Nashik News : गेल्या सोमवारी (ता. २६) सकाळी अशोकस्तंभ येथे चुकीच्या दिशेने दुचाकी चालविताना ती घसरली आणि या अपघातात बारावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मंगळवारी (ता. २७) पहाटे सातपूर- अंबड लिंक रोडवर दहावीच्या क्लाससाठी एकाच दुचाकीवरून तिघे विद्यार्थी जात असताना दुचाकी दुभाजकाला धडकून एक जागीच ठार झाला.
या दोन्ही घटनांतून दोन शाळकरी मुलांचा बळी केवळ बेशिस्तपणा आणि वाहतूक नियमांचे पालन न केल्याने झाला आहे. (reckless drivers recent accident 2 child victims Traffic police focus on recovery Nashik News)
शहरात सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघात होतात, प्रसंगी बळी जातात. परंतु या बेशिस्तीला लगाम कोणी घालायचा, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने नाशिककरांसमोर उभा राहिला आहे.
वाहतूक पोलिसांचा फक्त वसुलीवर डोळा आहे, तर पालकांचीही याकडे सोईस्कररीत्या डोळेझाक केली जात आहे.
परिणामी, शाळा- महाविद्यालयीन तरुणाईच्या हाती सहज दुचाकी मिळत असल्याने ते बेफाम होऊन ‘धूम स्टाइल राई करतात. मात्र, त्यातून जी दुर्घटना घडते त्यामुळे पालकांसमोर पश्चातापाशिवाय काहीच पर्याय राहत नाही.
शहरात वाहनचालकांकडून बिनधास्तपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालविली जातात. दुचाकीस्वार विनाहेल्मेट, ट्रिपल सीट, रॉन्ग साइड, सिग्नल न पाळणे, कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजविणे अन् धूमस्टाईलमध्ये स्टंटबाजी करीत दुचाकी चालवितात.
अगदी चारचाकी व रिक्षाचालकही नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. त्यामुळे शहरात वाहतुकीला शिस्त आहे की नाही, असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस सिग्नलवर दिसतात परंतु त्यांचे लक्ष्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यापेक्षा विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला अडवून त्यांच्याकडून ‘वसुली’ करण्यावर त्यांचा भर अधिक दिसून येतो.
त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत वाहनचालक सिग्नल तोडतात, ट्रिपल सीट दुचाकी चालवून नेतात, असे चित्र सीबीएस सिग्नल, मेहेर सिग्नल, सिटी सेंटर मॉल सिग्नल, त्र्यंबक नाका सिग्नल, गंगापूर नाका सिग्नल आदी ठिकाणी रोजचे झाले आहे.
त्याचे वाहतूक पोलिसांनाही काही वाटेनासे झाले आहे. बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांचा धाकच राहिलेला नसल्याचेच हे द्योतकच आहे. ‘सकाळ’ मध्ये सोमवारच्या (ता. २६) अंकातच ट्रीपल सीट वाहनचालकांच्या बेशिस्तीबाबतची बातमी ठळकपणे प्रसिद्ध केली होती.
असे असतानाही वाहतूक पोलिसांकडून मंगळवारीही (ता.२७) कोणतीही कारवाई करतानाचे चित्र दिसून आलेले नाही. वाहतूक पोलिसांच्या उदासीनतेमुळेच बेशिस्त वाहनचालक निर्ढावले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पालक, पोलिस उदासीन.. जबाबदार कोण?
वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध ना जनजागृतीचे उपक्रम राबविले जात आहेत, ना धडक कारवाई. त्यामुळे वाहनचालकांची बेशिस्ती वाढली आहे.
दुसरीकडे अल्पवयीन पाल्याकडे वाहन परवाना नसताना त्यांना वाहने चालविण्यास देऊ नये, अन्यथा पालकांवर गुन्हा दाखल होतो, असे असतानाही पालक आपल्याच मुलांच्या हाती वाहनाच्या चाव्या देतात आणि त्यांचा जीव धोक्यात घालत आहेत.
महाविद्यालयीन मुले हेल्मेट वापरत नाहीत. घरातून एकटेच निघतात परंतु शाळा- महाविद्यालयात एकाच वाहनावरून ट्रिपल सीट जातात.
हे पालकांना ठाऊक नसते. गंभीर अपघाताची घटना घडल्यानंतर सदर बाब उघड होते. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे याला जबाबदार कोण, असा गंभीर प्रश्न नाशिककरांसमोर उभा राहिला आहे.
धडक कारवाईची गरज
हेल्मेटसक्तीच्या कारवाईसाठी सिग्नल सोडून लांब अंतरावर एकाच ठिकाणी दबा धरून असलेले वाहतूक पोलिसांना ‘टार्गेट’ वसुलीशिवाय काहीही दिसत नाही. ट्रिपल सीट, हेल्मेटसक्ती, सिग्नल तोडणे, वाहन परवाना नसणे, रॉंग साइड वाहन चालविणे,
बेदरकार वाहन चालविणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे अशा कारवायांवर जोर दिला गेला तरी बहुतांशी वाहनचालकांवर जरब बसू शकेल.
महाविद्यालयांमध्ये दुचाकीवरून येणाऱ्यांना हेल्मेटसक्ती केल्यानेही सकारात्मक परिणाम दिसेल. परंतु त्यासाठी वाहतूक शाखेने मरगळ झटकून सकारात्मकतेने याकडे पाहिले पाहिजे.
"वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन केले तर जीवितहानी टाळता येणे शक्य आहे. प्रत्येक जीव मौल्यवान आहे. वाहतूक पोलिस शाखेमार्फत बेशिस्तांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. मात्र तरीही प्रत्येक वाहनचालकाने किमान आपला जीव सहीसलामत असावा यासाठी तरी वाहतूक नियमांचे पालन करावे."- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.