सटाणा (जि. नाशिक) : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने काल ता.12 पासून जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सटाणा शहर व तालुक्यात प्रतिसाद मिळत आहे. मात्र प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवत बाहेर मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून आज गुरुवार (ता.13) रोजी लाठीचा प्रसादही देण्यात आला. (Police took action against those who were wandering in Satana without any reason)
नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करून दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी एक दुकान सील करून पंधरा हजारांचा दंडाची कारवाई केली आहे.
नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून बाधितांसह मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कालपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला असून या बंद काळात दवाखाने आणि मेडिकल वगळता इतर सर्व व्यवहारांवर कडक निर्बंधांचे आदेश दिले आहेत. नागरिकांनीही अत्यावश्यक वैद्यकीय कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. मात्र प्रशासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाचे 'सुपर स्प्रेडर' ठरत आहेत. आज सकाळपासून सटाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई यांच्या पथकाने शहरातील विविध भागात नाकेबंदी करून बाहेर मोकाट फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांना लाठीचा प्रसाद दिला. रस्त्यावर येणाऱ्या काही दुचाकी पोलिसांनी जप्त करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे.
लॉकडाऊन जाहीर होताच शहर आणि ग्रामीण भागात किराणा दुकान व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरीकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र काल ता.12 पासून प्रशासनाने लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली असून बाहेर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. किरकोळ कामे व बाजारासाठी आलेल्या सर्व दुचाकी पोलिसांतर्फे जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे आज सकाळी दहा वाजेपर्यंत विनाकारण रस्त्यावरील वाहनांची संख्या घटलेली दिसत होती. तर किरकोळ नागरिकांची वर्दळ वगळता रस्ते सामसूम झाले होते. दरम्यान, शहरातील स्टेट बँकेशेजारी काल बुधवार (ता.12) राजी रात्री उशिरापर्यंत एक मेडिकल सुरू होते. यावेळी ग्राहक आणि दुकानदारही विनामास्क असल्याने तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल सहाय्यक मच्छिंद्र मोरे, व लक्ष्मण गवारी यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत दुकान सील केले आणि संबंधित व्यावसायिकाला पंधरा हजारांचा दंडही केला.
शासकीय नियमानुसार फक्त रुग्णालये आणि मेडिकल दुकाने ही अत्यावश्यक सेवा ठराविक वेळेतच सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र काही व्यावसायिक शासकीय नियम न पाळता चोरून दुकाने सुरू ठेवत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा व्यावसायिकांकडून दंड वसूल करून कोरोना काळ संपेपर्यंत त्यांची दुकाने सीलबंद करण्याची कारवाई केली जाईल.
- जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदार, बागलाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.