Ram Lalla Pran Pratishtha : ''आज (२२ जानेवारी) अयोध्येच्या मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. संपूर्ण भारतासाठी यापेक्षा मंगलकारी घटना ती कोणती असेल? विगत ५०० वर्षांच्या सतत संघर्षानंतर आणि लाखो ऋषी-मुनी, साधू-संत, प्रादेशिक, ग्रामीण, नागरिक व कारसेवकांचे समर्पण आणि बलिदानातून हा कपिलाशष्टीचा योग जुळून आला आहे. मागील कित्येक पिढ्यांनी राम मंदिर साकार होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्नच राहून गेले. आज ते स्वप्न प्रत्यक्ष साकार होत असताना भारतमातेला खराखुरा आनंद झाला असेल. राम भारताचा आत्मा आहे आणि ते आत्मरूप सन्मानाने अयोध्येत आज रामलल्लाच्या स्वरूपात विशालकाय मंदिरात सन्मानाने आणि विधिवत विराजमान होत आहे. संपूर्ण जग भारतीयांच्या या आस्थेकडे, संस्कृतीकडे आणि परंपरेकडे डोळे विस्फारून पाहत आहे. अयोध्येत घडत असलेल्या या महाप्रसंगानिमित्त या लेखाचे रामार्पण.''
- संजीव आहिरे, अमृतधाम, पंचवटी, नाशिक
(Panchavati Ramayana should be original heritage nashik news)
आपल्या १४ वर्षांच्या वनवासादरम्यान जास्तीत जास्त काळ प्रभू रामचंद्रांनी मंदाकिनी नदीच्या काठी वसलेल्या चित्रकूट पर्वतावर व्यतीत केला. चित्रकूट पर्वतावरून भ्रमण करीत ते दंडकारण्यात असलेल्या अगस्ती ऋषींच्या आश्रमात आले.
तिथे वास्तव्य करीत असताना अगस्ती ऋषींनी त्यांना गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या पंचवटी येथे जाऊन राहा व तेथील ऋषीमुनींचे राक्षसांपासून संरक्षण करा, अशी सूचना केली.
अगस्ती ऋषींनी सुचविल्याप्रमाणे प्रभू रामचंद्र, माता जानकी आणि लक्ष्मण यांची सहा पावले पंचवटीतल्या पाचोळ्यावर पडली आणि एका विलक्षण पर्वाची नांदी झाली, ते कमलकांत श्रीचरणी सघन वृक्षाखालच्या पाचोळ्यावर पडून त्यातून जो मंगल ध्वनी उमटला, त्या ध्वनीत धर्मयुद्धाच्या शंखध्वनीचा निनाद दडला होता.
ती एक अभूतपूर्व आणि अनन्यसाधारण घटना होती, ज्यामुळे अवध राजपुत्र रामाला रामस्वरूप प्राप्त झाले.
पंचवटीच्या या भूमीने एका नव्या रामाला जन्म दिला. पंचवटी ही एक अशी दिव्यभूमी आहे, जिने जगाला पुरुषोत्तम राम निर्माण करून दिला. एक असे चिरंतन पात्र या भूमीने घडविले, ज्याला मानवी सभ्यतेत तोड नाही.
मानवी संस्कृती विवेक, संयम, विनय, पराक्रम, धर्मपरायणता आणि त्याग यांसारख्या अनमोल गुणांनी बहरली. जगासमोर अत्युच्च मानवी आदर्श निर्माण झाला.
पवित्र गोदावरीच्या किनारी रामाच्या निर्देशानुसार लक्ष्मणाने वृक्षांच्या फांद्या, झावळ्या आणून पर्णकुटी तयार केली व त्या पर्णकुटीत ते निवास करू लागले.
या सुरवातीच्या दिवसांतच लक्ष्मण जवळच्या जंगलात सरपण आणि श्रीरामाला पूजेसाठी फुले आणण्यास गेले असता दंडकारण्याची अधिपती रावणाची बहीण शुर्पणखा तिथे विहार करीत होती.
अचानक तिची दृष्टी राजकुमार लक्ष्मणावर पडली. लक्ष्मणाच्या राजबिंड्या रूपावर ती अत्यंत मोहित झाली.
लक्ष्मणासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवू लागली. प्रेम आणि युद्ध मानवी संवेदनेच्या कमाल पातळ्या आहेत. शुर्पणखेच्या मनात निर्माण झालेल्या या प्रेम रसायनात भविष्यातला रणसंग्राम दडलेला होता.
सीतेबद्दलची असूया आणि राम-लक्ष्मण यांच्याबद्दल निर्माण झालेली ईर्ष्या यातून नवीन संघर्ष निर्माण होऊन युद्धाच्या ठिणग्या पडू लागल्या आणि जगातील एका अद्वितीय महाकथेच्या अर्थात रामायणाच्या जन्माची सुरवात या भूमीवर झाली.
या प्रसंगानंतर पंचवटीत गोदावरीच्या किनारी राहत असताना पुढे युद्धाला खतपाणी घालणाऱ्या एकामागून एक घटना घडत गेल्या.
यात शुर्पणखेचे नाक विच्छेदन किंवा श्रीरामाने शुर्पणखेला प्रेयसी किंवा पत्नी स्वरूपात नाही, भक्त स्वरूपात येण्याच्या सल्ल्यापासून तर खर-दूषण, अहिरावण-महिरावण यांसारख्या राक्षसांबरोबर झालेल्या तुंबळ युद्धापर्यंत अनेक घटनांचा समावेश आहे; पण त्याचबरोबर श्रीराम दंडकारण्यात ऋषीमुनींवर राक्षसांकडून होत असलेले पाशवी अत्याचार पाहून अत्यंत व्यथित झाले.
ऋषीमुनींच्या तपश्चर्यत विविध प्रकारचे अडथळे निर्माण करून राक्षस त्यांच्यावर अत्याचार करीत. श्रीरामांच्या धर्मपरायण मनाला या साऱ्या घटना विलक्षण चटका लावून गेल्या आणि ऋषीमुनींना अभय देण्यासाठी त्यांनी राक्षसी प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी धनुष्य हाती घेतले.
अवधी अर्थात कधीही कुणाचा वध न करणाऱ्या रामाने आपले क्षत्रिय रूप धारण केले. रामाच्या चरित्र परिवर्तनाची ही एक विलक्षण घटना आहे.
धर्मयुद्धाचा शंखनाद श्रीरामांच्या मनात इथेच झाला आणि दंडकारण्यात अधर्माविरुद्ध धर्माचा, राक्षसांविरुद्ध श्रीराम आणि लक्ष्मणाचा एक अविरत संघर्ष सुरू झाला.
या संघर्षातून राजकुमार रामाचे धर्मयोद्धा रामात परिवर्तन झाले. श्रीरामांच्या मनोधारणेत झालेले हे परिवर्तन अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.
एक नवा राम या भूमीने जन्माला घातला. जो राजा राम नाही, अयोध्येचा राजपुत्र नाही, केवळ वनवासी राम नाही, अवधी राम नाही, निसर्गात रमणारा कवी राम नाही, दशरथ नंदन राम नाही, तो या सर्वांपेक्षा वेगळा धर्मपरायण धनुर्धारी आणि त्यागाची परिसीमा गाठणारा राम आहे.
त्यामुळेच रामाचे चरित्र जगाच्या मानवी सभ्यतेत आदर्शांचा कळस ठरले आहे. रामाने घालून दिलेल्या त्याग, तपस्या, बलिदान, धर्म आणि विवेकाच्या स्तंभातूनच चिरंतन भारतीय संस्कृतीचा जन्म झाला आहे. जी आज जगाच्या पाठीवर अजरामर संस्कृती आहे.
भारतीय संस्कृतीचा गाभा श्रीरामाच्या चरित्राभोवती गुंफलेला आहे. यामुळेच राम भारतवर्षाचा प्राण आहे. यानंतरच्या कालखंडात पंचवटीत नवनवीन घटना घडत गेल्या.
राम, लक्ष्मण आणि राक्षस युद्ध सुरू झाले. यात अनेक बलशाली राक्षस धारातीर्थी पडले. युद्धाची भीषणता एवढी दाहक होती की केव्हा काय होईल, याचा अंदाज बांधणे अवघड झाले होते.
परिस्थितीचा अंदाज घेऊन सीतेला जवळच असलेल्या गुफेत सुरक्षित ठेवण्यात आले आणि याच कालावधीत मारिचाने मृगाचे रूप घेऊन रावणाच्या षडयंत्राला प्रत्यक्ष रूप दिले. मायावी स्वर्णमृगामागे राम पंचवटीपासून गोदावरी तीरावरच्या निफाड तालुक्यातील बाणेश्वर मंदिरापर्यंत धावत गेले.
आताचे बाणेश्वर मंदिर जिथे आहे, त्या जागेवर रामाने शरसंधान साधून मारिचाची मृगया केली. मारिचाने प्राणांतक टाहो फोडला. सीतेने लक्ष्मणाला रामाचा शोध घेण्यास पाठविले. रावणाने संधी साधून सीतेचे अपहरण केले.
धर्मयुद्धाची ती दुसरी ठिणगी होती. रामायणाचा शंखध्वनी याच ठिकाणी खऱ्या अर्थाने फुंकला गेला होता. या घटनेनंतर सीतेच्या शोधात श्रीरामाने थेट लंकेत जाऊन रावणाच्या राजसिंहासनाला कापरे भरविले आणि रामायण घडले.
इथे प्रकर्षाने अधोरेखित करावयाचा मुद्दा असा, की रामायणाला जन्म देणाऱ्या मूळ घटना पंचवटी, नाशिक येथे सर्वप्रथम प्रत्यक्ष रूपाने घडल्या आहेत. पंचवटी ही नाशिकची भूमी रामायणाची मूळ जन्मभूमी आहे.
रामायणाची बीजभूमी आहे. रामायण घडविणाऱ्या सर्व मूळ घटना या भूमीत घडल्या आहेत. या भूमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नाशिक, पंचवटीतील भूमीच्या संस्कारांतून रामायण घडविणारा राम जन्माला आला आहे.
पंचवटीचा राम अनन्यसाधारण आहे आणि त्या रामाला जन्म देणारी ही एक दिव्यभूमी आहे. रामायणाची खरी जन्मदात्री भूमी आपल्या नाशिक पंचवटीची भूमी आहे. रामायणावर आजपर्यंत अनेक प्रकारचे साहित्य निर्माण झाले.
रामायणाची विविध रूपेही आपल्याला परिचित आहेत, ज्यात प्रामुख्याने दशरथनंदन राम, अयोध्येचा राम, चित्रकूटचा राम, वाल्मीकींचा राम, तुलसीदासजींचा राम खूप चर्चिले गेले आहेत; परंतु इथल्या पंचवटीचाच वनवासी राम मात्र अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे.
खरे तर पंचवटी, नाशिक ही रामायणाची मूळ जन्मभूमी असल्याकारणाने अयोध्या आणि चित्रकूटप्रमाणे प्रमुख रामभूमीचा दर्जा नाशिकच्या भूमीला दिला जायला हवा होता; परंतु आजपर्यंत तसे होऊ शकले नाही, ही महाराष्ट्र आणि नाशिककरांसाठी मोठी खेदाची बाब आहे.
पंचवटीचा हा वनवासी राम अभिजात राम नाही. तो पर्णकुटीत राहणारा, कंदमुळे खाणारा, वल्कले परिधान करणारा, भिल्ल, कोळी, वानर तसेच आदिम वनवासीमध्ये रमणारा सर्वसामावेशक आणि सामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणारा राम आहे.
निसर्गात रमलेला हा राम अनन्यसाधारण आहे. प्रकृतीशी एकरूप झालेल्या या मानवस्वरूप रामात निसर्ग झिरपला आहे. त्यामुळे सर्व प्राणीमात्रांवर निखालस प्रेम करणारा, दया, शांती आणि समता यांचा प्रत्यक्ष पाठ घालून देणारा असा हा राम आहे. प्रकृतीतले चिरंतन सत्य, पंचमहाभूतांची कमालीची तन्मयता यांचा समन्वय या रामाच्या चरित्रात झालेला आहे.
त्यामुळे शाश्वत सत्य आणि धर्मासाठी धनुष्याचा टकार उडवीत पंचवटीपासून श्रीलंकेतील रावणाच्या राजमहालापर्यंत दुर्बळांना सबळ करीत, अन्यायपीडितांना न्याय देत, शोषितांचा उद्धार करीत, चौफेर सत्याची उधळण करीत धर्म संस्थापित करणारा हा विलक्षण राम आहे. रावणाशी झालेल्या युद्धात राम आपल्या न्यायबुद्धीने झळाळतो.
त्यामुळे पंचवटीचा राम अन्य भूमिकांपेक्षा वेगळा वनवासी आणि सर्वहारा वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा राम आहे. या वनवासी रामाचा पुरुषार्थ, पराक्रम आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या वृत्तीमुळे रामाला अधिनायक राम बनविले आहे.
रामभक्त सरकारची हवी इच्छाशक्ती
खरे तर पंचवटीत या मूळ घटना घडल्या नसत्या तर रामायणच घडले नसते. रामायणासारखा अद्भुत जीवन ग्रंथ साकार होऊ शकला नसता. पंचवटी नाशिकचे हे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता पंचवटीला ‘रामायणाच्या धरोहर भूमीचा’ दर्जा दिला जायला हवा होता.
नाशिक रामायणाची धरोहर झाले असती, तर आज इथले चित्र फार वेगळे राहिले असते. एक वेगळा सांस्कृतिक, अध्यात्मिक, पारंपरिक ठसा निर्माण होऊन नाशिक रामायणाची जन्मस्थळी म्हणून नावारूपाला येऊ शकले असते.
संपूर्ण जगाच्या नजरेत पंचवटी नाशिक रामायणाची जन्मभूमी म्हणून आदराने ओळखली गेली असती. रामाच्या चरित्राचा जनमानसावर परिणाम होऊन समाज अधिक शांतीपूर्ण आणि न्यायप्रवण होऊ शकला असता. जगाच्या नकाशावर नाशिक रामभूमी म्हणून ओळखले गेले असते.
येथील गिरीपर्वत, निसर्ग विविधता, अनुकूल हवामान यामुळे नाशिक रामभूमीबरोबर पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर उदयास आले असते; परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, स्थानिक नागरिकांचे औदासिन्य आणि रामायण समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत अद्यापही पोहोचू न शकणे अशा कारणांमुळे आजपर्यंत हे शक्य झालेले दिसत नाही.
त्यामुळे नाशिकचे प्राचीन काळाराम मंदिर जसे प्रकाशझोतात यायला हवे, तसे आजपर्यंत येऊ शकले नाही. अयोध्येच्या राम मंदिर निर्माणाने आणि आजच्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेमुळे ती शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे.
सुदैवाने राज्यात धर्म आणि संस्कृतीला महत्त्व देणारे सरकार आहे. केंद्र सरकार रामभक्तांचे सरकार आहे. केंद्रातील रामभक्त सरकारचा नाशिक आणि महाराष्ट्रातील जनतेने याकामी पाठपुरावा करायला हवा आणि नाशिकला रामायणाच्या मूळ धरोहरचा दर्जा प्राप्त व्हायला हवा, हीच आजच्या या महाप्रसंगी महाराष्ट्राची सार्थ अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.