व कालवा उभारून पन्नास वर्षे लोटली आहे. गाळ साचला व ७५० दशलक्ष घनफूट पाण्याच्या क्षमतेत घट झाली.
कालवे जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी गळती तर आवर्तनावेळी कालव्यांना भगदाड पडून पाण्याचा अपव्यय झाला. पालखेड पाटबंधारे विभागाने चार वर्षांपूर्वी धरण व कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव दिले होते. पण निधी अभावी हे काम रखडले होते.
अंदाजपत्रक सादर
पालखेड पाटबंधारे विभागातर्फे एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले. एडीबीचे फ्रान्स येथील जलसंपदा विभागाचे तज्ज्ञ डॅनियल रेनॉल्ट, सीडब्लूसी या केंद्रीय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी थेट धरण व कालव्याची पाहणी करून स्थिती जाणून घेतली. पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे यांनी धरणाबाबत माहिती विशद केली.
सुमारे दोनशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक त्यांनी अधिकाऱ्यांसमोर ठेवले. त्यावर एडीबीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नाममात्र व्याजदरावर हे कर्ज पालखेड पाटबंधारे विभागाला मिळणार असून उपसा जलसिंचन योजना व सभासद शेतकऱ्यांकडून येणाऱ्या उत्पन्नातून या कर्जाचा परतावा होणार आहे.
अधिकचे क्षेत्र सिंचनाखाली
कर्जरूपी निधी उपलब्ध झाल्यास धरणाच्या भिंतीचे व कालव्याचे मजबुतीकरण, आधुनिकीकरण होणार आहे. येत्या सहा महिन्यात हे काम सुरू होण्याची शक्यता असून पुढील वर्षभरात धरण व कालव्याला झळाळी मिळेल.
कालवा सक्षमीकरणामुळे अधिकचे क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकेल. यावेळी आमदार दिलीप बनकर, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र बधान, पिंपळगावचे उपअभियंता प्रशांत गोवर्धने, संजय सोनवणे, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.
"पालखेड धरणामुळे निफाड तालुक्यातील शेतीचे मोठे क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. पन्नास वर्ष जुन्या कालव्यामुळे गळती व कालवा फुटीच्या समस्या उद्भवत आहे. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने नाममात्र व्याजदरावर कर्ज देण्याची भूमिका घेतल्याने धरण व कालव्याचे नूतनीकरण होऊन पुढील पन्नास वर्षाची जलअपव्यय टळणार आहे." - दिलीप बनकर, आमदार
"एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्यावतीन महाराष्ट्रात पहिलीच रॅप मास्कोट कार्यशाळेचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले. त्यात पालखेड धरणाचे आधुनिकीकरण हा मुद्दा केंद्रस्थानी होता. अधिकाऱ्यांनी धरण व कालव्याला भेट देऊन कर्जरूपी निधी देण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे." -संजय बेलसरे, मुख्य अभियंता, पाटबंधारे विभाग
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.