Onion News : शेतकऱ्यांच्या समाधानासाठी केंद्र शासनाने २४१० रुपये दराने कांदा खरेदीची घोषणा केली. मात्र ही खरेदी करणार कोण?,हा दर आहे कुठे? हा सवाल करत आज येथे शेतकरी संतप्त झाले.
येथील बाजार समितीत आज लिलावात १५०० ते १७०० रुपयांचे दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत लिलाव बंद पाडून नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. (price of Rs 2410 announced by central government Farmers closed auction and blocked road at yeola nashik)
गुरुवारी जिल्ह्यातील बंद असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव आज पुन्हा सुरू झाले. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मध्यस्थीनंतर कांदा भाव २४१० रुपयांप्रमाणे खरेदी करण्यात येणार होता.
किंबहुना सत्ताधारी मंत्री सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याचे सांगत होते.मात्र प्रत्यक्षात आज येथील बाजार समितीत या भावाने खरेदीची कुठलीही यंत्रणा नसल्याचे आज सकाळी लिलाव सुरू होताच शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.
त्यातच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५०० ते १७०० रुपये या दराने व्यापाऱ्यांकडून कांदे खरेदी सुरू झाल्याने संताप झालेल्या शेतकऱ्यांनी दिला बंद पाडत नगर - मनमाड महामार्गावर धाव घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर रस्ता रोको आंदोलन सुरू केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे सर्वांची तारांबळ उडाली.
आक्रमक झालेले शेतकरी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर बसून असल्याने सुमारे एक तास दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, तसेच माजी सभापती संभाजीराजे पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसन धनगे, उपसभापती बापूसाहेब गायकवाड, संचालक संजय बनकर, व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार अट्टल, भरत समदडिया, बाजार समितीचे व्यापारी कैलास व्यापारे आदींनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या पदाधिकाऱ्यासह पोलिसांनी हस्तक्षेप करत समजूत काढल्याने अखेर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. दोन दिवसात मंत्री छगन भुजबळ यांच्या सोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊन लिलाव पुन्हा सुरू केले जाईल अशी माहिती सभापती किसन धनगे यांनी दिली.
"नैसर्गिक आपत्तीमुळे उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यातच यंदा चाळीत कांदा सडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर असलेला कांदा शेतकरी गेल्या सहा महिन्यापासून जपत आहेत.आता चार हजाराच्या आसपास दर मिळाला तरच हे पीक परवडणार आहे.सध्या मिळणाऱ्या भावात गुंतवलेले भांडवल ही मिळण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी हिताचा निर्णय घेण्याची गरज आहे."
- संभाजीराजे पवार,माजी सभापती,येवला
"काल नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री भारती पवार, नाफेडचे एमडी रितेश चौव्हाण यांनी सर्व बाजार समित्यांमध्ये नाफेडची कांदा खरेदी २४१० रुपये क्विंटल दराने होईल.असा शब्द देऊनही आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये नाफेडच्या कांदा खरेदीसाठी सरकारी एजन्सीज उतरल्या नाहीत.व्यापाऱ्यांनी लिलावात कांदा पंधराशे ते सतराशे रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यास सुरुवात केल्यानंतर पिंपळगाव, लासलगाव, येवला कळवणसह सर्व बाजार समित्यांचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत. कांदा शेतकऱ्यांचा संताप सरकारला महागात पडेल."
-भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.