कळवण (जि. नाशिक) : ऑक्सिजन नसल्याने खासगी रुग्णालय बंद होण्याच्या मार्गांवर, रेमडेसिव्हिर इंजेक्शन कुठेच मिळत नाही. डॉक्टर सांगतात इंजेक्शन देणे गरजेचे आहे. कोविड सेंटरचे उंबरठे झिजविले. मात्र अभोणा, मानूरला ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला नाही. वेळेत बेड मिळाला नाही, तर त्याच्या जिवाला धोका पोचेल. त्यामुळे ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्या, असा टाहो कळवण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक फोडत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. दुसरीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने खासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गावर आहे.
कळवण तालुक्यातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा कोविड सेंटरला ऑक्सिजन, वैद्यकीय यंत्रणासह मनुष्यबळ पुरविण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे यंत्रणा व आरोग्य सेवा द्या, नाही तर कोविड सेंटरला कुलूप लावण्याचा इशारा आमदार नितीन पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिला. तरी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा अद्याप ढिम्म असल्याने ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव गुदमरून राहिला आहे. कळवण तालुक्यातील रुग्णसंख्या ७५० पर्यंत पोचली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुक्यातील वैद्यकीय उपचार यंत्रणा कमी पडत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची गरज आहे. परंतु कळवण तालुक्यातील अभोणा व मानूर या शासकीय कोविड सेंटर आणि कळवण शहरातील खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या प्रकृतीत बिघाड होत असून, नातेवाईक चिंताग्रस्त आहेत.
खासगी रुग्णालयाला ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने सिलिंडरच्या शोधात रोज देवळा, सटाणा, मालेगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिक, सिन्नर, विल्होळी येथे त्यांची भटकंती सुरू आहे. उपलब्ध सिलिंडरवर रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. मात्र ऑक्सिजन सिलिंडर आणि रेमडेसिव्हिर वेळेवर उपलब्ध झालेच नाही, तर खासगी रुग्णालय बंद करून घेण्याची मनःस्थिती रुग्णालयांची झाली आहे.
कोरोनाकाळात डॉक्टर चांगल्या पद्धतीने काम करत असले तरी त्यांच्यापुढे अनेक समस्या येत असून, रुग्णांना ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातून येणारे कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेड वाढवण्यासाठी मागणी होत आहे.
सध्या अभोणा, मानूर येथील कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत. परंतु उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र खासगी रुग्णालयातदेखील ऑक्सिजनअभावी रुग्ण दाखल करून घेतले जात नाहीत.
कळवण तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कळवण, अभोणा आणि सुरगाणा येथे हवेतील ऑक्सिजन संकलित करून त्यातील नायट्रोजन व कार्बन डाय ऑक्साइड बाजूला करून जंबो सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरून ठेवण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- नितीन पवार, आमदार, कळवण
आमदार नितीन पवार यांच्या मदतीमुळे अंशतः ऑक्सिजन सिलिंडर व रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध झाले. मात्र रुग्णांच्या आवश्यकतेनुसार रोज १५ ते २० सिलिंडरची गरज पडते. ते उपलब्ध होण्याची गरज आहे. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडर मागणीनुसार उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र उपलब्ध होत नसल्याने सेंटर बंद करण्याची मनःस्थिती आहे.
- डॉ. राकेश शेवाळे, कळवण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.