सटाणा : केंद्रातील भाजपप्रणीत मोदी सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याअंतर्गत दोषी आढळल्यास वाहनचालकाला १० वर्षांची शिक्षा व सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे.
हुकूमशाहीने लादलेला हा कायदा जाचक व अन्यायकारक असून रोजी रोटी कमविण्याच्या उद्देशाने तुटपुंज्या वेतनावर रात्रंदिवस वाहन चालवून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणार्या सर्वसामान्य वाहनचालकांना संपविणारा कायदा आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने हा जाचक काळा कायदा तत्काळ रद्द करा अन्यथा संपूर्ण तालुक्यात चक्का जाम आंदोलन छेडून तालुका बंद करणार असल्याचा संतप्त इशारा बागलाण तालुका ट्रक, टेम्पो, टॅक्सी मालक-चालक संघटनेतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला.
दरम्यान, या आंदोलनास शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बागलाण तालुका श्रमिक सेनेतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. (Repeal new Motor Vehicle Act immediately Baglan Taluka Various Transport Owners Drivers Association warns of chakka jam Nashik)
केंद्र सरकारने लागू केलेल्या या कायद्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर ट्रक चालकांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होत बागलाण तालुका ट्रक, टेम्पो, टॅक्सी मालक-चालक संघटनेतर्फे आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदनही देण्यात आले. शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत नवीन हिट अँड रनचा काळा कायदा करून सर्वसामान्य वाहनचालकांना संपविण्याचा घाट घातला आहे.
ड्रायव्हर आपली रोजी-रोटी कमवण्याच्या उद्देशाने रात्रं-दिवस वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्याकडे सात लाख रूपये असते तर त्याने चालकाचा व्यवसाय निवडला नसता.
त्यामुळे हा काळा कायदा चालकांवर अन्याय करणारा आहे. कोणताही वाहनचालक जाणून-बुजून अपघात करत नाही. जर चालक अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करेल किंवा तेथे थांबेल तर संतप्त नागरीक त्या चालकाला तेथेच मारून टाकतील.
जर धुक्यामुळे अपघात झाला तर यात चालकाची चुकी कशी असेल. चूक न करता चालकाला १० वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल. अपघात झाल्यानंतर चालकांना स्थानिक नागरिक मारहाण करतात.
यामुळे चालकाना तेथून नाइलाजाने पळावे लागते. या नवीन जाचक कायद्यामुळे चालक आपले काम करणार नाहीत. तर नवीन कोणी चालक म्हणून नोकरी सुद्धा करणार नाही. दलित आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे.
अशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्याकारणाने चालक हा केवळ स्वतःच्या जिवाच्या भितीने अपघात स्थळावरून पळून जातो.
शासनाने हा जाचक काळा कायदा रद्द करावा, अन्यथा संपूर्ण तालुक्यात चक्का जाम आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही श्री.सोनवणे यांनी दिला.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख रविंद्र सोनवणे, माजी शहरप्रमुख शरद शेवाळे, राजनसिंग चौधरी, संदीप पाटील, श्याम बगडाणे, तौसिफ पटेल, भाऊसाहेब पगार, दीपक सोनवणे, प्रवीण वाघ, विलास वाघ, रोशन अहिरे, संजय पाटील, कैलास अलई, नवल दातरे, वैभव गीते, जितेंद्र पवार, राहुल सावकार, किशोर निकम, शोएब शेख आदींसह तालुक्यातील चालक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.