कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. हे अभयारण्य पर्यटकांसाठी जरी खुले नसले तरी दरवर्षी अनेक पर्यटक देशातील परदेशी ‘पाहुण्यां‘ना जवळून न्याहाळण्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. esakal
महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या आणि १९८६ मध्ये अधिसूचित झालेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात किलबिलाट वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याला राज्यातील पहिल्या 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळाला आहे. अभयारण्यात देश-परदेशातील पक्षीमित्र अभ्यास करण्यासाठी भेट देत असतात. पण यंदा कोरोना पार्श्वभूमीवर पर्यटक आणि पक्षीमित्र अभयारण्यात जाऊ शकत नव्हते. अनेक पक्षीमित्रांनी अभयारण्य खुले करावे अशी मागणी वन विभागाकडे लावून धरली . अनेक महिन्यांपासून अभयारण्य बंद असल्याने वन कर्मचारी, गाईड यांना मोबदला मिळाला नाही. पर्यटन सुरु झाली तर आर्थिक अडचण दूर होणार आहे. जागतिक महत्त्वाच्या पाणथळांच्या यादीत २४१० व्या क्रमांकावर या अभयारण्याचा समावेश केल्याची घोषणा नाशिक वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी वर्ष २०२० मध्ये केली. २७ जानेवारी २०२० रोजी स्वित्झर्लंडच्या ग्लांड येथील रामसर सचिवालयातर्फे केंद्र सरकारला याबाबत माहिती देण्यात आली.मोकळ्या आकाशात भरारी घेणारा बहिरी ससाणा...ध्यानस्थ साधूसारखा पाण्यात उभा असलेला बगळा... एरव्ही चटकन न दिसणारा नर्तक, धनेश, करकोचे असे विविध पक्षी इथे मनसोक्त बागडत असतात.
देशातील आणखी ९ पाणथळांचाही यामध्ये समावेश झाला असून, भारतातील हे ३१ वे जागतिक पाणथळ स्थळ ठरले आहे. यामुळे येत्या काळात वन्यजीव संवर्धन व संरक्षणासह पर्यटन आणि रोजगारवृध्दीसाठी निश्चितच फायदा होणार आहे.गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमाच्या प्रवाहावर नांदूर मधमेश्वर दगडी धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या खालच्या बाजूला नदी पात्रातील खडकावर नांदूर मधमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. धरणातील जलाशयाचे पाणी दोन्ही बाजूने कालव्याद्वारे औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना देण्यात आले आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, जागतिक वन्यजीव निधी आणि वनविभाग महाराष्ट्र यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने निर्माण झालेलं नांदूरमधमेश्वर हे एक सुरेख पक्षी अभयारण्य आहे. संपन्न जैव विविधतेचा अनुभव घेण्यासाठी एक उत्कृष्ट असं स्थान आहे. जलाशयातील उथळ पाणी, पाण्यातील विपूल जलचर, विविध पाण वनस्पती, किनाऱ्याला असलेली वनराई आणि जवळच्या सिंचित शेतातील पिकं यामुळे पक्षांसाठी हे आकर्षणाचे ठिकाण झाले असून त्यांच्या निवासासाठी एक उत्तम स्थळ गणलं गेलं आहे. हे महाराष्ट्रातील एक उत्तम ‘पक्षीतीर्थ’ आहे. पक्षी निरीक्षणातून येथे २४० हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहे. येथील जलाशयात २४ जातीचे मासे आहेत.परिसरात ४०० हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे.
या परिसरात उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटे, विविध प्रकारचे साप दिसून येतात. अभयारण्यात पक्षी सुची तयार करण्यात आली आहे आणि दरवर्षी पक्षी गणनेनंतर ती सुधारित (अपडेट) केली जाते. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षी अधिवासाची संपन्नता तसेच दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्त्व लक्षात घेऊन हे क्षेत्र ‘भारतीय पक्षीतीर्थ जाळ्या’त समाविष्ट करण्यात आले आहे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.