नांदगाव : रेल्वेच्या तिसऱ्या लोहमार्गाचे काम सुरू असताना या मार्गावरील तालुक्यातील न्यायडोंगरी, हिंगणे, पिंपरी, परधाडी, मांडवड (पिंजारवाडी) आदी गावांमधील पूर्वीचे वापरातील रस्ते, भुयारी मार्ग बाधित झाले आहेत.
त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. जीव धोक्यात घालून रूळ ओलांडावे लागतात अथवा सुरक्षेसाठी चार ते बारा किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. पायाभूत सुविधांच्या नावाखाली असुविधा झाल्याची कैफियत ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडली आहे. (problem of rural communication due to third railway line Villagers raised their grievances with MP supriya Sule Nashik)
संसदेच्या अधिवेशनात नांदगावकरांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधावे अशा मागणीचे निवेदन खासदार सुळे यांना ग्रामस्थांनी पाठवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे म्हणाले, की न्यायडोंगरी, हिंगणे, पिंपरी, परधाडी, मांडवड (पिंजारवाडी) आदी गावाच्या हद्दीतून लोहमार्ग गेला असून रेल्वे विभागातर्फे सद्यःस्थितीत तिसऱ्या मार्गाचे सुरू आहे.
त्यामुळे पूर्वीच्या दळणवळणाच्या मार्गाचा प्रश्न तयार झाल्याने शेती, शिक्षणासह दैनंदिन कामांमध्ये अडचणी येत आहेत. नवीन लोहमार्गामुळे पूर्वीचे उपलब्ध असलेले रस्ते, भुयारी मार्ग बंद झाल्याने सर्वसामान्यांची गैरसोय होणार आहे.
त्यामुळे पूर्वीपासून सुरू असलेले भुयारी मार्ग व समांतर रस्ते पुनर्विकसित व्हावेत. काही ठिकाणी रेल्वे व स्थानिक प्रशासनाने समन्वयाने हद्द निश्चिती करीत रस्ता तयार करणे गरजेचे आहे. मात्र, रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या आक्षेप ग्रामस्थांचा आहे.
संपर्क सतत खंडीत
न्यायडोंगरी येथील तांड्याजवळ रेल्वेचा पोल क्रमांक ३०५/०५/१८/२० जवळ असलेला रेल्वे मार्गावरील पूल अरुंद आहे. त्यामुळे न्यायडोंगरी पंचक्रोशीतल्या परधाडी, पिंपरी, हवेली, हिंगणे, देहरे या गावांचा संपर्क वारंवार खंडीत होत आहे.
वाहन पुलाखालून काढता येत नसल्याची समस्या रेल्वेच्या तिसऱ्या ‘ट्रॅक'मुळे उदभवत आहे. अशीच परिस्थिती नांदगाव शहराजवळ असणाऱ्या क्रांतीनगर, आझादनगर आदी गाव व वाड्या-वस्त्यांतील रहिवाशांची झाली आहे.
विद्यार्थ्यांना नांदगावमधील शाळेत जाताना आणि येताना रेल्वेलाइन ओलांडून जीव धोक्यात घालावा लागतो.
त्यामुळे जीवित हानी होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे, असे सांगून श्री. बोरसे म्हणाले, की पूर्वीपासून सुरू असलेल्या भुयारी मार्ग व समांतर रस्त्यांचा रेल्वेने पुनर्विकास आराखड्यात समावेश करणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे रेल्वे यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.