Nashik Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आशीर्वाद देण्याची ‘स्टाइल’ आहे. येवल्यातील शनिवार (ता. ८)च्या सभेत ते जे काही आशीर्वाद देतील, त्याचे परिणाम मोठे असतील, असा इशारा श्री. पवार यांच्या सभेच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा नामोल्लेख न करता दिला.
तसेच पक्ष फुटीनंतर दहा ते बारा आमदारांचे चेहरे चार ते पाच दिवस न झोपल्यागत दिसत होते. त्यापैकी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होते. (rohit pawar statement about sharad pawar yeola meeting nashik news)
त्यामुळे श्री. झिरवाळ हे कुठल्या ‘प्रेशर’खाली आहेत हे कळत नाही, असा खोचक टोला श्री. पवार यांनी लगावला.
पक्ष फुटीचे खापर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकट्यावर फोडून चालणार नाही. स्वतःच्या अडचणी सोडविण्यासाठी नेत्यांची दिशाभूल करू शकतात, असे रोहित पवार यांनी पक्ष फुटीला जबाबदार असलेल्यांविषयी स्पष्ट केले. मुळातच भाजपसोबत गेलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी चार ‘लेअर’ होते. त्यामुळे शरद पवार यांना घेरण्याविषयी बोलणाऱ्यांना ‘ते’ शब्द स्वतःबद्दल बोलताहेत काय, असा प्रश्न श्री. पवार यांनी उपस्थित केला.
शरद पवार यांच्या येवल्यातील सभेच्या तयारीसाठी श्री. पवार हे नाशिकमध्ये आले असताना त्यांनी हॉटेल एमरॉल्ड पार्कमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जगदीश गोडसे, गोकुळ पिंगळे, दत्तात्रय माळोदे, पुरुषोत्तम कडलग आदी उपस्थित होते.
पाऊस पाहता दौरा पुढे ढकलावा, असे शरद पवार यांचे मत होते. पण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हट्ट धरल्याने त्यांनी होकार दिला. येवल्याच्या जनतेने बोलवले म्हणून ते सभेसाठी येत आहेत, अशीही माहिती श्री. पवार यांनी दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शरद पवार हे नाशिकला येणार याची गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी (छगन भुजबळांचा नामोल्लेख न करता) नाशिकमध्ये येण्याचे ठरवले. तो विषय त्यांचा आहे, असे सांगून श्री. पवार म्हणाले, की शरद पवारांचे नाशिकवर प्रेम आहे. त्यांच्याशी बोलत असताना ते नाशिकच्या आठवणी सांगतात.
संघटन भक्कम होऊ शकले नाही तरीही कार्यकर्ते आणि जनता शरद पवार यांच्यासोबत राहिल्याने आमदारांची संख्या वाढली. येवल्यातील सभेसाठी शरद पवार यांच्यावर प्रेम करणारी जनता स्वतःहून येईल. याशिवाय नाशिकच्या कार्यालयात शरद पवार यांनी जावे, अशी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.
पण वेळेचा अंदाज घेऊन त्याबद्दल शरद पवार हे निर्णय घेतील. मी कार्यालयाच्या मालकीच्या विषयात जाणार नाही. मात्र सरकारची मदत घेऊन कार्यकर्त्यांना कार्यालयात जाण्यापासून थांबविण्यात आले. पण कार्यकर्त्यांना अधिक काळ ते थांबवू शकत नाहीत.
रोहित पवार म्हणाले...
- पक्ष फुटीनंतर दररोज चारशे फोन येतात. त्यातून व्यक्त होणारी भावना सोशल मीडियातून व्यक्त केली जाते. राजकारण हा त्यामागील हेतू नाही.
- मुख्यमंत्र्यांच्या गोटात वाद नव्हे, बरेच काही झाल्याचे ऐकले. उद्धव ठाकरेंना त्यासंबंधाने फोन येत आहेत. निवडणुकीवेळी अनेक आमदार परत येतील. मुख्यमंत्री गटातील आमदार आमच्याकडे अथवा ठाकरे यांच्याकडे जातील.
- भाजपसोबत लोक का गेले आहेत, हे सामान्य माणसाला समजले आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलून वेळ वाया घालावयाचा नाही, असे शरद पवार यांचे म्हणणे आहे.
- भाजपने घर आणि पक्ष फोडला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली. अशा परिस्थितीत मुद्दा सोडून मतांचे विभाजन होत फायदा व्हावा असे भाजपला वाटत असल्याने तसे होऊ नये म्हणून मुद्दा सोडला जाणार नाही.
- शरद पवार यांनी ६० वर्षे जपलेला विचार माझ्यादृष्टीने महत्त्वाचा असल्याने ‘शॉर्टकट’पेक्षा संघर्षाचा मार्ग मी निवडला.
- अजित पवार काका यांच्याशी माझे नाते भावनिक आहे. ते विरोधी पक्षनेते व्हावेत म्हणून कागदावर करण्यात आलेल्या सह्यांमध्ये माझी एक सही होती. ते उद्याचे मुख्यमंत्री असतील, असे महाराष्ट्राला वाटत होते.
- पुतण्या म्हणून मला भीती वाटते, की शरद पवार यांच्यानंतर लोकनेता म्हणून अजित पवार हे पोचले असताना त्यांची राजकीय कारकीर्द भाजपने संपवू नये.
- आजच्या पत्रकार परिषदेवेळी अजित पवार यांचे हावभाव मी पाहिले. ते बोलत नव्हते. बऱ्याच मुद्द्यांवर प्रफुल्ल पटेल बोलत होते.
- मुख्यमंत्र्यांनी फुटीनंतर पहिल्यांदा खासदार संजय राऊत, नंतर आदित्य ठाकरे व मग उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलायला सुरवात केली.
- राज ठाकरे यांनी केलेल्या पहिल्या ‘ट्विट'मधील शेवटचा भाग मला आवडला होता. आज पाहिल्यावर ते योग्य वाटते. त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. मात्र ते मुख्यमंत्र्यांना का भेटले, हे मला माहिती नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.