नाशिक : ग्रामीण पोलिस अधीक्षक मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारपासून (ता. २) पोलिस भरतीच्या मैदानी चाचणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. पहिल्या दोन दिवसात पोलिस वाहन चालकपदासाठी मैदानी चाचणी होणार आहे. बुधवारपासून (ता. ४) पोलिस शिपाई पदासाठी मैदानी चाचणीला प्रारंभ होणार आहे.
दरम्यान, पहिल्या दिवशी वाहनचालक पदासाठी सुमारे साडेपाचशे उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली.पोलिस अधीक्षक शहाजी उमाप हे स्वत: मैदानात उपस्थित राहून भरतीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. (Rural Police Recruitment 550 candidates appeared for field test nashik news)
नाशिकसह नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, शिंदखेडा, साक्री, चाळीसगाव, भुसावळ, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातून तरुण वाहन चालकाच्या मैदानी चाचणीसाठी आले होते. चालक पदाच्या १५ जागांसाठी ऑनलाईन २ हजार १०० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.
त्यानुसार, येत्या दोन दिवसात या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. पहिल्या दिवशी सुमारे एक हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. प्रत्यक्षात सुमारे साडेपाचशे ते सहाशे उमेदवार मैदानी चाचणीसाठी उपस्थित होते. --
अशी आहे भरती प्रक्रिया
* मुख्यालयाच्या गेटवर भरतीसाठीचे आवेदन पत्र दाखविल्यानंतर प्रवेश
* मैदानावरील पहिल्या मंडपात उमेदवाराला टोकन क्रमांक दिला जाणार
* दुसऱ्या मंडपात उंची मोजण्यात येते
* उंचीमध्ये पात्र ठरल्यास आरक्षणाच्या वर्गवारीनुसार कागदपत्रांसह तपासणी
* मात्र अपात्र ठरल्यास उमेदवार त्याचठिकाणी बाद होतो. आवश्यक कागदपत्रे नसतील तरीही उमेदवार बाद
* कागदपत्रांच्या पडताळणीनंतर चेस्ट क्रमांक दिला जातो.
* उमेदवाराची छाती न फुगविता व फुगवून मोजणी केली जाते.
* यात उमेदवार पात्र ठरल्यानंतर त्यास गोळाफेकसाठी नेले जाते.
* गोळाफेकीच्या चाचणीनंतर, उमेदवारास १६०० मी. धावण्यासाठी नेले जाते
उमेदवारांची दमछाक
वाहनचालक पदासाठी आलेल्या उमेदवारांना १०० मीटर धावण्याच्या चाचणीतून सूट असली तरी १६०० मीटर धावावे लागते. यासाठी भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजच्या रस्त्याचा वापर करण्यात आला. मात्र बहुतांशी उमेदवारांची १६०० मी.
धावण्याचे अंतर वेळेत पूर्ण करण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. यात काही उमेदवार हे अनवाणी धावत होते. काहींनी थकल्यामुळे चालतच अंतर पूर्ण केले. हे अंतर पूर्ण करण्यासाठी ५ मि. १० सेंकदाची वेळ उत्कृष्ठ असून, किमान ७ मिनिटात हे अंतर कापणे आवश्यक आहे.
वेळेनंतर उमेदवारांना संधी
आडगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांना सकाळी सहापर्यत उपस्थित राहण्याची वेळ देण्यात आली आहे. असे असले तरी बहुतांशी उमेदवार हे ग्रामीण भागातून येत असल्याने पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार, वेळेबाबत शिथिलता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे आवेदन पत्र असलेल्या उमेदवारांना भरतीच्या प्रक्रियेमध्ये सामील करून घेतले जात होते. भरती प्रक्रियेसाठी कडेकोट नियोजन करण्यात आलेले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.