नाशिक : नाशिक रोड येथील सहाही प्रभागांमध्ये झोपडपट्ट्यांमधील समस्या जैसे थे आहेत. महापालिकेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे, मात्र पाच वर्षात नागरिकांना महापालिकेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. लोकप्रतिनिधींनी झोपडपट्ट्यांचा वापर केवळ व्होटबँक म्हणूनच केला. शासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी ‘सकाळ’ कडे व्यक्त केली आहे.
२०१७ सालात नाशिक महापालिकेची निवडणूक झाल्यावर नगरसेवक पांढरपेशा वस्त्यांमध्ये फिरले नाही. झोपडपट्ट्यांचा भाग बराचसा दुर्लक्षित राहिला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. व्होट बँक म्हणून झोपडपट्ट्यांचा वापर करण्यात आला.
...येथे आहेत समस्या
नाशिक रोडला कॅनॉल रोडची सर्वात मोठी आम्रपाली झोपडपट्टी, मोरे मळा, गोरेवाडी, नोट प्रेसच्या बाजूला असणारी वसाहत, भीमनगर जवळील घरे, जेतवननगर, उपनगर, पगारे मळा, आम्रपाली, ज्योतिबा फुलेनगर, इंदिराविकासनगर, फर्नांडिस वाडी, गुलाबवाडी, राजवाडा, मालधक्का रोड, सिन्नर फाटा, पवारवाडी, गुलजारवाडी, गोसावीवाडी, सुंदरनगर, रोकडोबावाडी, बागूलनगर, सुभाष रोड येथे झोपडपट्टी असून समस्यांचा मोठा डोंगर उभा राहिलेला आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटलेला नाही.
...अशा आहेत समस्या
महिलांना शौचालयाच्या अडचणी येत आहेत. शौचालयांमध्ये वीज नसते, पथदीप बंद असतात. गटारी तुंबलेल्या आहेत. शौचालयाच्या टाकीचे स्लॅब तुटल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता कर्मचारी शौचालय साफसफाईसाठी येत नाही. महापालिकेला ऑनलाइन तक्रार टाकल्यावर हे ठेकेदाराचे काम आहे, असे नागरिकांना उत्तर मिळते. शौचालयाची दारे तुटली आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. आरोग्यसेविका नावाला येतात. रस्त्याच्या सुविधा ही अनेक झोपडपट्ट्यांमध्ये नाहीत. पाण्यासाठी तर रोजच भांडणे करावी लागतात. लोकप्रतिनिधी झोपडपट्ट्यांमध्ये फिरकत नसल्याची बाब अनेक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी व्यक्त केली आहे. नगरसेवक केवळ मते मागायला येतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
"ऑनलाइन तक्रार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही. झोपडपट्ट्यांमध्ये नगरसेवक फिरताना दाखवा आणि बक्षीस मिळवा, ही स्पर्धा घेण्याची वेळ आली आहे. पाच वर्षात समस्या जैसे थेच राहिले आहेत."- विकास चंद्रमोरे, मालधक्का रोड
"नगरसेवकांनी पांढरपेशा वस्त्यांचा जास्त विकास केला. झोपडपट्ट्यांमधील मूलभूत समस्या जैसे थे आहे. सुलभ शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे आरोग्याच्या समस्या रोज निर्माण होतात."- किरण जगताप, नागरिक
"नाशिक स्मार्ट होत गेले मात्र झोपडपट्ट्या स्मार्ट झाल्या नाही. नागरिक तेच मात्र समस्या वाढत राहिल्या. सर्वच प्रभागांमधील झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना जगण्याचा रोज संघर्ष करावा लागतो."- श्याम गोहाड, मनसे
"स्वच्छतेच्या संदर्भात झोपडपट्ट्यांमध्ये समस्या वाढत आहे. लोकप्रतिनिधींनी नागरिकांना पाच वर्षात काही मूलभूत सुविधा देणे अपेक्षित होते. मात्र काही ठिकाणी तसे झाले नाही. याला कारण मतदार जागृत नाही."-शिवाजी हांडोरे, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.