नाशिक : अनियंत्रित जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरत असून, यामुळे फॅटी लिव्हरच्या समस्येत गंभीररीत्या वाढ झालेली आहे. तब्बल ३५ टक्के नागरिकांना अर्थात शंभरपैकी ३५ लोकांना फॅटी लिव्हरची समस्या भेडसावते आहे.
त्यापेक्षाही चिंताजनक बाब म्हणजे अवघे दोन टक्के रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येत असल्याने उर्वरित व्यक्तींना त्यांच्यावर असलेल्या संभाव्य धोक्याची कल्पनादेखील नाही. (SAKAL Exclusive 35 percent of citizens hunt for fatty liver Cause lifestyle changes nashik)
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. दुसरीकडे जीवनशैलीत होणारे बदल गंभीर आजाराचा धोका वाढवत आहेत. यापैकीच एक म्हणजे फॅटी लिव्हर अर्थात यकृताशी निगडित विकाराचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये यकृताशी निगडित विकारांमध्ये झपाट्याने वाढ होते आहे. विशेष म्हणजे बहुतांश रुग्णांना प्राथमिक स्तरावर निदान होत नसल्याने यकृताला इजा झाल्यानंतर व आजाराने गंभीर रुप धारण केल्यानंतर निदान होत असल्याने गुंतागुंत वाढते आहे. भविष्यात या आजाराचे प्रमाण आणखी वाढत जाणार असल्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
मद्य नव्हे मधुमेह कारणीभूत..!
सामान्यतः मद्य सेवनामुळे यकृताला इजा होते असा समज आत्तापर्यंत होता. परंतु तितकेच धोकादायक मधुमेहदेखील आहे.
मधुमेह, लठ्ठपणा, अनियंत्रित जीवनशैली ही फॅटी लिव्हरची समस्या उद्भवण्याची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय ‘सोशल ड्रिंकिंग, धूम्रपानाचे वाढते प्रमाणदेखील कारणीभूत आहे.
असा ओळखा संभाव्य धोका..
वय व उंचीच्या सूत्रानुसार वजन अधिक असेल तर फॅटी लिव्हर असण्याचा धोका असतो. ‘बीएमआय’नुसार गुणांकन अधिक असेल तर तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेत उपचार घेतले पाहिजे.
काही रुग्णांमध्ये अशक्तपणा, दम लागणे, घाबरल्यासारखी भावना निर्माण होणे आदी लक्षणेदेखील आढळून येतात. अतिगंभीर रुग्णांमध्ये लिव्हर सिरॉयसिस, पोटात पाणी होणे, काळी संडास होणे, यापासून हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार होण्याचा धोका असतो.
अशी असते उपचाराची प्रक्रिया...
संशयित रुग्णांची पहिल्या टप्प्यात सोनोग्राफी करण्यात येते. त्यात यकृताचा आकार असामान्य आढळल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फायब्रो स्कॅन ही चाचणी केली जाते.
यातून यकृतावर पोहोचलेली इजा किंवा विविध घटकांची अचूक माहिती मिळते. गरजेनुसार रक्ताच्या चाचण्या करूनही आजाराची गंभीरता तपासली जाते.
धोका टाळण्यासाठी हे करा...
सुदृढ जीवनशैलीतून फॅटी लिव्हरचा धोका टाळता येऊ शकतो. भारतीय खाद्य पदार्थांमध्ये प्रामुख्याने कार्बोहायड्रेडचे प्रमाण ऐंशी टक्क्यांपर्यंत असते. हे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे ठरते. फायबरयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करावा.
यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळांचा समावेश करावा. ‘रेड मीट’ अत्यंत धोकादायक असून, याचे सेवन टाळणे आवश्यक असल्याचे अनेक संशोधनांतून समोर आले आहे. आहारातील बदलासोबत नियमित किमान अर्धा तास व्यायाम किंवा शारीरीक हालचाली करणे गरजेचे ठरते. चालण्याचा व्यायामदेखील उत्तम समजला जातो.
"फॅटी लिव्हरचा धोका ३५ टक्के नागरिकांमध्ये असून, आजाराचा स्तर वाढल्यावर यकृत निकामी होऊन प्रत्यारोपणाची वेळ ओढवू शकते. भविष्यात प्रमाण आणखी वाढत जाणार असून, सावध होणे गरजेचे आहे. प्राथमिक स्तरावर औषधोपचार व जीवनशैलीतील बदलातून धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे लक्षणे आढळण्याची वाट न पाहता वजन अनियंत्रित असेल किंवा इतर लक्षणे आढळल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."
- डॉ. सोहम दोशी, यकृत विकार तज्ज्ञ व लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.