Rajya Natya Spardha 2023: उतार वयात येणारा एकटेपणा घालविण्यासाठी वृद्ध जोडप्याने लढवलेली शक्कल अन् त्यातून काढलेला मार्ग दाखवणारी नाट्यकृती 'खेळ मांडियेला'.
६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गुरुवारी (ता. ७) संकर्षण युवा फाउंडेशन संस्थेतर्फे सादर झाले. विशाल कदम लिखित या नाटकाचे दिग्दर्शन विक्रम पाटील यांनी केले. (Rajya Natya Spardha 2023 marathi drama on Seniors loneliness khel mandiyela nashik news)
उतार वयात ज्येष्ठांना आधार हवा असतो आणि अशातच त्यांच्या नशिबी येतो तो एकटेपणा. मुला- बाळांना पाखरांप्रमाणे लहानाचे मोठ करायचं अन् स्वतःच्या पायावर उभी राहीली की ही पाखर घरटे सोडून दूरवर उडून जातात. मागे उरतात त्यांची आठवण काढणारे त्यांचे मायबाप, जे या पाखरांना म्हातारपणातली काठी मानतात.
असेच एकटे पडलेल्या विजय इनामदार आणि मंगल इनामदार या वृद्ध जोडप्याची कथा या नाटकातून प्रेक्षकांच्या समोर येते. ते शहराच्या अशा भागात राहतात जिथे वर्तमानपत्रदेखील टाकणारा येत नाही, ना मोबाईलला नेटवर्क. त्यामुळे आपल्याला कोणी भेटायला यावं आणि आपल्या सोबत वेळ घालवावा यासाठी ते एक शक्कल लढवतात. त्यांच घर विक्री करायचे आहे, अशी जाहिरात वर्तमान पत्रात देतात.
त्यानंतर त्यांच्याकडे आलेल्या गिऱ्हाईकासह दिवसभर गप्पा, खेळ खेळून आपला एकटेपणा घालवतात. मात्र घर काही विकत नाहीत. एकटेपणावर त्यांनी शोधलेला हा उपाय प्रेक्षकांना गंभीर चिंतन करायला भाग पाडतो. कलावंतांची भूमिकेवर असलेली पकड नाटकाचा विषय प्रेक्षकांपर्यंत पोचवायला पूरक ठरली.
नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत हा त्रिकोणी मिलाप नाटकाच्या सादरीकरणात महत्त्वपूर्ण ठरला. गंभीर विषयाची हलक्या फुलक्या विनोदातून मांडणी केल्याने प्रेक्षक नाटकात तल्लीन झाले होते. प्रमोद पुजारी, अपर्णा क्षेमकल्याणी, विक्रम पाटील, गणेश सोनवणे या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या. नेपथ्य गणेश सोनवणे, तर प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांनी साकारली. निनाद मैसाळकर यांनी नाटकाला संगीत दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.