नाशिक / एकलहरे : रविवारी (ता. 5) रात्री नऊला विजेचे दिवे बंद करून लोकांनी नऊ मिनिटांसाठी दिवे किंवा मेणबत्त्या पेटवाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याचा वीज ग्रिडच्या कामांवर परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात असले, तरी ग्रिडवर ताण येऊन फ्रिक्वेन्सी कमी-जास्त होऊन ग्रिड फेल होण्याची शक्यता अधिक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी "सकाळ'ला सांगितले.
वीज वितरण, डिस्पॅच सेंटर क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशभरातील वीजनिर्मिती करणारे अभियंते व लोड डिस्पॅच सेंटरवर काम करणारे अभियंते चिंतेत पडले आहेत. या नऊ मिनिटांच्या कालावधीत नियोजन कसे करायचे, या संदर्भात अभ्यास सुरू आहे. सर्व राज्यांमधील वीजवहन तारा एकाच नॅशनल ग्रिडला जोडण्यात आल्या आहेत. पूर्वी एका राज्यातील महत्त्वाच्या वीज केंद्राची वीजनिर्मिती शून्यावर आली, तर संपूर्ण राज्य काळोखात जात असे; परंतु आता देशातील सर्व ग्रिड एकत्र आल्याने असे प्रकार घडत नाहीत. मात्र, येत्या रविवारी फ्रिक्वेन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होऊन ग्रिड फेल्यूअर झाल्यास संपूर्ण देश काळोखात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी देशभरातील सर्व वीजनिर्मिती केंद्रे व लोड डिस्पॅच सेंटर यांना युद्धपातळीवर तयारी करावी लागणार आहे.
संभाव्य उपाययोजना
* संबंधित नऊ मिनिटांच्या कालावधीत संच कमी क्षमतेने चालविणे.
* जलविद्युत केंद्र व अणुऊर्जेवर चालणारी केंद्रे प्रथम सुरू करावी लागतील.
* औष्णिक वीज संच निम्म्याहून अधिक कमी क्षमतेने चालवावे लागतील.
* संच कमी क्षमतेने चालवायचा म्हटल्यावर इंधन, तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागेल व परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल.
* बंदचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा विजेची मागणी वाढेल तेव्हा, लोड डिस्पॅच सेंटरचा खरा कस लागेल. त्यासाठी कोणते संच सुरू करायचे, कोणत्या संचाचा लोड वाढवायला सांगायचा हे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
फरक पडणार नाही
दरम्यान, विजेचे दिवे जरी नऊ मिनिटांसाठी बंद केले, तरी घरातील फ्रीज, टीव्ही व विजेवर चालणारी अन्य उपकरणे, अत्यावश्यक सेवेतील यंत्रणा, हॉस्पिटल यांच्याकडील विजेची मागणी राहीलच. त्यामुळे फारसा फरक पडणार नसल्याचे या क्षेत्रातील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा > धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्शन..
मागणी-पुरवठा हा वितरण व लोड डिस्पॅचशी संबंधित विषय आहे. मी एक अभियंता म्हणून एवढेच सांगू इच्छितो, की यंत्रणा सतर्क आहे. गरज पडल्यास जलविद्युत व अणुऊर्जा केंद्र प्रथम सुरू करून, वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. राज्य वा देश अंधारात जाण्याची शक्यता नाही. कारण पूर्वतयारी सुरू आहे. -महेश आफळे, जनसंपर्क अधिकारी, महानिर्मिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.