नाशिक : मौजे मोहाडी व साकोरे मिग शिवारातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संरक्षक भिंतीच्या तारेत अडकलेल्या बिबट्याची सुटका करण्यात वनविभागाला यश आले आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी साडेसातला साकोरे मिग जवळील एचएएल कंपनीच्या संरक्षक भिंतीच्या भगदाडातील तारेच्या कुंपणात आठ महिन्याचा बिबट्या अडकला असल्याचे नागरिकांना दिसले.
याबाबतची माहिती पूर्व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याची सुखरुप सुटका करण्याचा निर्णय घेतला. (Rescue of leopard stuck in wire of protection wall Nashik latest marathi news)
यानंतर उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे, वनक्षेत्रपाल एस. बी. वाघमारे, अशोक काळे, व्ही. आर. टेकनर, पी. आर. साळवे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तोरण पवार, इको इको फाउंडेशनचे अभिजित महाले आदींनी बचाव मोहिम सुरू केली.
वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार बिबट्यास डार्ट मारून बेशुद्ध केले. त्यानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या तारेच्या कुंपणामधून काढत पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आले. तारेत अडकल्याने बिबट्याच्या छाती आणि गळ्याला जखमा असून, त्यावर उपचार करण्यात आले.
एका बिबट्याचा मृत्यू
यापूर्वी देखील नोव्हेंबर २०१८ मध्ये एचएएलच्या संरक्षण भिंतीच्या भगदाडातील तारेच्या कुंपणात बिबट्या अडकल्याची घटना घडली होती. जखमी बिबट्यास सुखरुप बाहेर काढले असता या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मंगळवारी पुन्हा त्याचप्रकारची घटना घडल्यानंतर वनविभागाकडून या भगदाडाबाबत एचएएल प्रशासनाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. या वेळी वनविभागाकडून भगदाड बुजविण्यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.